कोल्हापूरातही आता वातानुकूलित शूटिंग रेंज

युवराज पाटील
मंगळवार, 29 मे 2018

कोल्हापूर - दुधाळी शूटिंग रेंजचे भाग्य आता उजळणार आहे. शूटिंगच्या साहित्यासाठी ६५ लाखांचा पहिला हप्ता महापालिकेच्या खात्यावर जमा झाला. पुणे, मुंबईनंतर कोल्हापुरात अशा प्रकारची वातानुकूलित रेंज आहे. 

कोल्हापूर - दुधाळी शूटिंग रेंजचे भाग्य आता उजळणार आहे. शूटिंगच्या साहित्यासाठी ६५ लाखांचा पहिला हप्ता महापालिकेच्या खात्यावर जमा झाला. पुणे, मुंबईनंतर कोल्हापुरात अशा प्रकारची वातानुकूलित रेंज आहे. 

आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, राधिका बराले, नवनाथ फरताडे, फुलचंद बांगर, संदीप तरटे, अगदी अलीकडे शाहू माने, अनुष्का पाटील, वीरभद्र साळोखे, अदिज्ञा पाटील असे दिग्गज नेमबाजपटू याच रेंजमधून घडले. जुनी रेंज ६५ वर्षांपूर्वीची आहे. २००० मध्ये नव्या रेंजची उभारणी झाली. सुमारे एक कोटी रुपये खर्चून दोन वर्षांपूर्वी वातानुकूलित रेंज तयार झाली. सरावासाठी पुरेसे साहित्य नसल्यानेच रेंज धूळखात पडली होती. साहित्यासाठी सुमारे दीड कोटीचा प्रस्ताव पालिकेने जिल्हा नियोजन मंडळाकडे सादर केला होता. पहिल्या टप्प्यातील ६५ लाखांच्या हफ्त्याचा धनादेश महापालिकेच्या खात्यावर गुरुवारी (ता. २४) जमा झाला.

नेमबाजी म्हटले की दुधाळी शूटिंग रेंजशिवाय आधार नसायचा. नव्या दमाचे नेमबाजपटू सराव करण्यास मिळावा, यासाठी महापालिकेत यायचे. महापालिकेनेही नियमांची चौकट न लावता रेंज उपलब्ध करून दिली. कोल्हापूरपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजपटूंचा प्रवास झाला आहे. त्याचा पाया दुधाळी रेंजमध्ये रचला गेला. मुंबई, पुण्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्रात वातानुकूलित दहा मीटर अंतराची ही एकमेव रेंज आहे. ६५ लाखांच्या साहित्य खरेदीसाठी निविदा मागविली जाईल.

दुधाळी शूटिंग रेंजला फार मोठी परंपरा आहे. अनेक नेमबाजपाटू याच रेंजमधून देशाला मिळाले. रेंज वातानुकूलित आहे; पण साहित्याअभावी अडचणी निर्माण झाल्या होत्या. इलेक्‍ट्रॉनिक टार्गेट, पुलीज, रेस्टींग टेबल, कॉम्प्रेसर असे साहित्य उपलब्ध झाले की नेमबाजपटूंचा सरावाचा मार्ग मोकळा होईल.
- अजित पाटील,
नेमबाज प्रशिक्षक

या साहित्याची खरेदी

  •  इलेक्‍ट्रॉनिक टार्गेट : १०
  •  इलेक्‍ट्रॉनिक पुलीज : २०
  •  एयर काँम्प्रेसर
  •  ९० फूट अंतराचे रेस्टींग टेबल
  •  सिलेंडर बॉटल्स
Web Title: Kolhapur News air conditioner Shooting Range in Dudhali