खडसेंचा न्याय महेता, देसाईंना का नाही : भाई जगताप

निवास चौगले
रविवार, 13 ऑगस्ट 2017

स्वच्छ प्रतिमेचे आणि भ्रष्टाचार मुक्त असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र त्यांच्या 38 मंत्र्यांपैकी 21 मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. शासकीय सह्या- शिक्के असणारे पुरावे आम्ही त्यांना दिले आहेत. तरीही ते चौकशी लावत नाहीत. उलट आम्हालाच तुमची चौकशी लावू असे म्हणतात. माझे तर म्हणणे आहे आमचीही चौकशी करा पण तुमच्या ही मंत्र्यांची चौकशी करा. चौकशीतून काही पुढे आले नाही तर आम्ही तुमचे सरकार स्वच्छ आहे, असे समजू.

कोल्हापूर : भाजपाचे नेते एकनाथ खडसेंना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना एक न्याय का? असा सवाल आमदार भाई जगताप यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातले आहे. मात्र एकनाथ खडसेंचा राजीनामा घेतला. एकाच मंत्रिमंडळातील मंत्र्यांना वेगवेगळा न्याय देणारे सरकार स्वच्छ म्हणायचे काय? 
आमदार भाई जगताप आज कोल्हापुरात आले होते. येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार जगताप म्हणाले, "स्वच्छ प्रतिमेचे आणि भ्रष्टाचार मुक्त असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र त्यांच्या 38 मंत्र्यांपैकी 21 मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. शासकीय सह्या- शिक्के असणारे पुरावे आम्ही त्यांना दिले आहेत. तरीही ते चौकशी लावत नाहीत. उलट आम्हालाच तुमची चौकशी लावू असे म्हणतात. माझे तर म्हणणे आहे आमचीही चौकशी करा पण तुमच्या ही मंत्र्यांची चौकशी करा. चौकशीतून काही पुढे आले नाही तर आम्ही तुमचे सरकार स्वच्छ आहे, असे समजू. साडेबारा हजार हेक्‍टरचा गैरव्यवहार केला त्यांचा राजीनामा घेतला नाही. मात्र एमआयडीसीतील प्लॉटचे कमी पैसे घेतले म्हणून त्याचा राजीनामा घेतला. हा दुजाभाव का केला. मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतरही मुख्यमंत्री स्विकारत नाहीत तर त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे ? 

आमदार पुढे म्हणाले, "स्वतःला पारदर्श आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार म्हणणाऱ्यांच्या दोन वर्षातील काळात सर्वात अधिक भ्रष्टाचार झाला आहे. हे अहवालावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे ते नाकारू ही शकत नाही. तरीही सरकार भ्रष्टाचार मुक्त असे कसे म्हणतात हेच कळत नाही. केंद्रात भ्रष्टमंत्री आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत तरीही त्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत. ठाणे-कल्याण रोडवरील एका ग्रामीण भागातील बिल्डरला बाराशे एकर जागा दिली आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले मुख्यमंत्री क्‍लीन चिट देणारे मुख्यमंत्री आहेत, असे म्हणावे वाटते. हे अपयशी सरकार आहे.'' 

सुडबुद्धीचे सरकार असल्याचे सांगून आमदार जगताप म्हणाले, "2006 मध्ये आम्ही जीएसटी आणला तो 18 टकक्‍यांचा होता. मात्र या सरकारने आणला तो 28 टक्‍क्‍यांचा आहे. ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर छापे टाकायला लावले. देशभरात हीच स्थिती आहे. विरोधकांवर छापे टाकून स्वच्छ प्रतिमेची नैतिकता भाजपाने सांगू नये. केंद्रातील मंत्र्यांवर भ्रष्टाचारातून गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे नैतिकतेची भाषा भाजपाच्या नेंत्याच्या तोंडी शोभत नाही.''

Web Title: kolhapur news Bhai Jagtap criticize government