२७ रिक्षाचालकांनी दिली मोफत सेवा 

२७ रिक्षाचालकांनी दिली मोफत सेवा 

कोल्हापूर - कोल्हापूर शहरातून दिवसभर रिक्षा धावणे यात नवे काही नाही. पण आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने २७ रिक्षा प्रवाशाकडून एक पैसाही भाडे न घेता दिवसभर धावल्या. त्यांनी गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या लोकांना मोफत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले व सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले. विशेष म्हणजे, एवढे करूनही आपण यात काही फार मोठे नाही केले असे विनम्रतेचे भावच या रिक्षा चालकांनी  व्यक्त केले. 

आज भुरभुरणाऱ्या पावसातून बाप्पाला सांभाळत घरी नेणाऱ्या अनेक कुटुंबांना या रिक्षाचालकांनी आधार दिला.  गंगावेश व पापाची तिकटी येथून आज सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ही सेवा चालू राहिली. गेली सात वर्षे आरिफ पठाण हा रिक्षा चालक एकटा अशी सेवा देत होता. यावर्षी त्याच्या सोबत अन्य २४ रिक्षाबांधव सहभागी झाले. त्यांनी चक्क गंगावेशेतील ‘मोफत रिक्षा’ असे जाहीर करून मंडपच घातला व तेथे हे सर्वजण रिक्षा घेऊन रांगेने उभे राहिले. आज सकाळपासून पावसाची भुरभुर चालू होती. त्यामुळे लांब राहणाऱ्यांना मुर्ती आणि स्वतःही न भिजता जाण्याची खबरदारी घेताना कसरत करावी लागत होती. त्यांना या रिक्षाचालकांची खूप मोलाची मदत झाली. 

लोक मोफत रिक्षा म्हणून रिक्षात बसत होते. पण घराच्या दारात उतरताना रिक्षाचालकांचे आभार मानत ‘नाममात्र भाडे तरी घ्या’ असा आग्रह धरत होते. ‘एक कप चहा तरी घ्या’ अशी विनंती करत होते. पण रिक्षा चालक ते विनम्रपणे नाकारत होते व लगेच परत गंगावेशीत येत होते.

या रिक्षा चालकांनी केवळ शहरातच नव्हे तर पाचगाव, कळंबा, फुलेवाडी, विक्रमनगर, उचगाव इथपर्यंत गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्यांना मोफत पोहोचवले. प्रत्येकाने साधारण २० ते २२ जणांना आपली सेवा दिली. आपण किती किलोमीटर सेवा दिली आणि किती रुपयांचे पेट्रोल खर्ची पडले याची त्यांनी चर्चाच टाळली. 

यांनी राबविला उपक्रम 
गंगावेशीतून आरिफ पठाण, विकी देसाई, राजकुमार ढवळे, राजू पाटील, शेखर कोळेकर, सचिन केळुसकर, जयंत जाधव, प्रविण पोवार, अमित खाडे, विलास लोहार, प्रदीप जाधव, फिरोज शेख, बाळासाहेब पाटील, सुरेश करले, प्रकाश पोवार, दीपक पोवार, प्रफुल्ल खंदारे, विनीत पाटील, दिलीप कोठावळे, जीवा खांडेकर, जयसिंग खांडेकर, बाळ महाराज पाटील, सुहास शेटे, सतीश साखतकर, विकास धाडणकर यांनी व पापाची तिकटी येथून सुनिल पाटील, रामचंद्र चव्हाण या रिक्षा चालकांनी भाविकांना मोफत सेवा दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com