फसवणीस सरकारला बाय-बाय करा - अशोक चव्हाण

फसवणीस सरकारला बाय-बाय करा - अशोक चव्हाण

कोल्हापूर - ‘राज्यातील सरकार हे फडणवीस सरकार नसून, ते फसवणीस सरकार आहे. देशात चाय चाय आणि उत्तर प्रदेशमध्ये गाय-गाय असा नारा सुरू आहे; पण आता या लोकांना बाय-बाय करण्याची वेळ आली आहे. सरकारविरोधात नांदेडसह अन्य महापालिकेत पेटलेली ही मशाल संपूर्ण राज्यात कायम तेवत ठेवा,’ असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले. 

आमदार सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली आगामी सर्वच निवडणुकांत राज्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहील, असा विश्‍वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला. पक्षाची सत्ता असताना आणि नसतानाही पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात काँग्रेसला ताकद देण्याचे काम आमदार पाटील यांनी केले असेही ते म्हणाले.

राजोपाध्येनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉल व बॉक्‍सिंग रिंगचा लोकार्पण सोहळा श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत श्री. चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, ‘‘शहर, जिल्हा व राज्याचा विकास करण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे, हे आता लोकांना पटू लागले आहे. मराठा, मुसलमान आरक्षण द्यायचा निर्णय काँग्रेसने घेतला. त्यानंतर शासन बदलले आणि त्यांनीही प्रश्‍न लोंबकळत ठेवला. कोणालाच काही मिळाले नाही. धनगर समाजाची तर उपेक्षाच करण्याचे काम सरकारने केले. तीन वर्षे सर्वच समाजाला केवळ गाजर दाखवण्याचे काम केले. लोकांना फसवण्याचे काम हे सरकार करत आहे, त्यामुळे हे फडणवीस नव्हे तर फसवणीस सरकार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘सरकारचा अजेंडा ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ राहिला आहे. दोन कोटी लोकांना रोजगाराचे आश्‍वासन; प्रत्यक्षात दोन लाखांनाही रोजगार मिळाला नाही. नोटबंदीने काळा पैसा राहू दे, विजय मल्ल्याचा पांढरा पैसाही ते परत आणू शकले नाहीत. नोटबंदीमुळे बॅंका, संस्था बंद पडण्याची वेळ आली. या निर्णयामुळेच महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मते मिळाली. राज्यात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. ३४ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा गेली कुठे? ऑनलाइन अर्ज भरून घेतले; पण सरकारच ऑफलाइन झाले आहे. त्यांना आता बदलण्याची वेळ आली आहे.’’

ते म्हणाले, ‘‘इंदिरा गांधी यांचे नाव त्यांना चालत नाही. त्यांच्या नावे असलेल्या योजनांची नावे बदलली. या सर्व योजना काँग्रेसच्या आहेत. त्यांची फक्त नावे बदलण्याचे काम सुरू आहे. हे सरकार ‘नेम चेंजर’ आहे, ‘गेम चेंजर’ नाही. लोकांना विकास हवा आहे. स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम काँग्रेसने केले. ६० वर्षांत देशाला, महाराष्ट्राला भरपूर दिले. जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्यांनी प्राणाची आहुती दिली. भाजपचे स्वातंत्र्यलढ्यात काही एक योगदान नाही. गरिबी हटाओचा इंदिरा गांधींनी कार्यक्रम दिला, यांनी फक्त गरीब हटावचा कार्यक्रम केला. यांचा अजेंडा फक्त श्रीमंताचा आहे.’’

पी. एन. पाटील म्हणाले, ‘‘२०१४ मध्ये एक स्टंटबाज माणूस आला. ६० वर्षांत काँग्रेसने काम केले नाही, म्हणून ६० महिने मला सत्ता द्या म्हणाला. १५ लाखांचे आमिष दाखवले. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या पतीलाही मत न देता त्यांना मते दिली. १५ लाखांपैकी एक रुपयाही जमा झाला नाही. ६० वर्षांत मोदींएवढा लबाड बोलणारा पंतप्रधान देशाला मिळाला नाही. ते बहुराष्ट्रीय पंतप्रधान आहेत. कुठल्या ना कुठल्या देशात जायचे आणि स्वतःचे कौतुक करून घेऊन यायचे, हाच त्यांचा कार्यक्रम आहे.’’
आमदार सतेज पाटील यांनीही सरकावर चौफेर टीका केली. ते म्हणाले, ‘‘२०१४ ला एक लाट आली आणि त्यात देशात व राज्यात काँग्रेसला मोठे धक्के सहन करावे लागले.

कोल्हापुरातही काँग्रेसची पाटी विधानसभेत कोरी राहिली, याचे दुःख आहे. त्यानंतर वर्षभरात महापालिकेच्या निवडणुकीला सामारे जावे लागले, काय होईल याची भीती होती; पण कामाच्या जोरावर महापालिका जिंकली. डॉ. पतंगराव कदम यांनी जबाबदारी माझ्यावर देताना आरपारची भाषा केली. त्यामुळेच महापालिकेची सत्ता मिळवता आली.’’

ते म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीत राज्यातील दोन नंबरचे मंत्री घराघरात जात होते. महिलांनाही अजून सात लाख मिळतील, असे वाटत होते. एकहाती काँग्रेसची सत्ता आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यात यश आले नसले; तरी परिवर्तनाच्या लाटेत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे काम लोकांनी केले. गेल्या वेळी महापालिका जिंकली आणि मंत्री झालो. या वेळी पुन्हा तोच विजय मिळवला आणि विधान परिषद जिंकली. विधान परिषदेत तिकीट मिळवण्यापासून रस्सीखेच होती; पण डॉ. कदम व अशोक चव्हाण यांनी यात सिंहाचा वाटा उचलला.’’ 
या वेळी महिला काँग्रेसच्या सौ. सरला पाटील यांचेही भाषण झाले. शारंगधर देशमुख यांनी स्वागत केले. आभार सचिन चव्हाण यांनी मानले. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्याला माजी आमदार बजरंग देसाई, उपमहापौर अर्जुन माने, पृथ्वीराज साठे, ॲड. गुलाबराव घोरपडे, सौ. संध्या घोटणे, प्रल्हाद चव्हाण, स्थायी सभापती संदीप नेजदार, शिक्षण समिती सभापती वनिता देठे, सौ. प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील व महापालिकेतील काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. 
 

विश्‍वासाला पात्र राहिलो
विधान परिषदेत संघर्ष मोठा होता. समोर ताकदीचा माणूस होता; पण मला उमेदवारी दिली, तरच काँग्रेसचा विजय होईल, असा विश्‍वास डॉ. कदम, श्री. चव्हाण यांना होता. त्यांनी दिल्ली दरबारी ताकद लावली. त्यांच्या या विश्‍वासाला पात्र राहिलो, असे सतेज पाटील म्हणाले. 

चव्हाण यांचा सत्कार 
राज्यात परिवर्तनाची लाट नांदेडमधून सुरू झाल्याचा उल्लेख आमदार पाटील यांनी केला. काँग्रेसच्या वतीने नांदेड महापालिकेतील विजयाबद्दल श्री. चव्हाण यांचा शारंगधर देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

सत्ता आल्यावर लक्षात ठेवा
नांदेडच्या निकालानंतर आउटगोइंग थांबले असे सांगून सतेज पाटील म्हणाले, ‘‘काही तरी मिळणार म्हणून आपल्यातील काहीजण तिकडे गेले. अजून त्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. सत्ता आल्यानंतर मात्र अशांना जवळ करण्याची भूमिका घेऊ नये. पक्षाच्या पडत्या काळात आपल्या खांद्याला खांदा लावून कोण सोबत होते, अशांचा विचार करा; तरच संघटना ताकदीने पुढे जाईल.’’


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com