अखेर खासदार धनंजय महाडिकांनी ‘मैदान’ मारले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

कोल्हापूर - कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी अखेर शासनाकडूनच मेरी वेदर मैदानासाठी परवानगी आणून खऱ्या अर्थाने ‘मैदान’ मारले. या मैदानाच्या परवानगीवरून गेल्या काही दिवसांपासून श्री. महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला होता. आज शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर तातडीने मैदानावर प्रदर्शनाची तयारी श्री. महाडिक यांच्याकडून सुरू झाली. 

कोल्हापूर - कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी अखेर शासनाकडूनच मेरी वेदर मैदानासाठी परवानगी आणून खऱ्या अर्थाने ‘मैदान’ मारले. या मैदानाच्या परवानगीवरून गेल्या काही दिवसांपासून श्री. महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला होता. आज शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर तातडीने मैदानावर प्रदर्शनाची तयारी श्री. महाडिक यांच्याकडून सुरू झाली. 

श्री. महाडिक यांच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून हे प्रदर्शन भरवले जाते. यापूर्वी हे प्रदर्शन याच मैदानावर होत होते. परंतु, महापालिकेच्या २० फेब्रुवारी २०१७ ला  झालेल्या सर्वसाधारण सभेत या मैदानासह सासने मैदान हे खेळाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी दिले जाऊ नये, असा ठराव केला. या ठरावाच्या आधारे महापालिकेने श्री. महाडिक यांना हे मैदान प्रदर्शनासाठी देता येणार नाही, असे लेखी कळवले होते. परंतु, याच मैदानावर प्रदर्शन घेण्याचा चंग श्री. महाडिक यांनी बांधल्याने त्यासाठी त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे या मैदानाची मागणी केली. 

म्हणून मैदानावर प्रदर्शनाला परवानगी
कृषिपूरक माहिती या प्रदर्शनातून मिळते. कृषी प्रदर्शन ही बाब सार्वजनिक आहे व त्यात महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग सहभागी होत असल्याचे कारण सांगत या प्रदर्शनासाठी मेरी वेदर मैदान देण्यात येत असल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.

रम्यानच्या मुदतीत श्री. महाडिक यांनी मैदान प्रदर्शनासाठी न देण्यामागे कोती व खुन्नसी राजकीय प्रवृत्ती असल्याचा आरोप आमदार पाटील यांचे नाव न घेता केला होता. त्याला श्री. पाटील यांचे समर्थक माजी उपमहापौर अर्जुन माने यांनी ‘काम कमी, चर्चा जास्त’ असे उत्तर दिले. या दोघांत मैदानावरून ‘मैदान’ रंगले असताना प्रत्यक्ष काय होणार? याविषयी उत्सुकता होती. 

श्री. महाडिक यांनी १७ जानेवारीला जिल्हाधिकारी यांच्याकडे या मैदानाची मागणी केली. जिल्हाधिकारी यांच्याकडून १८ जानेवारीला तसा प्रस्ताव शासनाच्या महसूल विभागाकडे पाठवण्यात आला आणि आज हे मैदान प्रदर्शनासाठी देण्यात येत असल्याचे शासनाचे आदेशही प्राप्त झाले. प्रशासनाच्या पातळीवरील ही ‘तत्परता’ही या निमित्ताने चर्चेत आली.  

स्वप्नील शेवडेचा शोध
आज सकाळी मैदान दिल्याचे आदेश ‘बाय हॅंड’ आल्यानंतर श्री. महाडिक यांच्याकडून तातडीने मैदावर मंडप घालण्याची तयारी सुरू झाली. हेच मैदान २० ते ३० जानेवारीपर्यंत क्रिकेट स्पर्धेसाठी मिळावे, असा अर्ज स्वप्नील शेवडे यांनी केला आहे. त्यासाठी दहा हजार रुपये महापालिकेकडे जमा केले आहेत. हे स्वप्नील शेवडे कोण? याचा शोध श्री. महाडिक यांच्या समर्थकांकडून सुरू आहे.

शासनाने महसूलमुक्त कब्जे हक्काने हे मैदान १९८० मध्ये महापालिकेला दिले आहे. १९ सप्टेंबर १९८० च्या या आदेशातील एका अटीनुसार महापालिकेने या जागेचा वापर केवळ खेळासाठीच करायचा आहे, असे म्हटले आहे. तथापि, अन्य कारणांसाठी मैदानाचा वापर करायचा झाल्यास त्यासाठी शासनाची लेखी परवानगी घेणे आवश्‍यक असल्याचीही एक अट त्यावेळच्या आदेशात आहे. त्या अटीच्या आधारेच हे मैदान कृषी प्रदर्शनासाठी देण्याबाबत महापालिकेने उचित कारवाई करण्याचे या संदर्भातील आदेशात म्हटले आहे. या आदेशावर शासनाचे कार्यासन अधिकारी ना. रा. ढाणे यांची सही आहे. 

Web Title: Kolhapur News Agriculture Exhibition on Merry Vedar Ground