कोल्हापुरात लवकरच पशुखाद्य कारखाना - महादेव जानकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - राज्यातील सर्वांत मोठा शासकीय पशु-पक्षी खाद्यनिर्मितीचा कारखाना कोल्हापुरात सुरू केला जाणार आहे. यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असून, लवकरच गाय व म्हैस दुधाची बिले महिलांच्या नावावर जमा झाली पाहिजेत, असा नियम केला जाणार असल्याची माहिती दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज दिली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या केदारनाथ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. 

कोल्हापूर - राज्यातील सर्वांत मोठा शासकीय पशु-पक्षी खाद्यनिर्मितीचा कारखाना कोल्हापुरात सुरू केला जाणार आहे. यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असून, लवकरच गाय व म्हैस दुधाची बिले महिलांच्या नावावर जमा झाली पाहिजेत, असा नियम केला जाणार असल्याची माहिती दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज दिली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या केदारनाथ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. 

श्री. जानकर म्हणाले, की राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. दुधाला प्रतिलिटर सात रुपये दरवाढ दिली आहे. दूध दरवाढीनंतर पशुखाद्याचे दरही वाढविले जात होते. मात्र, दूध दरवाढीनंतर खाद्याचे दर वाढवतील, त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा दिल्यानंतर नामांकित कंपन्यांनी आपल्याकडे येऊन पशुखाद्य दरात वाढ करणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, राज्यातील पशु-पक्षी, कुक्कुटपालनासाठी लागणारे खाद्य कोल्हापुरातच तयार केले जाणार आहे.

यामुळे येथे रोजगारनिर्मितीही होऊ शकेल. यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. तसेच, गाय-म्हशीमागे राबराब राबणारी महिला असते आणि त्यांच्या दुधाचे बिल मात्र पुरुषांकडे असते. आता येथून पुढे असे होणार नाही. दुधाचे बिलही संबंधित महिलेच्या खात्यावरच जमा करण्याची सक्ती केली जाईल. ज्याला खर्चाला पैसे हवे असतील त्यांनी त्या महिलेकडून मागून घ्यावेत. पण, त्या बिलाची मालकीणही खुद्द राबणारीच असली पाहिजे. कृषी व दुग्ध व्यवसायात दहा लाख मुले आणि दहा लाख मुलींना रोजगार मिळेल, अशी संधी आहे. या वेळी प्रदेश कार्यकारी सदस्य डॉ. बाळासाहेब काम्माण्णा, जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे, पक्षाच्या सहकार आघाडीचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत खोंद्रे, संजय वैद्य, ललिता पुजारी, एस. डी. भोसले उपस्थित होते.
 

परवाना रद्द करणार 
दूध दरवाढीनंतर जर कोणत्याही संघाने किंवा कंपनीने पशुखाद्याचे दर वाढविले तर त्यांचा तत्काळ परवाना रद्द केला जाईल. शेतकरी आणि ग्राहकांना लुटीचे धोरण स्वीकारणाऱ्या मध्यस्थांना चार हात लांब ठेवूनच कारभार केला जाईल. 

कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. कोट्यवधी रुपये खर्च करतो; पण आमच्या सासरे, भाऊ, बहीण, जावयांना तुमच्या पक्षातून तिकीट द्या म्हणून मागे लागले आहेत. मात्र, ही ताकद जेवढा पक्ष वाढेल तेवढी वाढत जाणार आहे. याचे भान राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. 

भाजप, सेना कधीही आपल्याला बाहेर काढतील  
आपण आपला पक्ष वाढविला पाहिजे. ज्या वेळी पक्षाची ताकद वाढेल, त्या वेळी आपलीही ताकद वाढणार आहे. जोपर्यंत आपली ताकद आहे तोपर्यंत आपल्याला सर्वजण धरून राहतील. अन्यथा भारतीय जनता पक्ष-शिवसेना कधीही आपल्याला सत्तेतून बाहेर काढू शकतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली ताकद निर्माण केली पाहिजे.

डॉक्‍टरांच्या बदल्या ऑनलाईन
पाच वर्षांपासून एकाच जिल्ह्यात असणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्‍टरांच्या बदल्या दुसऱ्या जिल्ह्यात केल्या जातील. पुढील वर्षापासून या डॉक्‍टरांच्या बदल्या आता ऑनलाईन केल्या जातील, असेही जानकर यांनी सांगितले.

साडेसहा हजार कोटींचे पॅकेज 
यापूर्वी दुग्धविकास किंवा कुक्कुटपालनासाठी जेवढा निधी दिला जात नव्हता, तेवढा म्हणजे साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज राखीव ठेवले आहे; तर मत्स्य विभागासाठी १४ हजार कोटींचा निधी वाटप केला जाईल. 

Web Title: kolhapur news animal food factory in Kolhapur