नवरात्रोत्सवात अंबाबाईची विविध रूपांत पूजा बांधण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवात देवीच्या विविध रूपांतील सालंकृत पूजा बांधण्याचा निर्णय  पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्री महालक्ष्मी (अंबाबाई) हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या बैठकीत संयुक्तपणे घेण्यात आला. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव अध्यक्षस्थानी होते. 

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवात देवीच्या विविध रूपांतील सालंकृत पूजा बांधण्याचा निर्णय  पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्री महालक्ष्मी (अंबाबाई) हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या बैठकीत संयुक्तपणे घेण्यात आला. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव अध्यक्षस्थानी होते. 

नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जाधव यांनी विविध घटकांच्या बैठकांचे आयोजन केले होते. यामध्ये महापालिका, वाहतूक पोलिस, दूरसंचार विभाग, स्वयंसेवी संस्था, मंदिरातील दुकानदार, श्रीपूजक, कर्मचारी यांच्याशी चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले. भक्तांना चांगले दर्शन व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आज काही सूचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस देवस्थान समितीचे कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्य सुभाष वोरा, संगीता खाडे, प्रमोद पाटील, शिवाजी जाधव, व्यवस्थापक धनाजी जाधव उपस्थित होते. सायंकाळी मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांबरोबर ही बैठक घेऊन  त्यांना सूचना करण्यात आल्या. मंदिरातील स्वयंसेवक, मंदिरातील गाभाऱ्यासहित सर्व ठिकाणी ये-जा करणाऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहेत. पालखीच्या सेवेकऱ्यांनाही ओळखपत्र देण्यात येतील.

नवरात्रोत्सवात पूजा बांधणार
श्रीपूजक आणि देवस्थान समितीबरोबर झालेल्या बैठकीत १० मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये नवरात्रोत्सव देवीच्या पारंपरिक सालंकृत पूजा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. महिषासुर मर्दिनी, अश्‍वारूढ अशा देवीच्या महत्त्व विशद करणाऱ्या पूजा बांधण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय अन्य गोष्टींबाबत सकारात्मक चर्चा झाली.

रस्ते बॅरिकेड लावून बंद
वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन करण्यात आले. मंदिराच्या चारही बाजूने येणारे बोळ आणि रस्ते बॅरिकेड लावून बंद करण्याचे ठरविण्यात आले. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या माहितीसाठी ७० ठिकाणी दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत. तसेच पर्यटकांनी न कळत वाहतुकीचा नियम मोडल्यास त्यांना मार्गदर्शन, प्रबोधन करण्याबाबतही चर्चा झाली. पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे वाहतूक पोलिसांना विशेष नियोजन करण्यास सांगण्यात आले. 

रोज कचरा उठाव
महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत मंदिरात दररोज होणाऱ्या कचऱ्याचा उठाव करावा, मोबाईल टॉयलेटची स्वच्छता नियमित ठेवावी, मंदिराच्या बाहेरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. मंदिरात स्वच्छता ठेवण्यासाठी उपाययोजना ठेवण्याबाबत चर्चा झाली. अग्निशामक दलाची गाडी विद्यापीठ हायस्कूलजवळ कायमस्वरूपी ठेवण्याचे ठरले. 

स्वयंसेवी संस्था 
महालक्ष्मी भक्त मंडळ, सदगुरू अनिरुद्ध उपासना फौंडेशन, व्हाइट आर्मी, जीवन ज्योती यांच्याकडे मंदिरातील आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली. महालक्ष्मी भक्त मंडळाच्या वतीने पालखी आणि पंचमी दिवशी पायघड्या घालण्याबाबत माहिती दिली. ॲपल सरस्वती आणि ॲस्टर आधार या दोन रुग्णालयांच्या वतीने उत्सव काळात येणाऱ्या भक्तांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मनुग्राफच्या वतीने मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. 

प्लास्टिक मुक्ती
मंदिराच्या आवारात प्लास्टिक मुक्ती करण्यासाठी दुकानदारांना सूचना देण्यात आल्या. मंदिराच्या आवारात असलेल्या दुकानदारांनी याची काळजी घ्यावी. तसेच भक्तांना साडी, खण देताना ते चांगल्या दर्जाचे असल्याची सूचना देण्यात आली. दुकानात देवीच्या साहित्याचीच विक्री करावी आणि दुकानाबाहेर अतिक्रमण करू नये. व्हीआयपी प्रवेशासाठी दुकानदारांनी पुढाकार घेऊ नये, अशी सूचनाही करण्यात आली. 

नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात पार पडावा, यासाठी आज संबंधित सर्व शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व अन्य संघटनांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात उत्सव साजरा करताना देवस्थान समितीमार्फत सारे नियोजन केले जाणार आहे. पोलिसांनी संरक्षण, श्रीपूजकांनी पूजा, अशी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास निश्‍चितच उत्सव शांततेत पार पडेल.
- महेश जाधव, अध्यक्ष पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

श्रीपूजकांनी पैसे अडवलेले नाहीत
देवस्थान समिती व श्रीपूजक यांच्यामध्ये दानपेटीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन वादात श्रीपूजकांनी मनाई घेऊन ३७ कोटी रुपये अडवून ठेवले आहेत, असा आरोप करण्यात येत होता. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने उत्सवासाठी पैसे खर्च करण्यास मनाई केलेली नाही, तर खर्च करून त्याचा हिशेब देवस्थान समितीने ठेवण्याचा आहे.

तिरुपती शालू आला तर स्वीकारू
तिरुमला तिरुपती देवस्थानकडून शालू यावा, यासाठी देवस्थान समितीच्या वतीने दरवर्षी तिरुपती देवस्थानला पत्र पाठवून शालू पाठवण्यासाठी विनंती करण्यात येते; परंतु यावर्षी देवस्थान समितीने तिरुपती देवस्थानला पत्र पाठवलेले नाही. तरीही तिरुपती देवस्थानकडून शालू आल्यास पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती त्याचा स्वीकार करेल. तसेच दसऱ्यादिवशी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने देवीस शालू देण्यात येणार आहे.

Web Title: kolhapur news ambabai temple navratri ushav