अन्नत्याग आंदोलन ही निर्णायक लढाई : बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - ‘आंदोलन करणारे हात ज्या दिवशी, समाजसेवेकडे वळतील त्याच दिवशी समाजातील दुःख दारिद्र्य दूर होईल’, असे मत आमदार बच्चू कडू यांनी आज व्यक्त केले. अन्नत्याग आंदोलन ही निर्णायक लढाई आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी राज्य शासनाला दिला. प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे शाहू स्मारक येथे मेळावा झाला. त्या वेळी कडू बोलत होते. 

कोल्हापूर - ‘आंदोलन करणारे हात ज्या दिवशी, समाजसेवेकडे वळतील त्याच दिवशी समाजातील दुःख दारिद्र्य दूर होईल’, असे मत आमदार बच्चू कडू यांनी आज व्यक्त केले. अन्नत्याग आंदोलन ही निर्णायक लढाई आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी राज्य शासनाला दिला. प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे शाहू स्मारक येथे मेळावा झाला. त्या वेळी कडू बोलत होते. 

ते म्हणाले, की अमरावती येथे १३ ऑक्‍टोबरपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहे. दिव्यांग, शेतमजूर, विधवांसह अन्य प्रश्‍न घेऊन आंदोलन होत आहे. मुख्यमंत्री त्यावर ठोस आश्‍वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. समाजातील शेवटच्या घटकाविषयी सामाजिक जाणीव संपत चालली आहे का?, असे सध्याचे चित्र आहे. नेता, पुतळा, एखादे मंदिर याकडे लोकांचा ओढा असतो, तितका अपंगांसह असह्य दुःखी बांधवांसाठी नसतो. नेत्यांना अपंगांच्या घरी न्यायला हवे, त्याचवेळी त्यांना दु:ख काय असते हे समजेल. भविष्यात निधी भेटेल, पैसा भेटेल; पण भूमिका काय हे महत्त्वाचे आहे. 

राजकारणासाठी नव्हे तर मोठ्या संघर्षासाठी उभे राहावे लागेल. आज अनेक अपंग बांधव असे आहेत, की ज्यांना दुनियादारी ठाऊक नाही. त्यांचे दुःख मोठे आहे. त्यांना एकत्रित करण्याचे काम करावे लागेल.

जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, ‘सीपीआर’चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, करवीरचे सभापती प्रदीप झांबरे, प्रशांत पटलवार, उत्तम दुधाणे, अफजल देवळेकर, वैशाली चव्हाण, तुकाराम पाटील, संजय जाधव, संदीप दळवी, विकास चौगुले, प्रशांत म्हेत्तर, सरदार पाटील आदी उपस्थित होते. विनोद कदम व पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

...तर दिव्यांग हद्दपार होतील
श्री. कडू म्हणाले, की नैवेद्याची ताटे गरिबांच्या घरी जातील, त्याच दिवशी खरे देवपण येईल. बेईमानांची दिवाळी साजरी होते. मात्र, इमानाने वागणाऱ्यांची दिवाळी काळोखात होते. कापसाचे जो उत्पादन करतो, त्यास निर्यातबंदी आणि कापड तयार करणाऱ्यास मुभा, अशी सरकारची विचित्र धोरणे आहेत. गरिबांवर अन्याय आणि श्रीमंताला न्याय अशी ही पद्धत आहे.

२०१६ नंतर अपंगांसाठीचा जो कायदा आहे, त्यात नव्याने २१ दिव्यांगांचा समावेश आहे. यातून मूळ दिव्यांग हद्दपार होईल की काय? अशी स्थिती आहे. तसे झाल्यास रोखठोक भूमिका घ्यावी लागेल. ज्या कार्यकर्त्याची निष्ठा पद, हारतुरे आणि सन्मानावर असते, तो तेथेच थांबून राहतो. कोल्हापूरच्या टीमचे हेच वैशिष्ट्य आहे, की संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून धन्यता मानतात.

 

Web Title: kolhapur news bacchu kadu speech