पारंपरिक लोककलांचा केला जागर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

घरसंसार, करिअर अशा व्यापात गुंतलेल्या महिलांना एक दिवस आनंदानं आणि उत्स्फूर्त कलाविष्कारानं रंगविताना महाराष्ट्राची लोककला समृद्ध करण्याची संधी लाभली. धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही झिम्मा-फुगडी स्पर्धा रंगली.

कोल्हापूर - साद घालू गौरीला घरोघरी येण्याला
आनंद फुलवू घरोघरीला... 
मागणे मागू देवीला 
सुखी ठेव म्हणू 
लेकरं बाळं धन्याला
अशा सरस लोकगीतांच्या तालासुरावर हजारो महिलांनी नृत्याचा ठेका धरला. दहा हजार महिलांनी तल्लीन होत पारंपरिक गीतांवर ठेका धरीत भागीरथी महिला संस्थेच्या झिम्मा-फुगडी स्पर्धेत तादात्म्याची प्रचिती घेतली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या महिला तब्बल चार तास यात दंगून गेल्या...

घरसंसार, करिअर अशा व्यापात गुंतलेल्या महिलांना एक दिवस आनंदानं आणि उत्स्फूर्त कलाविष्कारानं रंगविताना महाराष्ट्राची लोककला समृद्ध करण्याची संधी लाभली. धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही झिम्मा-फुगडी स्पर्धा रंगली. मार्केट यार्डजवळील रामकृष्ण मल्टिपर्पज हॉल नटूनथटून, गजरा माळून, कोल्हापुरी साज- नथ-बिंदी अशा आभूषणांनी सजलेल्या, नऊवारी साडीत आलेल्या शेकडो महिलांनी गजबजून गेला.
अरुंधती महाडिक, रूपाली नांगरे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, महापौर हसीना फरास, डॉ. अनुश्री चौधरी, प्रकृती निगम-खेमणार, भारती संजय मोहिते, वडगावच्या उपनगराध्यक्षा प्रविता सालपे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

अरुंधती महाडिक म्हणाल्या, ‘‘महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि पारंपरिक खेळ जतन व्हावेत, या उद्देशानं राज्यातील सर्वात मोठ्या झिम्मा-फुगडी स्पर्धेचं आयोजन केले आहे. पुढील वर्षी ऑक्‍टोबरमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल. त्यातून जागतिक रेकॉर्ड करण्याचा मानस आहे. त्यासाठी महिलांनी उत्साही सहभाग दाखवावा.’’

शौमिका महाडिक म्हणाल्या, ‘‘अनेक स्त्रियांच्या यशात पुरुषांचाही वाटा असतो. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कुटुंबीयांसोबत जिल्ह्यातील अनेकांना शक्ती दिली आहे. तसेच अरुंधती महाडिक यांच्या कार्याचं आम्हाला कौतुक आहे.’’  

महापौर हसीना फरास यांनी भागीरथी महिला संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
रूपाली नांगरे-पाटील, डॉ. सौ. अनुश्री चौधरी, प्रकृती खेमणार-निगम यांनी भागीरथी महिला संस्थेतर्फे परंपरा जतन करतानाच महिलांच्या आर्थिक उन्नती करण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. स्पर्धास्थळी खासदार धनंजय महाडिक, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांनी भेट देत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.

सहजसेवा ट्रस्ट संस्थेतर्फे महिलांना मोफत जेवण दिले. संस्थेचे अध्यक्ष सन्मती मिरजे, प्रमोद पाटील यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी रुग्णवाहिका, डॉक्‍टरांचे पथक तैनात होते. स्पर्धेसाठी एकूण पाच लाख रुपयांची बक्षिसं जाहीर केली आहेत. सहभागी महिलांना प्रमाणपत्रे दिली.

प्रबोधनात्मक संदेश
झिम्मा-फुगडी, काटवट कणा, उखाणे, छुई फुई, घागर घुमविणे, सूप नाचविणे अशा पारंपरिक लोककला आणि खेळांमध्ये महिला  दंग झाल्या. प्रेक्षकांकडून मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद, संगीताची धून आणि पारंपरिक गीतं अशा वातावरणात स्पर्धेत रंगत आली. कोल्हापुरी फेटे, भगव्या टोप्या परिधान करून आलेल्या महिलांनी सादरीकरणाद्वारे समाजप्रबोधनात्मक संदेश दिले. गर्दी असूनही अपूर्व उत्साह व जल्लोषात स्पर्धा झाली.

Web Title: kolhapur news bhagirathi group arranged competition