शिवाजी विद्यापीठात उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळणार ई-मेलवर

संदीप खांडेकर
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी मिळण्यातील अडचण दूर केली आहे. यंदापासून ऑनलाइन पीडीएफ स्वरूपात फोटोकॉपी विद्यार्थ्यांच्या थेट ई-मेलवर पाठवली जाणार आहे.

कोल्हापूर -  शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी मिळण्यातील अडचण दूर केली आहे. यंदापासून ऑनलाइन पीडीएफ स्वरूपात फोटोकॉपी विद्यार्थ्यांच्या थेट ई-मेलवर पाठवली जाणार आहे.

फोटोकॉपी पाठविण्याच्या वेळखाऊ प्रक्रियेला बगल देत विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा ठरणार आहे. फोटोकॉपीसाठी विद्यार्थ्यांना पंधरा ते वीस दिवस वाट पाहण्याची गरज उरणार नाही. या निर्णयाचा परिणाम म्हणून विद्यापीठाची सुमारे पंधरा लाख रुपयांची बचत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर फार्मसीच्या ४५६ विद्यार्थ्यांना ऑनलाइन फोटोकॉपीज पाठविण्यात आल्या. 

मार्च-एप्रिल व ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमधील परीक्षांनंतर सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांकडून फोटोकॉपीची मागणी केली जाते. एका विद्यार्थ्याला दोन विषयांच्या फोटोकॉपी मिळतात. एका फोटोकॉपीसाठी दीडशे रुपये शुल्क आकारले जाते. त्यानंतर परीक्षा विभागातर्फे त्याला पोस्टाद्वारे फोटोकॉपी पाठवली जाते. ती वेळेवर मिळाली नाहीतर विद्यार्थी पाय आपटतच परीक्षा विभागाच्या पायऱ्या चढतो आणि संबंधितांवर प्रश्‍नांचा भडिमार करतो.

वेळेत फोटोकॉपी मिळाल्यास विद्यार्थ्याला जर पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास त्याचा निर्णयही पटकन घेता येतो आणि पुनर्मूल्याकंनासाठी अर्ज करतो. तो एका विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठीचे पाचशे रुपये शुल्क भरतो. 
पण, प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर जर पुनर्मूल्यांकनात संबंधित विषयात उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्णतेची माहिती मिळाल्यास त्याचा पारा चढतो. विद्यार्थ्यांची ही कटकट कमी व्हावी, यासाठी परीक्षा विभागाने फोटोकॉपी विद्यार्थ्याला ऑनलाईन पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

विद्यार्थ्याला फोटोकॉपी मिळण्यासाठी साधारणपणे पंधरा दिवस लागतात. परीक्षा विभाग पोस्टाद्वारे विद्यार्थ्याच्या पत्त्यावर फोटोकॉपी पाठवतो. मात्र, आता थेट विद्यार्थ्याच्या ई-मेलवर उत्तरपत्रिका पाठवली जाणार आहे. त्याचा एसएमएस विद्यार्थ्याला मोबाईलवर पाहायला मिळणार आहे. ई-मेलवर फोटोकॉपी मिळाल्यानंतर विद्यार्थी ती मोबाईलवरही पाहू शकतो. तसेच पुनर्मूल्यांकन करायचे की नाही, याचाही निर्णय त्वरित घेऊ शकतो. जागा भाडे, विद्युत कर, उत्तरपत्रिकेचे झेरॉक्‍स, प्रशासकीय असा एकूण खर्च लक्षात घेतला, तर विद्यापीठाला या निर्णयाने फायदा होणार आहे. विशेष म्हणजे ई-मेलवर उत्तरपत्रिका पाठवून पर्यावरणाचा विचारही करण्यात आला आहे. फोटोकॉपीच्या झेरॉक्‍ससाठी वापरल्या जाणाऱ्या कागदावरील खर्च वाचणार आहे. 

पोस्टमनची वाट पाहावी लागणार नाही
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे म्हणाले, ‘‘अभियांत्रिकी, लॉ व फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात फोटोकॉपीची मागणी होत असते. त्यांना वेळेत फोटोकॉपी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला फोटोकॉपीसाठी पोस्टमनची वाट पाहावी लागणार नाही. तंत्रज्ञानात्मक प्रक्रियेचा फायदा विद्यार्थ्याला होणार आहे.’’ 

दृष्‍टिक्षेपात
- प्रत्येक सेमिस्टरनंतर सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांकडून फोटोकॉपीची मागणी 
- तीस हजार फोटोकॉपींचे विद्यापीठाकडून होते वितरण 
- फोटोकॉपी विद्यार्थ्याच्या ई-मेलवर मिळणार
- विद्यार्थ्याच्या मोबाईलवर फोटोकॉपीचा मेसेज मिळणार 
- वेळखाऊ प्रक्रियेला आळा बसणार

 

Web Title: Kolhapur News Answer sheet Photocopy will send on students email