पासिंगसाठीही घ्यावी लागते अपॉईंटमेंट 

राजेश मोरे
शनिवार, 29 जुलै 2017

कोल्हापूर - रिक्षा, टेंपो, माल वाहतूक ट्रक अशा वाहनांचे मुदतीत पासिंग करण्यासाठी वाहन मालकांच्या अंगावर काटा उभारावा, अशी स्थिती प्रादेशिक परिवहन विभागात निर्माण झाली आहे. त्यासाठी आठ दिवस अगोदर लेखी अपॉईंटमेंट घ्यावी लागते. तरीही वेळेत नंबर येईल की नाही, याची खात्री नाही. त्यातूनही नंबर आलाच तर त्रुटी निघतात. तपासणीसाठी पुन्हा तपासणी फी भरायची वेळ आहेच अथवा प्रतिदिन ५० रुपये दंड सोसावा लागतो. हे चित्र पाहता कार्यालयाने प्रशासकीय मनुष्यबळ वाढविण्याची मागणी होत आहे. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पासिंगसाठी येणाऱ्या रिक्षा, टेंपो, मालवाहतूक ट्रक आदींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशा वाहनांचे पासिंग सध्या कॅम्पमध्ये (शिबिरात) करणे बंद केले आहे. त्यामुळे पासिंगला येणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रिक्षा पासिंगसाठी ७००, तर ट्रकला ८०० रुपये शुल्क मालकाला भरावे लागते. त्रुटी आढळल्यानंतरचे तपासणी शुल्क रिक्षाला ४००, तर ट्रकला ६०० रुपये आकारले जाते. वाहनांच्या तुलनेत अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नाहीत. 

सध्या वाहनांचे पासिंग शिये फाट्यावजळ केले जाते. आरटीओ कार्यालयाने दर दिवशी वाहने पासिंग करण्याचा कोटा निश्‍चित केला आहे. सरासरी सोमवार व मंगळवार या दोन दिवसांसाठी सुमारे १३० वाहने, तर इतर दिवशी सुमारे १०० वाहने असा तो कोटा आहे. वाहनांच्या पासिंगसाठी वाहन मालकाला सध्या आरटीओ कार्यालयात जाऊन लेखी अपॉईंटमेंट घ्यावी लागते. त्यानुसार नियोजित दिवशी वाहन पासिंगसाठी शिये फाट्यावर घेऊन जावे लागते. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपॉईंटमेंट सध्या आठ दिवसांनंतरची मिळू लागली आहे. 

काल ३१ जुलैची अपॉईंटमेंट दिली जात होती. वेळेत वाहनांचे पासिंग न केल्यास प्रतिदिन वाहनांना ५० रुपये दंड कार्यालयाकडून आकारला जातो. दुसरा, चौथा शनिवारसह शासकीय सुटीमुळे दंडाचा भुर्दंड बसायला नको, याकरिता चार-आठ दिवस अगोदर अपॉईंटमेंट वाहन मालकांकडून घेतली जात आहे. 

अपॉईंटमेंट मिळाली तर ठरलेल्या दिवशी शिये फाट्यावर वाहन घेऊन जायचे. जाताना वाहन ओके कंडिशनमध्ये असायला हवे. तपासणीत त्रुटी निघाल्या तर पुन्हा अपॉईंटमेंट घ्यावी लागते. त्यासाठी वेगळे तपासणी शुल्क भरावे लागते. यात वाहनधारकांचा वेळ, श्रम व पैसा खर्च होऊ लागला आहे. दगडाखाली हात सापडलेल्या वाहनधारकांच्यात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य वाहनधारक याबाबत पुढे येऊन बोलत नाहीत. आरटीओ कार्यालयाने याची दखल घेऊन पासिंगसाठीच्या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी त्यांच्याकडून मागणी केली जात आहे. 

वाहनधारकांची मागणी  
वाहनाच्या पासिंगसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा
परिवहन कार्यालयातच सुविधा उपलब्ध करून द्या
ज्या त्या दिवशी पासिंगची पूर्तता करा
अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहन मालकांकडून दंड आकारणी नको.

Web Title: kolhapur news auto rickshaw rto