पोलिस ठाण्यात तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

कोल्हापूर - ‘‘मला मारहाण झाली आहे, माझी तक्रार घ्या, नाही तर मी स्वतःला पेटवून घेतो...’’ असे म्हणत तरुणाने जुना राजवाडा पोलिस ठाण्यातच अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. गुरुवारी (ता. १०) रात्री उशिरा हा प्रकार घडला. संबंधित तरुणावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानसागर ऊर्फ अंगद नामदेव कोंडरे (वय ३०, रा. बोंद्रेनगर) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, ज्ञानसागर कोंडरे बोंद्रेनगरात राहतो. त्याच परिसरात ओंकार अरुण तडुळे राहतो. दोघांत मारामारी झाली होती. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल करून दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती.

दरम्यान, गुरुवारी दुपारी याच कारणावरून ओंकारने ज्ञानसागरला मारहाण करून घरच्यांनाही मारण्याची धमकी दिली होती. रात्री उशिरा ज्ञानसागर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गेला. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्यात डिझेल भरलेली प्लास्टिक बाटली आणि काडेपेटी होती. ‘‘मला ओंकारने मारहाण केली आहे. माझी तक्रार घ्या,’’ असे तो सांगू लागला. यापूर्वी तक्रार घेतली आहे, आता नेमके काय झाले आहे, हे समजून घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत होते.

तेवढ्यात ज्ञानसागर ठाणे अंमलदारांच्या कक्षासमोरील मोकळ्या जागेत गेला. तेथे बाटलीतील डिझेल अंगावर ओतून घेऊन काडेपेटीने पेटवून घेण्याचा प्रयत्न करू लागला. ते पाहून पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्याला रोखले. हा प्रकार समजल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिल गुर्जर तातडीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली. या प्रकरणी पोलिसांनीच फिर्यादी होऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित ज्ञानसागर कोंडरेविरोधात कलम ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

त्याचबरोबर ज्ञानसागर कोंडरेची पोलिसांनी फिर्याद घेतली. त्यात त्याने काही दिवसांपूर्वी ओंकारचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने ज्ञानसागरकडे साडेचार हजार रुपयाची मागणी केली होती; मात्र ते देण्यास ज्ञानसागरने नकार दिला. त्यावरून गुरुवारी दुपारी ओंकारने त्याला मारहाण केली. पुन्हा रात्री धक्काबुक्की करत ओंकारने गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून नेल्याचे म्हटले आहे. ओंकारवर कलम ३८५ व ३९२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Attempts to burn by youth in police station