कुरुंदकरच्या हाळोलीतील फार्म हाऊसची झडती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

आजरा -  सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी गोरे-बिंद्रे खून प्रकरणातील प्रमुख संशयित पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या हाळोली (ता. आजरा) येथील फार्म हाऊसची झडती नवी मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने घेतली. सुमारे सव्वा तास पथक येथे तळ ठोकून होते.

आजरा -  सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी गोरे-बिंद्रे खून प्रकरणातील प्रमुख संशयित पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या हाळोली (ता. आजरा) येथील फार्म हाऊसची झडती नवी मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने घेतली. सुमारे सव्वा तास पथक येथे तळ ठोकून होते. येथे त्यांनी काही संशयित वस्तू मिळते का, याची पाहणी केली. त्यांना येथे काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे समजते. यावेळी त्यांनी फार्म हाऊसवरील कुरुंदकरच्या नोकराच्या मुलाची अर्धा तास चौकशी केली. 

सहायक पोलिस निरीक्षक श्री. माने व श्री. सरफरे यांच्यासह ६ पोलिस कर्मचारी एका विशेष गाडीतून आजऱ्यात आले. आजरा पोलिसांशी संपर्क साधून मदतीला काही पोलिस कर्मचारी घेतले; पण पथक पाच वाजता आजऱ्यात आल्यानंतर पोलिस ठाण्यात न जाता थेट हाळोलीच्या दिशने गेले. सायंकाळी सव्वापाचच्या सुमाराला पथक फार्म हाऊसवर पोचले. त्यांनी सोबत कुरुंदकरच्या खासगी गाडीवर असलेला चालक कुंदन भंडारीला आणले होते. त्यानेच फार्म हाऊस दाखवल्याचे समजते. पथकाने परिसराची पाहणी केली.

परिसरात संशयित काही वस्तू मिळतात का, हे पाहिले. फार्म हाऊसची झडती घेतली. त्यांना येथे काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे समजते. त्यांनी फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कुरुंदकरच्या नोकराच्या मुलाची अर्धा तास कसून चौकशी केली. या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे समजते. तपासात गोपनीयता पाळावी लागत असल्याने तपासाबाबत अधिकाऱ्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. संशयित महेश फळणीकरने या प्रकरणाविषयी तोंड उघडण्यापूर्वी पथकाने एक दिवस आदी कुरुंदकरच्या आजऱ्यातील नातेवाइकांच्या घराची झडती घेतली होती.

फार्म हाऊस केंद्रस्थानी
हाळोली येथे कुरुंदकरने सहा-सात वर्षांपूर्वी तीन एकर जागा घेऊन छोटे फार्म हाऊस बांधले आहे. येथे त्याचे व मित्रमंडळीचे येणे जाणे होते. हे फार्म हाऊस आजरा-सावंतवाडी रस्त्यालगत असल्याने त्याच्या मित्रमंडळींची वर्दळ असावयाची. त्यामुळे हे फार्म हाऊस या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आले आहे.

Web Title: Kolhapur News Ashwini Bidre Murder case