मानधनाशिवाय कला शिकविता येऊ शकते..! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - ज्या शाळांची पटसंख्या शंभरपेक्षा अधिक आहे, अशा राज्यातील एक हजार 835 शाळांमध्ये कला, शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव या विभागांसाठी शिक्षक नेमले जाणार आहेत. मात्र, याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या अध्यादेशात या जागा भरताना मानधन न घेणाऱ्यांवर भर द्यावा. कारण कोणत्याही मानधनाशिवाय या गोष्टी शिकविता येऊ शकतात, असे स्पष्टपणे म्हटले आहे. 

दरम्यान, या अध्यादेशाबाबत राज्यभरातून संताप व्यक्त होऊ लागला आहे. त्याशिवाय व्यापक आंदोलनाची दिशाही ठरविली जात आहे. मानधनाशिवाय या गोष्टी शिकविता येऊ शकतात. तर मग, लोकप्रतिनिधींनीही आपल्या मानधनाचा त्याग करून लोकसेवा करावी, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या कला व शारीरिक शिक्षणासाठी हा अध्यादेश निघाला असून, त्यानुसार सुमारे पाच हजार कंत्राटी शिक्षकांची भरती अपेक्षित आहे. अंशकालीन निर्देशक आणि अतिथी निर्देशक असे विभाग त्यासाठी केले असून, कला (गायन, वादन, नृत्य, अभिनय), क्रीडा, कार्यानुभव या विषयांसाठी ही पदे भरावीत, असेही अध्यादेशात म्हटले आहे. 

व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद साळुंखे म्हणाले, ""मुळात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या विषयांच्या तासिका शासनाने कमी केल्या. त्याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर काही तासिका वाढविण्याचा निर्णय झाला असला, तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. आम्ही औरंगाबाद खंडपीठात याबाबत याचिकाही दाखल केली आहे. आता हा आणखीन एका अध्यादेशाचा नवीन घोळ घातला असून, राज्यभरातून त्याबाबत संतप्त भावना व्यक्त होत आहेत. शेवटी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही.'' 

""शैक्षणिक वर्ष संपत आले तरी वाढीव तासिकांची अंमलबजावणी झालेली नाही. नवीन अध्यादेशानुसार कोणत्याही मानधनाशिवाय कला शिकविता येतात, ही मानसिकताच मुळात चुकीची आहे. राज्यभरातील सर्व संघटना एकत्र येत असून, लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.'' 
- प्रशांत जाधव, महाराष्ट्र कलाध्यापक संघाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष 

Web Title: kolhapur news art teacher