तंत्रज्ञानाने कॅन्सर बरा होण्याची शक्‍यता - फडणवीस

 कोल्हापूर : ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री पाटील, महापौर हसीना फरास, खासदार महाडिक, डॉ. अशोक भूपाळी.
कोल्हापूर : ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री पाटील, महापौर हसीना फरास, खासदार महाडिक, डॉ. अशोक भूपाळी.

 कोल्हापूर - कॅन्सर रुग्णांच्या संख्येत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, ही चिंतेची बाब आहे. मात्र अद्ययावत तंत्रज्ञानाने कॅन्सर बरा होण्याची शक्‍यता बळावली आहे. त्यामुळे कॅन्सरग्रस्तांनी आता हिंमत हरण्याची आवश्‍यकता नाही,` असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. 

कॅन्सरवरील उपचारासाठी ॲपल हॉस्पिटलने २० कोटी रुपयांच्या आणलेल्या अत्याधुनिक मशिनमुळे ॲपलचे अध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्‍टर डॉ. अशोक भूपाळी यांना लोक आशीर्वाद देतील,` असेही त्यांनी सांगितले.  ॲपल हॉस्पिटलतर्फे सुरू केलेल्या ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी हॉस्पिटलमधील उपलब्ध सोयी-सुविधा, अत्याधुनिक मशिनची पाहणी केली. ॲपलच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. 

श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘कॅन्सर झाल्याचे कळाल्यावर संबंधित रुग्ण अर्धमेला होतो. खर्चिक व प्रदीर्घ उपचारामुळे त्याच्या कुटुंबाला त्रास होतो. कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढत असताना तंत्रज्ञानातील बदलांमुळे कोणत्याही स्टेजवरील कॅन्सर बरा होऊ शकतो. कॅन्सरमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून त्या मानाने कॅन्सर इन्स्टिट्यूटची संख्या कमी आहे. डॉ. भूपाळी यांनी कॅन्सरग्रस्त बरे व्हावेत, यासाठी कॅन्सरवरील उपचारासाठी जगातील लेटेस्ट ट्रू-िबम स्टेक्‍स टेक्‍नॉलॉजी कोल्हापुरात उपलब्ध केली आहे. त्यांचे हे काम अभिमानास्पद आहे. या प्रकारची टेक्‍नॉलॉजी राज्यात २० ठिकाणी उपलब्ध व्हायला हवी.’’ 

ते म्हणाले, ‘‘आरोग्य सेवा महागात असतील, तर शासनाकडे उपचारासाठीच्या योजना आहेत. त्यामुळे ज्यांना आजार झाला आहे, त्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. मुख्यमंत्री सहायता निधीतून गेल्या वर्षी सुमारे २८ हजार रुग्णांना मदत करण्यात आली.’’

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘माझ्या डाव्या डोळ्यात कॅन्सर असल्याचे निदान झाल्यावर बंगळूरमधून मी त्यावर उपचार घेतले आणि निवडणूक लढविण्यास सज्ज झालो. कॅन्सरवरील उपचारासाठी लोकांना आता मुंबईत जाण्याची आवश्‍यकता नाही. ॲपल हॉस्पिटलने कॅन्सरवरील उपचाराची सुविधा येथे उपलब्ध केली असून लोकांना राहण्याची व्यवस्थासुद्धा केली आहे.’’

डॉ. भूपाळी म्हणाले, ‘‘हॉर्ट अटॅकनंतर कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या आजारावरील उपचाराच्या उणिवा भरून काढण्यासाठी अत्याधुनिक मशीन उपलब्ध केले आहे. जगातील सर्वात चांगले हे मशीन असून ते देशात एच. एन. हॉस्पिटल व नागपूर येथे आहे. २० कोटी किमतीचे हे मशीन कोल्हापुरात आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील मोफत उपचार येथे करण्यात येत आहेत.’’ 

या वेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कृषी व पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, महापौर हसीना फरास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, आमदार अमल महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, डॉ. किरण पाटणकर, डॉ. प्रतिभा भूपाळी, गीता आवटे, डॉ. विजय पाटील, डॉ. गिरीश हिरेगौडर, डॉ. श्रीया गाडवे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com