राज्य कंगाल करणारे सरकार उलथवा - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

कोल्हापूर - ‘‘समृद्ध महाराष्ट्राला कंगाल व कर्जबाजारी बनवणाऱ्या, पैशाच्या मस्तीत व धुंदीत असणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवा. सामान्यांसाठी काहीही न करणाऱ्या नाकर्त्या भाजप सरकारला उलथून टाका,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे नेते माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी येथे केले.

कोल्हापूर - ‘‘समृद्ध महाराष्ट्राला कंगाल व कर्जबाजारी बनवणाऱ्या, पैशाच्या मस्तीत व धुंदीत असणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवा. सामान्यांसाठी काहीही न करणाऱ्या नाकर्त्या भाजप सरकारला उलथून टाका,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे नेते माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी येथे केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या हल्लाबोल आंदोलनात पश्‍चिम महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्याच्या आंदोलनाचा प्रारंभ आज कोल्हापुरातून झाला. या निमित्ताने दसरा चौकात सायंकाळी हल्लाबोल सभा झाली. सभेत भाजप सरकारच्या कारभाराचा पाढा नेत्यांनी वाचला.

अजित पवार म्हणाले, ‘‘भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीत लोकांना मोठ-मोठी आश्‍वासने दिली. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून लोकांनी त्यांना सत्ता दिली, पण गेल्या साडेतीन वर्षांत लोकांचा सरकारने विश्‍वासघात केला. निवडणुकीवेळी आलेल्या लाटेत भाजप सत्तेवर आले; मात्र अशा लाटा फार काळ टिकत नाहीत. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी काय घोषणा केल्या होत्या, आता त्याची काय परिस्थिती आहे, हे लोकांसमोर मांडण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे आंदोलन आहे. कोणाला बदनाम करण्यासाठी आंदोलन नाही. निवडणुकीवेळी दिलेल्या अाश्‍वासनांपैकी एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. मग ते शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, शेतीमालाला योग्य भाव देण्याचा शब्द असो किंवा धनगर व मराठा समाजाला आरक्षण असो. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते; मात्र त्यावर अद्याप काहीही झालेले नाही.’’

‘सकाळ’चा उल्लेख 
श्री. पवार म्हणाले, ‘‘आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूरला निधी देताना आम्ही कधीही हात आखडता घेतला नाही. कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाला जलपर्णीचा विळखा पडला, जलपर्णी काढण्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला, आम्ही तातडीने केंदाळमुक्तीसाठी निधी दिला आणि जलपर्णी हटवली, आज पुन्हा या रंकाळ्याची अवस्था काय झाली, हे तुम्हाला माहिती आहे.’’ 

चंद्रकांतदादा, कर्नाटकात जा
श्री. पवार म्हणाले,‘‘महाराष्ट्रात राहून ‘जन्माला यावे तर कर्नाटकात’ असे म्हणणारे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात कशाला जन्माला आले, त्यांनी कर्नाटकात जाऊन राहावे. महाराष्ट्राचे खायचे आणि कर्नाटकचे गोडवे गायचे हे खपवून घेतले जाणार नाही. सीमा भागातील लोकांवर कर्नाटक अन्याय करते, त्यांना मराठी बोलण्यास मज्जाव करते, मराठी ही आमची मातृभाषा असून, तिचा अभिमान सर्वांनाच असला पाहिजे.’’
 

 

Web Title: Kolhapur News Ajit Pawar Comment