मुश्रीफ, सतेज यांच्या भूमिकेचे सेनेकडून स्वागतच - दुधवडकर

सुधाकर काशीद
मंगळवार, 13 मार्च 2018

कोल्हापूर - कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे आमच्या संजय मंडलिकांसाठी मदत करणार असतील तर आम्ही त्या दोघांच्या भूमिकेचे स्वागत करतो, असे शिवसेना संपर्क नेते अरुण दुधवडकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

कोल्हापूर - कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे आमच्या संजय मंडलिकांसाठी मदत करणार असतील तर आम्ही त्या दोघांच्या भूमिकेचे स्वागत करतो, असे शिवसेना संपर्क नेते अरुण दुधवडकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘‘संजय मंडलिक शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आहेत. त्यांची जनतेशी नाळ चांगली आहे. त्यांचे वडील (कै.) सदाशिवराव मंडलिक यांची प्रतिमा तर जायंट किलर आहे. त्यामुळे मुश्रीफ, पाटील त्यांच्यासाठी हात पुढे करत असतील तर ते चांगलेच आहे.’’

दरम्यान, संजय मंडलिक शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख, गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार असताना त्यांच्या प्रचाराची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे कसे करतात? या प्रश्‍नाने काल शिवसैनिकांत द्विधा मनःस्थिती होती. भविष्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी युती असणार का? तसे नसेल तर संजय मंडलिक ऐन निवडणुकीत कोणत्या पक्षाचे उमेदवार असणार? असे प्रश्‍न घेऊन काल काही कार्यकर्त्यांनी संपर्कनेते श्री. दुधवडकर यांची वडगाव येथे भेट घेतली. ते अगदी अल्प कालावधीसाठी काल रात्री वडगाव येथे आले होते. त्यावेळी दुधवडकर यांनाही कार्यकर्त्यांच्या भावनाची कल्पना आली. मात्र संजय मंडलिक आपलेच आहेत आणि जर हसन मुश्रीफ, सतेज पाटील हे दोघे सदाशिवराव मंडलिकांच्या प्रेमापोटी त्यांना बळ देणार असतील तर आपण त्यांचे स्वागत करूया, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

दरम्यान, माजी आमदार महादेवराव महाडिक, विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा काटा काढण्यासाठी मुश्रीफ व सतेज यांनी संजय मंडलिकांचा भावी खासदार असा थेट उल्लेख करणे सुरू केले आहे. अर्थात मंडलिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा हा प्रकार आहे. यातून महाडिक घायाळ होतील की नाही, हा पुढचा भाग. पण शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र नेत्यांच्या या असल्या हालचालीने घायाळ झाले आहेत.

मंडलिक यांना ‘अच्छे दिन’ 
या सर्व परिस्थितीत संजय मंडलिक यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मुश्रीफ, सतेज हे मनापासून आपल्यावर प्रेम करत नाहीत हे त्यांनाही माहीत आहे; पण खासदारकीची संधी हातातोंडाशी येत असताना या दोघांचे बळ पाठीशी असणे ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. महाडिकांच्या विरोधात निवडणूक लढवायची असल्याने त्यासाठी मुश्रीफ, सतेज हे हत्यार त्यांना आयतेच मिळाले आणि हे हत्यार अधिक धारदार व्हावे, हाच त्यांचा प्रयत्न असणार आहे. प्रश्‍न आहे, तो संजय मंडलिक यांच्या शिवसेनेतील अस्तित्वाचा; पण तेथेही ते योग्य व्यक्तींना धरून आहेत.

मंडलिकांवर भिस्त... 
संजयदादा, तुम्ही शिवसेनेचे; पण तुमच्या प्रचाराचा प्रारंभ राष्ट्रवादीने कसा काय केला? हे शिवसेनेतील नेताही संजय मंडलिकांना विचारू शकत नाही ही अवस्था आहे. कारण शिवसेनेकडे सध्या प्रभावी उमेदवार नाही हे वास्तव आहे. विजय देवणेंसारखे कार्यकर्ते पुन्हा इच्छुक असले तरीही गेल्या निवडणुकीत फार यातायात न करताही चांगली मते घेतलेला उमेदवार म्हणून संजय मंडलिकांवर भिस्त आहे. अर्थात आपण करू ती युती, आपण ठरवू तो उमेदवार, आपण ठरवू ती पूर्व दिशा अशा धुंदीत हे सारे सुरू आहे. कोण निवडून येणार हा भाग पुढचा आहे; पण अरे हे चाललंय काय, अशीच विचित्र भावना कोल्हापूरकरांत आहे.

जाब विचारण्याची ताकद नाही
मंडलिक शिवसेनेच्या व्यासपीठापेक्षा अधिक काळ मुश्रीफांच्या व्यासपीठावर असतानाही त्यांना दुखावण्याची किंवा जाब विचारण्याची ताकद शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांत नाही ही परिस्थिती आहे. आणि तुम्ही राष्ट्रवादीचे आमदार असताना एका शिवसेना नेत्याची भावी खासदार म्हणून परस्पर घोषणा करता कशी? हे मुश्रीफांना राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता विचारू शकत नाही, ही अवस्था आहे. सतेज यांना मंडलिक निवडून येण्यात फार स्वारस्य नाही; पण धनंजय महाडिक यांना पराभूत करण्यात मोठा इंटरेस्ट आहे आणि त्यासाठी मंडलिकांना ते जवळ करत राहिले तर ते आश्‍चर्य नसणार आहे. 

Web Title: Kolhapur News Arun Dudhawadkar comment