लता, आशा, किशोर, रफी घ्या... पायजे ते वाजवतो!

music
music

कोल्हापूर : "ओंकार स्वरूपा' हे भक्तिगीत, "अष्टविनायका तुझा महिमा कसा', "गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया...' अशी मंगलमय गीते असोत किंवा लोकसंगीताचा ताल, सूर यापासून ते "गोरे गोरे गालो पे काला काला चष्मा', "वाजले की बारा', "झिंग झिग झिंगाट'पर्यंतच्या धडाकेबाज गीतांपर्यंते सूर तर मध्येच "प्रीतीचं झुळ झुळ' पाणीही वाजले... तुम्ही मागाल तर लता, आशा, किशोर, रफीपासून सचिनपर्यंतच्या स्वरसाजाची आठवण आम्ही देतो, तुम्हाला हवा तो डान्स करा, जणू अशा बोलीवर आज ब्रॉस बॅंडवाल्यांनी गणेशोत्सवातील पहिलाच दिवस चैतन्यदायी केला. 

डॉल्बीचा कितीही दणका असला तरी तो मशीनचा दणका आहे; पण त्यापेक्षा कितीतरी अधिक कष्टपूर्वक केलेल्या तालमीतून तयार झालेल्या एकाहून एक सरस, सुमधूर गीतांच्या धून वाजवत 40 ते 50 बॅंड पथकांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकांचा दिमाख वाढविला. कोल्हापुरात आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल मैदान, पापाची तिकटी व बापट कॅम्प येथे गेल्या दोन दिवसांपासून वाळवा, सांगली, इचलकरंजी, बोरगाव, होनगा बेळगाव, निपाणी, चिक्कोडी आदी भागातून बॅंड पथके मिरवणुककीसाठी आली होती. यातील अनेकांनी घरगुती गणपतीसमोर काही अंतर वाजत-गाजत मूर्ती नेण्याची प्रथा पाळली. त्यासाठी 500 ते दोन हजारांची बिदागी घेत व्यवसाय साधला. जवळपास तीनशेहून अधिक कलावंतांच्या रोजीरोटीला यामुळे आधार मिळाला. 

दिलबहार ब्रॉस बॅंडचे गायक लाला हल्ल्याळ म्हणाले, ""इयत्ता दुसरीपर्यंत शिक्षण कन्नडमध्ये झाले. मी चिक्कोडीचा आहे. मराठी वाचता-लिहिता येत नाही; पण मराठी 40 तर हिंदी 60 गाणी तोंडपाठ आहेत. गेली 25 वर्षे बॅंड पथकात काम करतो, एक गाणे आठ-दहा वेळा लक्षपूर्वक ऐकले की पाठ होते. ती सवय झाली आहे. त्यामुळे वाचून गाणे म्हणावे लागत नाही. महिला व पुरुष असा दुहेरी आवाज काढतो. यामुळे मला एका मिरवणुकीसाठी तीनशे ते पाचशे रुपये बिदागी मिळते. दिवसभरात तीन-चार मिरवणुकीत प्रत्येकी दहा-पंधरा गाणी सादर करतो. त्यासाठी बॅंडसोबत दोन महिने तालीम करतो.'' 

वादक सुरेश घडशी म्हणाले, ""बेंबीच्या देठापासून जोर लावून फुंकलेल्या सॅक्‍सोफोनमधील कर्णमधूर सूर सुरेल होऊन येतात. यासाठी सराव आवश्‍यक आहे. आज एक दिवस वाजविले की संपले, असे नाही. तर दोन महिने तालीम करतो. त्यासाठी रोज तीन-चार तास वाजवतो. तेव्हा मिरवणुकीत गीतांचा तालबद्ध ठेका कोणालाही नृत्याचा ताल धरायला लावतो. गेली 28 वर्षे मी वाजंत्री म्हणून काम करतो. 

पैशापेक्षा समाधान महत्त्वाचे 
दिवसभरात गणेशोत्सव मिरवणुकांत वाजवलेल्या ब्रास बॅंण्डमधील ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे. पण या प्रत्येकाच्या हातातील वाद्य वाजविण्याचे कौशल्य व महिला-पुरुषांच्या आवाजात सतत घशावर ताण देऊन गाणाऱ्यांनी दणकट आवाजाने बॅंडचे महत्त्व टिकवून ठेवले आहे. त्यामागे प्रचंड कष्ट असल्याची साक्ष लाभते. या कष्टाच्या तुलनेत त्यांना मिळाणारी दोन हजारांची बिदागी पुरेशी नसली तरी हा छंद दीर्घकाळ आनंद देणारा असल्याने वर्षानुवर्षे याच कलेचे समाधान लाभत असल्याने अधोरेखित होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com