चांगल्या खेळाने देशाचे नाव उज्ज्वल करू - अनिकेत जाधव

चांगल्या खेळाने देशाचे नाव उज्ज्वल करू - अनिकेत जाधव

कोल्हापूर - सतरा वर्षांखालील फिफा विश्‍वकरंडकमध्ये खेळण्याचा पहिलाच अनुभव होता. साहजिकच प्रत्येक खेळाडूवर त्याचे दडपण होते. अमेरिका, कोलंबिया, घाना संघ आमच्यापेक्षा तुल्यबळ होते. त्यांच्याकडे अनुभवाचा खजिना होता. मात्र देशासाठी काहीतरी करून दाखवायचे, याच विचाराने आम्ही बांधलो होतो. तिन्ही सामन्यांत पराभूत झालो असलो, तरी देशवासीयांच्या मिळालेल्या पाठिंब्याने आम्ही भारावलो आहोत.

भविष्यात असाच चांगला खेळ करीत राहून देशाचे नाव उज्ज्वल करू, असा विश्‍वास भारतीय फुटबॉल संघातील खेळाडू अनिकेत जाधव याने आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या वेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व प्रेस क्‍लबचे उपाध्यक्ष तानाजी पोवार यांच्या हस्ते अनिकेतचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. 

अनिकेत म्हणाला, ‘‘प्रशिक्षक लुईस मॅटोस प्रत्येक सामन्यापूर्वी संघांची गेम स्टाईल सांगायचे. कोणता खेळाडू कसा खेळतो, त्याची कोंडी कशी करायची, याच्या टिप्स द्यायचे. प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध आम्ही शारीरिक क्षमतेत कमी पडलो. विश्‍वकरंडकात पहिल्यांदाच खेळत असल्याने थोडे दडपण होतेच. मात्र चुका दुरुस्त करीत सामन्यांत खेळत राहिलो. प्रतिस्पर्धी संघांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव होता. त्यांचा आत्मविश्‍वासही दुणावला होता. आमची स्थिती वेगळी असली, तरी प्रत्येक जण जिंकण्यासाठीच मैदानावर उतरला होता. प्रशिक्षक मॅटोस यांनी ठरविलेल्या रणनीतीनुसार खेळत होतो.या स्पर्धेपूर्वी आम्ही परदेशात ठिकठिकाणी जाऊन मैत्रीपूर्ण सामने खेळलो. त्याचा आम्हाला स्पर्धेत निश्‍चितच फायदा झाला.’’

या वेळी कोल्हापूर प्रेस क्‍लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे, ‘केएसए’चे अध्यक्ष सरदार मोमीन, उपाध्यक्ष दीपक शेळके, संभाजी पाटील-मांगोरे, राजेंद्र दळवी, विश्‍वास कांबळे, नंदू बामणे, राजेंद्र राऊत, प्रा. अमर सासने, अनिल जाधव, संजय जाधव उपस्थित होते. 

कुटुंबीयांचा मोठा त्‍याग 
माझ्यासाठी कुटुंबीयांनी खूप मोठा त्याग केला. स्टेडियममध्ये ते माझा खेळ पाहण्यास हजर होते. त्यांनी केलेल्या कष्टाच्या जोरावरच माझी वाटचाल सुरू आहे. त्यांच्यासह मला पाठिंबा देणारे छत्रपती घराणे व कोल्हापूरवासीयांचा मला अभिमान आहे, असेही अनिकेत म्हणाला.

नऊ नंबरचा अभिमान...
अनिकेत स्पर्धेपूर्वी अकरा नंबरची जर्सी परिधान करून खेळत होता. मात्र त्याला स्पर्धेकरिता नऊ नंबर मिळाला. नंबर कोणताही मिळो, खेळ चांगला करायचा, हेच ठरविल्याचे त्याने सांगितले. तसेच वाहन क्रमांकाची कोल्हापूर सीरियल एमएच ०९ अशी सुरू होत असल्याने नऊ नंबर मिळाल्याचा पुढे अभिमानही वाटल्याचे त्याने स्पष्ट केले. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर मी पहिल्यांदा खेळलो. त्यामुळे कुणाला मार्गदर्शन करावे, काय सांगावे, अशी माझी स्थिती नक्कीच नाही. मीच अजून फुटबॉलमधला एक विद्यार्थी आहे. मलाही अजून खूप शिकायचे आहे. पण एक जरूर सांगेन की, कोल्हापुरातील स्थानिक खेळाडूंचे बेसिक पक्के करण्यासाठी एक ॲकॅडमी सुरू व्हायला हवी. चौदा, सतरा, एकोणीस वर्षांखालील संघ तयार व्हायला हवेत.
- अनिकेत जाधव, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com