बिद्रे खून प्रकरणी फळणीकरच्या घराची झडती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

आजरा - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांच्या खून प्रकरणातील संशयित व पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याचा मित्र महेश फळणीकर याच्या येथील घराची मुंबई येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने झडती घेतली. तब्बल साडेतीन तास पथक त्यांच्या घरी तळ ठोकून होते.

आजरा - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांच्या खून प्रकरणातील संशयित व पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याचा मित्र महेश फळणीकर याच्या येथील घराची मुंबई येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने झडती घेतली. तब्बल साडेतीन तास पथक त्यांच्या घरी तळ ठोकून होते.

पथकाने फळणीकरचे भाऊ व वडिलांकडे चौकशी केली. घरात काही संशयास्पद वस्तू मिळते का ते पाहिले; पण त्यांनी केलेल्या चौकशीचा तपशील व माहिती मिळू शकली नाही.
आज दुपारी अडीचच्या सुमाराला गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक येथे दाखल झाले. सहायक पोलिस निरीक्षक जय चव्हाण व श्री. सरफरे यांसह सहा कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश होता. पथकाने घरातील प्रत्येक खोलीची, कपाटे, कागदपत्रे, परसदार व परिसराची तपासणी केली. त्यांनी शेजाऱ्यांकडेही चौकशी केली. ही तपासणी अत्यंत गोपनीय ठेवली होती. गुन्हा अन्वेषणच्या पथकाने संशयित महेश फळणीकर याला सोबत आणले होते. झडतीत पथकाला विशेष काही मिळाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

फळणीकर याला चौदा दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. आज (ता. ११) कोठडीची मुदत संपते. त्या पार्श्‍वभूमीवर आज गुन्हा अन्वेषणचे पथक येथे आले होते. हे पथक आजऱ्याहून कुरुंदकरच्या हाळोली येथील फार्म हाऊसवर जाणार असल्याची चर्चा या वेळी होती; पण पथक फळणीकराच्या घराची झडती घेऊन थेट कोल्हापूरकडे रवाना झाले. प्रमुख संशयित कुरुंदकर याच्या नातेवाइकांचे घर सोमवार पेठेत आहे. या घरापासून काही अंतरावर गणपत गल्ली येथे फळणीकरचे घर आहे. त्यांची बालपणापासून मैत्री आहे. त्यामुळे त्यांचे एकमेकांशी अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत. दोघांचेही एकमेकांकडे येणे जाणे होते.

कुरुंदकरचे काही मित्र रडारवर
तपास अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाविषयी विचारणा केली असता त्यांनी तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगितले. मात्र, चौकशीचा तपशील सांगितला नाही. या प्रकरणात कुरुंदकरच्या आणखी दोन बालपणीच्या मित्रांची चौकशी झाली आहे. आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्‍यता आहे.

गणपत गल्लीत सन्नाटा
फळणीकर याच्या घरी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आल्यावर गल्लीत सन्नाटा पसरला. दरम्यानच्या काळात रस्त्यावर ये-जा नव्हती. काही जण घराच्या खिडकीतून, गॅलरीतून फळणीकर याच्या घरात काय चालले, हे पाहात होते.

Web Title: Kolhapur News Ashwini Bidre Murder case