संस्कृतीचा स्रोत टिकवायला हवा - अनिल अवचट

कार्वे - बाल-कुमार साहित्य संमेलनात बोलताना लेखक अनिल अवचट. व्यासपीठावर डॉ. राजन गवस, भारत सासणे, जोतिराम कदम आदी. 
कार्वे - बाल-कुमार साहित्य संमेलनात बोलताना लेखक अनिल अवचट. व्यासपीठावर डॉ. राजन गवस, भारत सासणे, जोतिराम कदम आदी. 

चंदगड - केवळ मानवकेंद्रित विचार चालणार नाही. निसर्गातील प्रत्येक जीव, जंतूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचा मूळ स्रोत शोधून तो टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांनी केले.

मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे आज झालेल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. डॉ. राजन गवस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले. महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानात संमेलनासाठी तालुक्‍यासह आजरा, गडहिंग्लज, कोकण आणि सीमाभागातून मोठी गर्दी झाली होती. 

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व भाषा विकास संशोधन संस्था, हलकर्णी यांच्यातर्फे हे संमेलन झाले. प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष एकनाथ पाटील यांनी स्वागत केले. श्री. अवचट म्हणाले, "गणितातील लसावी व मसावी मला कळला नाही. चक्रवाढ व्याज डोक्‍यात घुसले नाहीत. इतिहासातील सणावळींचे पाठांतर कशासाठी हा मला आजही प्रश्‍न पडतो. यासाठी आग्रही असणाऱ्या शिक्षक व पालकांनी मुलं ही निसर्गाचे शुद्ध रूप आहेत हे प्रथम जाणून घ्यावे आणि त्यांच्यावर माणुसकीचे संस्कार करावेत. प्रत्येक पालकाला आपला मुलगा डॉक्‍टर, वकील व्हावा असे वाटते. यामागे पैशाचे, श्रीमंतीची मानसिकता असते. 

रायगड जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी (डिसेक्‍शन) बेडकाची मागणी वाढली आणि त्याचवेळी तेथील भाताचे उत्पादन घटले. बेडूक भाताचे किटकांपासून संरक्षण करतात. शेतातील हे जीव, जंतू म्हणजे निसर्गानेच निर्माण केलेले मानवाचे मित्र आहेत. त्यामुळे केवळ व्यक्तिकेंद्रित विचार करून चालणार नाही. आपल्या संस्कृतीने या प्रत्येक घटकाला महत्त्व दिले आहे.

- अनिल अवचट, ज्येष्ठ साहित्यिक

पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्यांनी आपल्या संस्कृतीचे मूळ शोधले तर ते अधिक समाधानी आणि सुखी होतील. जिथे समाज ढवळलेला असतो तिथे खऱ्या अर्थाने ज्ञान असते. त्यामुळे देशावर आपत्तीचा क्षण असेल तर तिथे मदतीला जा. दिखाऊ संस्कृती, व्यसनांपासून दूर राहा, संवेदना हरवू नका. मदतीसाठी सदैव हात पुढे करा. चांगले साहित्य वाचा. चांगला माणूस बना.'' , असेही ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट म्हणाले. 

डॉ. गवस म्हणाले, ""आजच्या शिक्षण पद्धतीत टक्केवारीला महत्त्व आहे. पालक, शिक्षकांची विद्यार्थ्यांकडून 99 टक्‍क्‍यांची मागणी आहे. यात या मुलांचे बालपण होरपळून जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जात आहे. अशा परिस्थितीत संस्कारक्षम उपक्रम म्हणून बाल-कुमार साहित्य संमेलनाने आपली भूमिका पार पाडली पाहिजे.

विद्यार्थी दशेत ज्याने चिंचा चोरणे, आंबे तोडणे, काजूच्या बिया चोरणे आणि घरच्यांना चकवा देऊन नदी किंवा विहिरीमध्ये मनसोक्त डुंबण्याचे प्रकार केले असतील त्याचेच जीवन संपन्न झाले असे मी मानतो. यातून मुलांचे निसर्गाशी नाते जुळते. व्यवहारज्ञान होते. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा अशा व्यवहारज्ञानाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी ते मनसोक्तपणे अनुभवावे. 

- डॉ. राजन गवस

तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरवात झाली. संमेलनस्थळी विविध कलादालनांचे उद्‌घाटन माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती भरमाणा गावडे, उद्योजक सुनील काणेकर, पैलवान विष्णू जोशीलकर, नितीन पाटील यांच्या हस्ते झाले. तालुक्‍यातील साहित्य क्षेत्रातील व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.

डोक्‍यावर खापर फोडून उद्‌घाटन.... 
संमेलनाचे उद्‌घाटन डॉ. राजन गवस यांनी आपल्या बालपणीचे किस्से ऐकवून विद्यार्थ्यांना खऱ्या अायुष्याचे महत्त्व पटवून दिले. केवळ पुस्तकी संस्काराचा आग्रह धरणाऱ्या पालकांच्या प्रवृत्तीला वेगळ्या प्रकारे विरोध करताना अशा पालक आणि शिक्षकांच्या डोक्‍यावर खापर फोडून या संमेलनाचे उद्‌घाटन होत असल्याचे सांगितले. त्याला उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. 

महादेवभाई हे नाट्य अभिवाचन, प्रा. आप्पासाहेब खोत, मधुरा मुरकुटे, आर्या साबळे, साक्षी साळुंखे व अपेक्षा पाटील यांचे कथाकथन आदी कार्यक्रम झाले. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य भारत सासणे, ज्योतिराम कदम, सरपंच सौ. निशा बोकडे, उपसरपंच शिवाजी तुपारे, प्राचार्य एस. व्ही. गुरबे, प्रा. आर. पी. पाटील, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, व्ही. जी. तुपारे, रमेश वरखडे, शरद नार्वेकर, एम. एम. तुपारे, दयानंद काणेकर, सुनील काणेकर, श्रीशैल नागराळ, ऍड. संतोष मळवीकर, तानाजी गडकरी, पांडुरंग बेनके, जयवंत पेडणेकर, मारुती डेळेकर, सदानंद पुंडपाळ, श्रीकांत नाईक आदी उपस्थित होते. प्रा. मायाप्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्ती हारकारे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com