अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यातील सीसीटीव्ही अखेर खुले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

बैठकीत समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह इतर सदस्य आणि पुजाऱ्यांत वाद झाला. अखेर सीसीटीव्ही सुरू करा अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा जाधव यांनी दिला. पोलिस बंदोबस्तानंतर येथील ताणावपूर्ण वातावरण निवळले. दुपारनंतर पुजाऱ्यांनी सीसीटीव्हीवर बांधलेले कापड काढले. यानंतर या वादावर पडदा पडला

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यातील सीसीटीव्ही आज पुन्हा खुले केले. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात पुजारी आणि विश्‍वस्त यांच्यात झालेल्या बैठकी नंतर हा निर्णय झाला. समितीने दोन दिवसापूर्वीच गाभाऱ्यात सीसीटीव्ही लावले होते. त्यानंतर पुजाऱ्यांनी त्यावर कापड झाकले होते. याबाबत चर्चा करण्यासाठी आज समितीच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दोन दिवसापूर्वी गाभाऱ्यात सीसीटीव्ही बसविले होते. गाभाऱ्याचा ताबा पुजाऱ्यांकडे आहे, त्यामुळे पुजाऱ्यांनी सीसीटीव्ही बसवू नये असे सांगितले होते. तरीही कॅमेरे बसविण्यात आले. त्यानंतर पुजाऱ्यांनी सीसीटीव्हीवर कापड लावले होते. येथे वाद निर्माण होऊ नये म्हणून देवस्थान समिती आणि पुजारी यांची आज समिती कार्यालयात बैठक झाली. येथे पुजाऱ्यांनी देवस्थान समितीच्या अध्यक्षांना निवेदन ही दिले. निवेदनात म्हटले आहे,की मंदिराच्या सुरक्षेविषयी व कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी श्रीपुजक संवेदनशील आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेचे कॅमेरा बसविताना श्रीपजूकांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे या ठिकाणी नवीन कॅमेरे बसविण्याचे कोणतेही प्रयोजन उरत नाही. आमचा कायदेशीर ताबा असलेल्या जागेत आपण बळजबरीने व बेकायदेशीर रित्या सदरचे कॅमेरे बसवून आमच्या कायदेशीर अधीकारास बाधा येईल अशा प्रकारचे वर्तन केले आहे. सबब आपण हे कॅमेरे त्वरीत काढून घ्यावेत, अन्यथा ना ईलाजाने आपल्या विरुद्ध आम्हास योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल, याची दखल घ्यावी. 

बैठकीत समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह इतर सदस्य आणि पुजाऱ्यांत वाद झाला. अखेर सीसीटीव्ही सुरू करा अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा जाधव यांनी दिला. पोलिस बंदोबस्तानंतर येथील ताणावपूर्ण वातावरण निवळले. दुपारनंतर पुजाऱ्यांनी सीसीटीव्हीवर बांधलेले कापड काढले. यानंतर या वादावर पडदा पडला

Web Title: kolhapur news: ambabai temple