प्लास्टिक कचऱ्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात

प्लास्टिक कचऱ्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात

कोल्हापूर - भाजी निवडल्यानंतर देठ गोळा करायचे, अंडा ऑम्लेट करायचे, टरफलं एकत्र करायची, मटण खायचे, हाडे गोळा करायची, फळे खायची अन्‌ साले गोळा करून प्लास्टिक बॅगेत भरायची. बॅग थेट रस्त्याकडेला फेकून द्यायची किंवा कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या घंटागाडीत टाकायची. प्रत्येक घरात कचऱ्याने भरलेली अशी एक प्लास्टिक बॅग दररोज तयार होते. शहर परिसरात हजारो टन प्लास्टिक कचरा अशा पद्धतीने निर्माण होतो. हा कचरा महापालिकेने ठेवलेल्या कचरापेटीत गोळा केला. या कचऱ्यावर कसलीही प्रक्रिया करणारी यंत्रणा आजघडीला महापालिकेकडे तरी नाही; मग हाच कचरा दिवसभर भटकून पोट भरणाऱ्या गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कावळे, नागरी वस्तीतील अन्य पक्ष्यांच्या प्रजाती, कुत्री, मांजरे यांच्या पोटात जातो. एके दिवशी हाच कचरा या प्राण्यांचा 
शेवट करतो. प्राणी, पक्ष्यांचा अंत करणारे एक भयावह चक्र शहर परिसरात सुरू आहे.

विशेष म्हणजे पाण्यातून गायी, म्हशींच्या पोटात निर्माल्य, प्रसाद भरून टाकलेल्या प्लास्टिक पिशव्याही जातात. पंचगंगेचे पात्र तर जयंती, दुधाळी नाल्यातून येणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे सतत भरलेले असते. हा प्रश्‍न प्राणी, पक्ष्यांपुरताच मर्यादित नाही; तर प्लास्टिक कचऱ्यातील प्थॅलेटस्‌, बायस्फेनॉल, पॉलिब्रोमिनेटेड डायफेनिल इथर, टेट्राब्रोमोबायस्फेनॉलसारखे रासायनिक घटक अनेक मार्गांनी मानवी शरीरात प्रवेश करून ठाण मांडून बसले आहेत. मानवी शरीरातील अंतस्राव ग्रंथीवर या रसायनांचा गंभीर परिणाम होत आहे. यातील प्थॅलेटस्‌मुळे अँड्रोजिन्स या पुरुषांमधील सेक्‍स हार्मोनवर तर बायस्फेनॉलमुळे इस्ट्रोजेन हे स्त्रियांमधील हार्मोन्स बाधित होत आहेत. होमिओस्टॅसिस या थॉयरॉईड हार्मोन्स्‌चे कार्यही या रसायनांमुळे विस्कळीत होत आहे. प्लास्टिकचा कचरा पूर्णपणे नष्ट होण्यासाठी हजार वर्षांचा कालावधी लागतो. तोपर्यंत हे प्लास्टिक हवा, पाणी, मातीचे प्रदूषण करते.

ग्रामीण भाग असो, की शहरी भाग. अन्न शोधण्यासाठी गायी, म्हशी, अन्य पाळीव प्राणी रस्त्याने दिवसभर हिंडतात. रस्त्याच्या बाजूला वर्षानुवर्षे कचरा साठलेला असतो. हा कचरा वेळेवर हटविला जात नाही. या कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण प्रचंड असते. जेव्हा या कचऱ्यात भाजी किंवा अन्न प्लास्टिक पिशवीत घालून फेकले जाते, तेव्हा ते खाण्यासाठी हे प्राणी तिथे येतात आणि प्लास्टिक बॅगसह हे अन्नपदार्थ खातात. अशातऱ्हेने दिवसभर भटकणारे गायींचे कळप, शेळ्या-मेंढ्या कचरा कुंडीभोवती जमा झाल्याचे चित्र शहर परिसरात जागोजागी दिसते.  

दिवसभर खाल्लेला कचरा हळूहळू पोटात जमा होतो. हा कचरा पचत नाही. यामुळे पोटातील अवयव हळूहळू भरत येतात. गायी, म्हशींत प्लास्टिक कचरा साठल्यामुळे दुधाचे प्रमाण कमी होते. हळूहळू गायीची तब्येत खालावू लागते. केवळ सांगाडा उरतो. शेतकरी अशी गाय पाळण्यास असमर्थ असतात. एके दिवशी ही गाय तडफडून मरून जाते. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत स्थानिक प्रशासनाला प्लास्टिक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट करण्यासाठी आदेशही दिले आहेत; पण या आदेशाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. कचराकुंडीतील ९९ टक्के कचरा हा प्लास्टिकचाच असतो, हे वास्तव आहे.

प्लास्टिक पिशवीत बांधून टाकलेले भाजीचे देठ, शिळे, नासलेले अन्न गायीकडून खाल्ले जाते. दिवसभर गाय अन्नासाठी इकडेतिकडे फिरते. प्लास्टिकचा कचराही पोटात फिरतो. हळूहळू प्लास्टिकचे तुकडे एकत्र येऊन कचऱ्याचा गोळा तयार होतो. प्लास्टिक गोळ्यामुळे यकृत, लहान आणि मोठे आतडे, मूत्रपिंडे, अन्य अवयवांवर परिणाम होतो. गायीची भूक मंदावते. डोळे आत जातात. दूध कमी देते. यातच तिचा अंत होतो. आतापर्यंत आम्ही १० ते १२ गायींवर पांजरपोळ संस्थेत शस्त्रक्रिया करून ६० किलो कचरा बाहेर काढला आहे.
- डॉ. राजकुमार बागल, 
पांजरपोळ संस्था
 

प्लास्टिक कसे तयार होते? 
पॉलिइथिलिनपासून प्लास्टिक बॅगची निर्मिती होते. हे पॉलिइथिलिन नैसर्गिक वायूमधून खास प्रक्रिया करून मिळविले जाते. पॉलिमरमध्ये कार्बन आणि हायड्रोजनची प्रचंड मोठी शृंखला असते. याद्वारेच अनेक प्रकारच्या प्लास्टिक बॅग तयार करता येतात. याशिवाय प्लास्टिकमध्ये पॉलिइथिलिन टेट्राप्थॅलेट, उच्च घनता असलेले पॉलिइथिलिन, पॉलिव्हायनील क्‍लोराईड, कमी घनता असलेले पॉलिइथिलिन, पॉलिप्रॉपीलिन, पॉलिस्टायरिनही असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com