आलम नाईकवाडे आजऱ्याचे उपनगराध्यक्ष 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

आजरा - आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी आलम अहमद नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली. स्विकृत सदस्यपदी आनंदा शंकर कुंभार व अभिषेक जयवंतराव शिंपी यांची निवड झाली.

आजरा - आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी आलम अहमद नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली. स्विकृत सदस्यपदी आनंदा शंकर कुंभार व अभिषेक जयवंतराव शिंपी यांची निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. नगराध्यक्षा ज्योत्स्ना अशोक चराटी पीठासन अधिकारी होत्या. नगरपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. 

येथील नगरपंचायतीच्या कार्यालयात सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत उपनगराध्यक्षपदाचे अर्ज स्विकारण्यात आले. सत्ताधारी आजरा शहर विकास आघाडीतर्फे आलम नाईकवाडे यांचा एकमेव अर्ज उपनगराध्यक्षपदासाठी दाखल झाला. नगरसेवक अनिरुध्द केसरकर यांनी सुचक म्हणून तर नगरसेविका संजीवनी सावंत यांनी अनुमोदन म्हणून सही केली.

दरम्यान, काल (ता.9) स्विकृत सदस्यपदासाठी आजरा शहर विकास आघाडीकडून आनंदा शंकर कुंभार, राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना आघाडीकडून अभिषेक जयवंतराव शिंपी, शैलेश मोहन देशपांडे या तिघांची नावे गटनेत्यांच्याकडून पाठविली होती. या तिंघाची स्विकृत सदस्यपदाची अर्हतापुर्ण कागदपत्र असल्याने हे तिनही अर्ज पात्र ठरले होते. आज दुपारी साडे बारा वाजता उपनगराध्यक्षपदी आलम नाईकवाडे यांच्या नावाची घोषणा नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांनी केली. त्यानंतर स्विकृत सदस्याची निवड झाली.

आजरा शहर विकास आघाडीकडून स्विकृत सदस्यपदासाठी आनंदा कुंभार यांचे एकमेव नाव आले होते. त्यांच्या नावाची घोषणा नगराध्यक्षा सौ. चराटी यांनी केली. गटनेते किरण कांबळे यांनी अभिषेक शिंपी यांच्या नावाच्या संमतीची चिठ्ठी नगराध्यक्षा सौ. चराटी यांच्याकडे दिल्यावर शिंपी यांच्या नावाची घोषणा सौ. चराटी यांनी केली.

यानंतर उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे यांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्या हस्ते झाला. नगराध्यक्षा सौ. ज्योत्स्ना चराटी यांनी उपनगराध्यक्ष श्री. नाईकवाडे, स्विकृत सदस्य आनंदा कुंभार, अभिषेक शिंपी यांना शुभेच्छा दिल्या. 

राजकारणाचे जोडे सभागृहाच्या बाहेर ठेवून गावच्या विकासासाठी 17 जण एकत्र येवूया. आजरा नगरपंचायत राज्यात आदर्श करण्यासाठी प्रयत्न केले जातील. माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी बारामती जसे सुंदर केले आहे, तसे आजरा शहर करूया. या शहराच्या विकासाठी 60 कोटी निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्रीच्याकडे प्रस्ताव दिला आहे. 
- अशोक चराटी,
नगरसेवक 

Web Title: Kolhapur News Alam Naikwade Ajara Deputy chief