माणुसकी हीच जात... मानवता हाच धर्म...

सुधाकर काशीद
गुरुवार, 10 मे 2018

कोल्हापूर - ज्यांच्या घरात कोणीही कमावत नाही किंवा काही दुर्दैवी घटनेत एखादं घर उघड्यावर पडले आहे, अशा १४० घरांत दर महिन्याचा पूर्ण बाजार हे भरतात... ज्यांच्या घरात लग्नाची मुलगी आहे; पण लग्नाचा खर्च करण्याची आई-बापाची ताकद नाही, अशा मुलींच्या लग्नासाठी हे २५ हजार रुपये देतात... एवढंच काय, औषधोपचार खर्च किंवा अचानक उद्‌भवणारी आपत्ती यासाठीही हे लगेच धावून येतात. त्यांनी अशा प्रसंगात या वर्षभरात तब्बल ३९ लाख ५७ हजार २८५ रुपयांची गरिबांना मदत केली आहे. हे सारे करणारी ही मंडळी कोणी धनाढ्य नाहीत. कोणी राजकारणी नाहीत. हे सारेजण येथील मुस्लिम समाजाच्या बैतुलमाल समितीचे सदस्य आहेत.

कोल्हापूर - ज्यांच्या घरात कोणीही कमावत नाही किंवा काही दुर्दैवी घटनेत एखादं घर उघड्यावर पडले आहे, अशा १४० घरांत दर महिन्याचा पूर्ण बाजार हे भरतात... ज्यांच्या घरात लग्नाची मुलगी आहे; पण लग्नाचा खर्च करण्याची आई-बापाची ताकद नाही, अशा मुलींच्या लग्नासाठी हे २५ हजार रुपये देतात... एवढंच काय, औषधोपचार खर्च किंवा अचानक उद्‌भवणारी आपत्ती यासाठीही हे लगेच धावून येतात. त्यांनी अशा प्रसंगात या वर्षभरात तब्बल ३९ लाख ५७ हजार २८५ रुपयांची गरिबांना मदत केली आहे. हे सारे करणारी ही मंडळी कोणी धनाढ्य नाहीत. कोणी राजकारणी नाहीत. हे सारेजण येथील मुस्लिम समाजाच्या बैतुलमाल समितीचे सदस्य आहेत. प्रत्येकाच्या वाट्याला जी काही कमी-अधिक कमाई येते, त्यातून काही रक्कम (सतका) बाजूला काढून ही मदत केली जात आहे. किंबहुना केवळ मुस्लिमच नव्हे तर खरोखरच गरजू असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी ही समिती आधार बनली आहे. 

बैतुलमाल समिती म्हणजे गरजूंना मदत करण्यासाठी धावणारी एक कार्यकर्त्यांची यंत्रणा आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर या समितीकडे जे कोणी स्वेच्छेने निधी देतात, तो एकत्रित संकलित केला जातो किंवा विविध उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी ठेवलेल्या व त्यात रुपया - दोन रुपयापासून जमा होणारा निधी एकत्रित केला जातो. या समितीकडे येणाऱ्या प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवला जातो. एखादा गरजू या समितीकडे आला की त्याची निकड पाहिली जाते. चार पाच सदस्यांकडून तातडीने परिस्थितीची पाहणी केली जाते व फार वेळ न लावता संबंधिताला मदत पोचवली जाते. 

या समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार कोल्हापुरातील १४० कुटुंबात कोणीही मिळवते नाही. काही कारणांनी ही घरे उघड्यावर पडलेली आहेत. अशा १४० घरांत साखर, तेल, धान्य, कडधान्य, चटणी, मिठासह सर्व साहित्य पोचवले जाते. त्यावर पाच माणसे महिनाभर जगू शकतात. याशिवाय या वर्षात समितीच्या पुढाकारातून १७ मुलींच्या लग्नासाठी २५ हजार रुपये देण्यात आले. ज्यातून त्या मुलींच्या बापाने लग्न करून दिले. याबरोबरच ज्यांना काही गंभीर आजार आहेत; पण रोज औषधाचा खर्च ते करू शकत नाहीत त्यांच्या औषधासाठी रक्कम देण्याची या समितीकडे तरतूद आहे. विशेष हे की एवढी मदत करूनही त्यांनी वर्षभरात कोठेही गवगवा केलेला नाही. मदत देताना फोटो बातमी वगैरे तर खूप लांबची बाब आहे. 

समारंभातून मदत करणे निषिद्ध 
समितीचा एकही सदस्य आपले नाव वृत्तपत्रात किंवा अन्य ठिकाणी जाहीर करत नाही. किंबहुना ज्याला ते मदत करतात, ती मदतही गाजावाजा न करता केली जाते. जाहीर समारंभातून मदत करणे निषिद्ध मानले जाते. 

कष्टाची कमाईच...
बैतूलमाल समितीसाठी निधी गोळा करताना देणगीदार काळ्या धंद्याशी संबंध नाही किंवा त्याने सावकारीतून पैसे मिळविलेला नाही, याची खातरजमा करून घेतली जाते. ज्याने कष्टातूनच कमाई केली आहे, अशा व्यक्तीकडूनच निधी स्वीकारला जातो.

छाननी यंत्रणा सक्षम
माणुसकी ही जात व मानवता हा धर्म हे बैतुलमाल समितीचे ब्रीदवाक्‍य आहे. कोणत्याही समाजातील व्यक्ती येऊदे, त्याची छाननी करून त्याला मदत हेच त्यांचे काम आहे. मात्र ही मदत योग्य व्यक्तीलाच, गरजूलाच पोचावी यासाठी या समितीची छाननी यंत्रणा सक्षम आहे. 

Web Title: Kolhapur News Baitulmal Sammity speical story