अरुण पाटील ‘वन मॅन आर्मी’

रमेश पाटील
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

आर्मीत २२ वर्षे सेवा बजावून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या म्हाकवे (ता. कागल) येथील अरुण दत्तात्रय पाटील यांनी दिवस-रात्र अभ्यास करून ही किमया साधली. आर्मीची शिस्त अभ्यासासाठी वापरत पोस्ट मिळविण्यातला ‘कॉन्फिडन्स’ त्यांच्या यशातून उलगडला आहे.

म्हाकवे - ७० दिवसांत अभ्यास करून कोणी सहायक मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) झाले तर भुवया नक्कीच उंचावतील. त्यातही तो बॉर्डरवर सेवा बजावणारा आर्मीचा जवान असेल तर त्याने अभ्यास केलाच कसा? असा प्रश्नही पडेल. आर्मीत २२ वर्षे सेवा बजावून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या म्हाकवे (ता. कागल) येथील अरुण दत्तात्रय पाटील यांनी दिवस-रात्र अभ्यास करून ही किमया साधली. आर्मीची शिस्त अभ्यासासाठी वापरत पोस्ट मिळविण्यातला ‘कॉन्फिडन्स’ त्यांच्या यशातून उलगडला आहे.

श्री. पाटील यांचे म्हाकवे इंग्लिश स्कूलमधून बारावीपर्यंत शिक्षण झाले. डी. आर. माने महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. भाग - दोन पर्यंतचे शिक्षण घेतले. २२ व्या वर्षी ते आर्मीत भरती झाले. आर्मीतच इलेक्‍ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते व्हेईकल मेकॅनिक म्हणून रुजू झाले.

अभ्यासाचे वेळापत्रक असे 

  •  पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत अभ्यास
  •  ७ः०० - एसटीने म्हाकवेतून कोल्हापूरकडे
  •  ८:३० : लेक्‍चर्सना उपस्थिती
  •  १२:३० : जेवण
  •  १:०० : लायब्ररीत सायंकाळी सहापर्यंत अभ्यास
  •  ६:०० : कोल्हापुरातून म्हाकवेला परत
  •  ७:०० : रात्री दहापर्यंत अभ्यास
  •  १०:०० : जेवण
  •  १०:३० : साडेअकरापर्यंत अभ्यास

जम्मू-काश्‍मीर, राजस्थान, आसाम, अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांनी सेवा बजावली. या कालावधीत त्यांना ७ पदकेही मिळाली. २१ वर्षे सेवा बजावल्यानंतर शासकीय सेवेत जाण्याचा विचार त्यांच्या मनात आला. सुटीचा उपयोग अभ्यासासाठी करायचा असे ठरवूनच ते गावी आले. तीन-चार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांवर चौकशी केल्यावर त्यांनी पार्थ ॲकॅडमीत प्रवेश घेतला. २२ वर्षांनंतर अभ्यास करताना त्यांना थोडा त्रास झाला. त्यांनी एक पुस्तक किमान तीनवेळा वाचले. 

पूर्व परीक्षेसाठी त्यांनी २९, तर मुख्य परीक्षेसाठी ४० दिवस अभ्यास केला. मोटार व्हेईकल इन्स्पेक्‍टरसाठीच्या बॅचमध्ये २१ विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांतून उत्तीर्ण होणारे ते एकमेव ठरले. ते ३१ मार्च २०१८ ला दुपारी एक वाजता सेवानिवृत्त झाले आणि त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता परीक्षेचा निकाल जाहीर झाला. उत्तीर्ण झाल्याची बातमी त्यांना सिकंदराबादमध्ये असताना समजली. ते सायंकाळी गावी परतले. त्यांच्यावर नातेवाईक व मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांचा सत्कारही झाला. 

श्री. पाटील म्हणाले, ‘माझे वडील मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होते. परिस्थितीमुळे ते नोकरी करू शकले नाहीत. घरच्या बेताच्या आर्थिक स्थितीत त्यांनी आम्हा भावंडांना शिकवले. माझे शासकीय सेवेत काम करण्याचे स्वप्न होते, ते पूर्ण होत आहे.’

निवृत्तीदिवशीच परीक्षेचा निकाल
श्री. पाटील यांची अजून दहा वर्षे सेवा होती. मुख्य परीक्षा दिल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्तीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सुरुवात केली. विशेष म्हणजे ज्या दिवशी ते सेवानिवृत्त झाले, त्या दिवशीच आरटीओ परीक्षा उत्तीर्ण झाले.

Web Title: Kolhapur News Arun Patil Success story