कोल्हापूरात दोन डंपर प्लास्टिक जमा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

कोल्हापूर - शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाच्या अंमलबजावणीस पालिकेने आजपासून सुरवात केली. पहिल्या दिवशी दोन डंपर प्लास्टिक जमा झाले. आदेशानुसार १५ दिवस जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर २४ एप्रिलपासून प्लास्टिक सापडेल त्याच्यावर कारवाई होणार आहे.

कोल्हापूर - शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाच्या अंमलबजावणीस पालिकेने आजपासून सुरवात केली. पहिल्या दिवशी दोन डंपर प्लास्टिक जमा झाले. आदेशानुसार १५ दिवस जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर २४ एप्रिलपासून प्लास्टिक सापडेल त्याच्यावर कारवाई होणार आहे.

पूर्वी कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी होती. त्यामुळे असे प्लास्टिक सापडेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत होती. नव्या आदेशामुळे दंडात्मक कारवाईबरोबरच कारावासाची तरतूद आहे. पालिकेने प्लास्टिक बंदीसाठी चार पथके तयार केली आहेत. एका पथकात पाच आरोग्य निरीक्षक आणि १५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पालिकेने व्यापारी व नागरिकांना प्लास्टिक जमा करण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी आज महाद्वार रोड, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, पानलाईन, मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी परिसरात फेरी मारली. दिवसभरात त्यांनी दोन डंपर प्लास्टिक जमा केले. प्लास्टिक जमा करण्याची पालिकेची मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा प्लास्टिक ॲण्ड डिस्पोजल ट्रेडर्स असोसिएशनने आयुक्‍त डॉ. चौधरी यांना पर्याय उपलब्ध होईपर्यंत व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की ठोस पर्याय न सांगता घेतलेल्या या निर्णयामुळे प्लास्टिक विक्रीची दुकाने जवळजवळ बंद झाली आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात मूर्ती झाकण्यासाठी मोठ्या प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. त्यांची विल्हेवाट कशी व कोठे लावायची? या निर्णयामुळे सर्व व्यापारी व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामागारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी यातून मार्ग काढावा. निवेदनावर अध्यक्ष विनोद वाधवा, उपाध्यक्ष समीर तांबोळी व सचिव पुरुषोत्तम बेंडके यांच्या सह्या आहेत.

Web Title: Kolhapur news Ban on Plastic