आव्हान २०१७ शिबिरास शिवाजी विद्यापीठात प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

कोल्हापूर - कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी आपत्तीत सापडलेल्यांना वाचविणे जितके महत्त्वाचे तितके त्यांना मदतीसाठी जाणाऱ्यांनी स्वतःची सुरक्षा जपणेही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज सकाळी येथे केले. 

कोल्हापूर - कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी आपत्तीत सापडलेल्यांना वाचविणे जितके महत्त्वाचे तितके त्यांना मदतीसाठी जाणाऱ्यांनी स्वतःची सुरक्षा जपणेही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज सकाळी येथे केले. 

महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती यांचे कार्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या आव्हान २०१७  राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिरास विद्यापीठाच्या प्रशस्त लोककला सभागृहात प्रारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. राज्यभरातून आलेल्या राष्ट्रीय येवा योजनेच्या सुमारे १२०० स्वयंसेवकांच्या उत्साहात पहिल्या दिवशीच्या प्रशिक्षण सत्रास कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. 

या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, एनडीआरएफचे निरीक्षक सी. डी. इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड उपस्थित होते.  राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी या प्रशिक्षण शिबिरामधून १०० उत्कृष्ट शिबिरार्थी निवडून त्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तळेगाव येथील शिबिरात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली. 

एनडीआरएफचे निरीक्षक एस. डी. इंगळे यांनी शिबिरार्थींना शिबिराविषयी थोडक्‍यात माहिती दिली. त्यानंतर विद्यापीठाच्या पाच विविध सभागृहांत प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षणात एन.डी.आर.एफ.चे मार्गदर्शक योगा, भूमी आपत्ती व्यवस्थापन, जल आपत्ती व्यवस्थापन, जीवरक्षा आदींविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

उद्‌घाटन समारंभ उद्या सायंकाळी 
शिबिराचे औपचारिक उद्‌घाटन उद्या (ता. २ जून) दुपारी चार वाजता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. लोककला सभागृहात हा कार्यक्रम होईल.

Web Title: kolhapur news avan 2017 camp start in shivaji university