विनाअडथळा दर्शनासाठी अंबाबाई गणमाता कायदा करा - डॉ. पाटणकर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

कोल्हापूर - 'अंबाबाई ही आद्य गणमाता आहे, तिच्या पूजेसाठी कोणत्याही मध्यस्थांची गरज नाही. मातेचे विनाअडथळा दर्शन व्हावे, यासाठी अंबाबाई गणमाता कायदा करावा, यासाठी जनआंदोलन करणार आहे,' अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रविवारी (ता. 21) येथे शाहू स्मारक भवन येथे समविचारी व्यक्तींची राज्यव्यापी बैठक होत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. पाटणकर म्हणाले, 'अंबाबाई ही आद्य कुलस्वामिनींपैकी एक आद्य गणमाता आहे. दहा हजार वर्षांपूर्वी मातृप्रधान लोकशाही आणि गणसंध व्यवस्थांच्या काळातील या कुलस्वामिनी आहेत. या मातांची स्मारके आणि मंदिरे कुठल्या एका जातीची मक्तेदारी होऊ शकत नाही. वेदांचा जन्मही झाला नव्हता, त्या काळी ही व्यवस्था अस्तित्वात आली. पंढरपूरच्या विठोबा-रखुमाई मंदिरातील व्यवस्था बडवे, उत्पादकांकडून काढून सरकारने स्थापन केलेल्या समितीने नेमलेल्या व्यक्तींमार्फत पूजा होते. त्याच धर्तीवर अंबाबाई मंदिरात व्यवस्था व्हावी.

पंढरपूरप्रमाणेच मातेचे दर्शन विनाअडथळा व्हावे. यासाठी रविवारच्या बैठकीत व्यापक चर्चा होईल. त्यातून आंदोलनाची दिशा निश्‍चित होईल, जोपर्यंत कायदा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.''

Web Title: kolhapur news ambabai darshan law