अन्यायाविरोधात लढलेले जिंदादिल बापू!

अन्यायाविरोधात लढलेले जिंदादिल बापू!

लाखोंच्या गळ्यातील बनले ताईत; गोरगरिबांची अनेक कुटुंबे सावरली; जाती-धर्माच्या पलीकडे पोचले व्यक्तिमत्त्व
कोल्हापूर - प्रथमदर्शनी काही जुन्या माहितीवरून एखाद्या व्यक्‍तीसंदर्भात मत तयार होतं; पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच असतं, हे बापू बिरू वाटेगावकर यांच्याबद्दलच्या लोकांच्या भावना पाहून लक्षात आले. त्‍यांच्‍या आयुष्यातील सर्व घटना व घडामोडींचा विचार करता  त्यामागची कारणे, तत्कालीन परिस्थिती पाहता, त्यांनी दुसऱ्या कोणावरही होणारा अन्याय सहन न झाल्याने आपल्या पद्धतीने त्या अन्यायाचे निवारण केले.  त्‍यामुळेच ते  लोकांच्या गळ्यातील ताईत बनून गेले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी जो जनसमुदाय लोटला, त्यामुळे तर ते जातीधर्मांच्या पलीकडे पोहोचलेले दिसले. आज स्त्रिया सुरक्षित नाहीत, असे म्हणतो; पण बापू स्त्रियांच्या रक्षणासाठी गावगुंडांचा बंदोबस्त करू लागले. त्यासाठी पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरत राहिले. 

एका सर्वसामान्य कुटुंबातले बापू आपले स्वत:चे अध्यात्म जपत राहिले. अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उभे राहायचे, हे व्रत आयुष्यभर त्यांनी जपले. रांगडा तजेलदार चेहरा, झुलपेदार मिशी, डोक्‍यावर पटका, खांद्यावर घोंगडे अशा व्यक्‍तिमत्त्वाचे बापू गोरगरिबांचा आधारस्तंभ ठरले. खासगी सावकारी, जमिनीच्या प्रकरणात एखाद्या गरिबावर होणारी दडपशाही, एखाद्या सुनेचा एखाद्या कुटुंबात होणारा छळ यांविरोधात बापू उभे राहिले. कोठेही बळजबरी न करता केवळ गोरगरीब लोकांच्या प्रेमाचे कवच त्यांच्यासोबत सतत राहिले. 

त्यांनी अन्यायाविरोधात केलेल्या या काही कृत्यांमुळे त्यांना वैयक्‍तिक आयुष्यात खूप त्रास झाला; पण हा त्रास त्यांनी कधीही जाहीरपणे व्यक्‍त केला नाही. त्यांनी अध्यात्म व माणुसकीचा धर्म सांभाळला. त्यामुळे बापूंच्या तोंडून कधीही वाईट शब्द आला नाही. त्यांनी माताभगिनींचा कायम सन्मान केला. त्यामुळे त्यांचा ते आधार ठरले.

आतून मायेचा झरा....
कारागृहातून मुक्‍तता झाल्यानंतर बापूंना अनेक समारंभांत प्रमुख पाहुणे म्हणून मान मिळाला. साधी सोपी उदाहरणे देत बापूंनी समोरच्या माणसांना सल्ले दिले. ‘‘वाईट वंगाळ वागू नका,’’ हाच त्यांचा मुख्य सल्ला असे. वयाच्या नव्वदीनंतरही त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याकडे आपले सुख-दु:ख मांडण्यासाठी लोकांची रीघ लागत होती. बापू हे आतून मात्र मायेचा झरा होते. प्रथमदर्शनी त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वावरून तयार झालेले मत कसे चुकीचे होते, हे मात्र कळून चुकले!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com