शटरचा दर्जा सुधारा; अन्यथा दुकान फोडलेच

राजेश मोरे
शनिवार, 6 जानेवारी 2018

कोल्हापूर - चोरट्यांना रोखायचे असेल तर दुकानाच्या शटरचा दर्जा सुधारा... असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. दुकानाला बसविलेल्या हलक्‍या दर्जाच्या शटरवर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. 

कोल्हापूर - चोरट्यांना रोखायचे असेल तर दुकानाच्या शटरचा दर्जा सुधारा... असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. दुकानाला बसविलेल्या हलक्‍या दर्जाच्या शटरवर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. 

दुकान, व्यवसाय, कार्यालयासाठी सर्रास शटरचा वापर केला जातो. दुकानाला तीन प्रकारचे शटर सध्या बघायला मिळतात. जागा कमी लागणारे आणि कमी खर्चात बसवता येणाऱ्या पारंपरिक शटरलाच मालक वर्गाकडून पसंती दिली जाते. त्याची गुणवत्ता, दर्जा अगर सुरक्षितता तपासली जात नाही. याचा फायदा चोरट्यांनी उचलण्यास सुरुवात केली आहे.

शटरला सायरन आणि दुकानातील सीसीटीव्हीचा अभाव असेल तर चोरट्याचे आणखी फावते. शटरला लावलेले कुलूप तोडायचे अगर शटरच उचकटायचे आणि आत शिरून लाखोंच्या ऐवजावर हात साफ करण्याचे काम चोरटे करू लागले आहेत. वर्षभरापूर्वी गजबजलेल्या पाच बंगला परिसरातील मोबाईल शॉपीचे शटर चोरट्यांच्या टोळीने उचकटले. त्यातील लाखो रुपयांचे मोबाईल संच लंपास केले; पण अद्याप ते चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

दुकानातील किमती ऐवजाच्या सुरक्षिततेसाठी शटरच्या दर्जाला प्राधान्य दिले पाहिजे. दर्जायुक्त पॅनेल फोल्डिंग डोअर आणि रिमोट डोअरला मागणी वाढत आहे. शटरला सायरन बसविण्याकडेही दुकानमालकांचा कल वाढू लागला आहे. 
- प्रवीण करांडे 

  फॅब्रिकेशन व्यावसायिक

अशा पद्धतीने शहरासह जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अनेक चोऱ्या झाल्या. कालच गांधीनगर येथील तब्बल ३२ दुकानांची शटर उचकटून चोरट्याने लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला. घडलेल्या या प्रकारामुळे दुकानाला लावलेल्या शटरच्या दर्जाबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. पाच फुटापेक्षा जास्त लांबी असणाऱ्या दुकानांना बसविण्यात आलेल्या शटरचा दर्जा आणि सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह उभा राहिले आहे. लांबी अधिक असणारी शटर उचकटणे चोरट्यांना शक्‍य होते. याचा विचार व्यावसायिकांनी करण्याची वेळ आली आहे. 

शटर बसविण्याचा त्याच्या प्रकारानुसार सरासरी दर हा १५० स्केअर फुटापासून ते ७५० स्केअर फुटापर्यंत आहे. दर्जायुक्त शटर बसवा, असे जेव्हा फ्रॅब्रिकेशन व्यावसायिक सुचवितो, त्या वेळी दुकान मालकांकडून जागेचा आणि किमतीचा विचार केला जातो. पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावण्याबरोबर दुकान मालकांचे शटरच्या दर्जा व सुरक्षिततेबाबतही प्रबोधनासाठी आता पुढे येण्याची वेळ आली आहे. 

सेट्रल लॉक हवेच...
दरोडा पडलेल्या दुकानांच्या शटर्सना सेंट्रल लॉक नव्हते. सेंट्रल लॉक नसल्यामुळे छोट्या जॅकच्या सहाय्याने शटर उचकटणे सोपे गेले. शटरच्या मधोमध चारचाकीचे छोटे जॅक लावून वर उचलले जाते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी शटर उचकटते. जर शटरला सेंट्रल लॉक असते तर असे प्रकार टाळता आले असते.

सुरक्षेनुसार शटरचे प्रकार

  • सेंट्रल लॉक शटर - दोन्ही बाजूसह शटरच्या मध्यभागी लोखंडी बॉक्‍स असून त्यालाही लॉक करण्याची सुविधा असते. 
  • रिमोट डोअर  - रिमोटद्वारे हा दरवाजा उघडला जातो. सुरक्षिततेसाठी पासवर्डची सोय केलेली असते. ॲक्‍सेसरीज बसवून सायरनचीही सोय करता येते.
  • पॅनेल फोल्डिंग डोअर -  सुरक्षिततेच्या दृष्टीने हे शटर दर्जायुक्त मानले जाते. बॉल बेरिंग रोलरमध्ये लोखंडी चांगल्या दर्जाचा दरवाजा बसविला जातो. 
Web Title: Kolhapur News to avoid robbery Improve shutter quality