‘अनिकेत, तू मोठ्या नेत्याचा मुलगा पाहिजे होतास...’

सुधाकर काशीद
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - एखाद्या मंडळाच्या अध्यक्षपदी एखाद्याची निवड झाली, तरी कोल्हापुरात माळकर तिकटीपासून मिरजकर तिकटीपर्यंत अभिनंदनाचे डिजिटल फलक लागतात... अनेकजण तर स्वखर्चाने फलक लावतात. सायंकाळी चौकात जाहीर समारंभ आयोजित करतात... आमदारापासून खासदारापर्यंत कोण तरी नेता यावा यासाठी आटापिटा करतात आणि संबंधितांचे ‘वजन’ ओळखून नेतेही आपली हजेरी लावतात... पण कोल्हापुरातल्या अनिकेत जाधव या मुलाची वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात अव्वल खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

कोल्हापूर - एखाद्या मंडळाच्या अध्यक्षपदी एखाद्याची निवड झाली, तरी कोल्हापुरात माळकर तिकटीपासून मिरजकर तिकटीपर्यंत अभिनंदनाचे डिजिटल फलक लागतात... अनेकजण तर स्वखर्चाने फलक लावतात. सायंकाळी चौकात जाहीर समारंभ आयोजित करतात... आमदारापासून खासदारापर्यंत कोण तरी नेता यावा यासाठी आटापिटा करतात आणि संबंधितांचे ‘वजन’ ओळखून नेतेही आपली हजेरी लावतात... पण कोल्हापुरातल्या अनिकेत जाधव या मुलाची वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात अव्वल खेळाडू म्हणून निवड झाली आहे. त्याच्या दृष्टीने नव्हे, तर साऱ्या कोल्हापूरकरांच्या दृष्टीने हा अभिमानाचा क्षण; पण उत्सवप्रेमी कोल्हापूरकरांना त्याचे काहीही सोयरसुतक आहे की नाही, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. 

एका कष्टाळू रिक्षाचालकाचा हा मुलगा येत्या ३० तारखेला दिल्लीत भारताकडून पहिला सामना खेळणार आहे; पण त्याच्या घरात नेते, पुढारी लांबच; पण क्रीडा क्षेत्रातलेही कोणी भेट द्यायला किंवा कौतुक करायला आलेले नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचे वडील अनिल आजही नेहमीप्रमाणे आपली रिक्षा चालवत होते आणि आई कार्तिकी दसऱ्यासाठी कडाकण्या तयार करण्याच्या तयारीत होती. शेजाऱ्यापाजाऱ्यांत कौतुकाचे वातावरण होते; एखाद्या नेत्याच्या पोराची भारतीय फुटबॉल संघात निवड झाली असती, तर सगळे झाडून अभिनंदनासाठी येथे रांग लावून उभे राहिले असते, अशी उपहासात्मक प्रतिक्रियाही व्यक्त करत होते. 

अनिकेत जाधव शाहूपुरीत कब्रस्तानाच्या पिछाडीस असलेल्या एका छोट्या गल्लीत दोन खोल्यांच्या घरात राहतो. वडील रिक्षाचालक; पण क्रीडा प्रबोधिनीत फुटबॉलचे धडे घेत, तो भारतीय फुटबॉल संघाच्या पहिल्या ५० खेळाडूंच्या यादीत जाऊन पोचला. काल त्याची मुख्य संघात निवड झाली. रात्री त्याचे वडील अनिल अंबाबाई मंदिरात पालखी सोहळ्यात असताना त्यांना ही बातमी समजली. त्यांनी घरात ही आनंद वार्ता सांगितली.

भारतीय फुटबॉल संघात निवड झालेल्या या खेळाडूंच्या दारात या क्षणी कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींनी जल्लोष करायला हवा होता; पण अनिकेतच्या आई-वडील, बहिणीने व आजीने अशा चौघांनीच आपल्यापुरता आनंदाचा क्षण अनुभवला. आजही अनिकेतच्या वडिलांनी नेहमीप्रमाणे आपली रिक्षा काढली. दिवसभर ते रिक्षा फिरवत होते.

सायंकाळी नवीन राजवाड्यावर मालोजी छत्रपती व बेबीराजे यांनी भेटायला बोलावलंय म्हणून लवकर घरी आले होते. अनिकेतच्या परिवाराला आपला मुलगा भारतीय फुटबॉल संघात असल्याचा नक्कीच खूप अभिमान आहे; पण आपणा कोल्हापूरकरांना अभिमान आहे की नाही, हा प्रश्‍न आहे. एखाद्या स्थानिक संघाकडून खेळताना ईर्ष्येतून विजय मिळवला, की मोठी मिरवणूक, फटाक्‍यांचा कडकडाट अशी इथली पद्धत आहे; पण आपल्यातला एक खेळाडू भारतीय संघात आणि तोही विश्‍वचषक स्पर्धेसाठी जाऊन पोचला, तरी सारे कसे शांत आहे. 

Web Title: kolhapur news aniket jadhav in fifa world cup