भजनी मंडळाची १२१ वर्षांची समृद्ध परंपरा

सुधाकर काशीद
सोमवार, 29 मे 2017

उत्तरेश्‍वर प्रासादिक मंडळाने जपला वारसा; चौथी पिढीही झाली सहभागी

उत्तरेश्‍वर प्रासादिक मंडळाने जपला वारसा; चौथी पिढीही झाली सहभागी
कोल्हापूर - उत्तरेश्‍वर पेठेतली रात्री दहाची वेळ. जेवून खाऊन कट्ट्यावर बसलेली पोरं वगळता तशी पेठेतल्या गल्लीबोळांत शांतता. दर सोमवारची रात्र मात्र या वातावरणाला अपवाद. दर सोमवारी रात्री महादेवाच्या देवळात भजन. तब्बल १२१ वर्षे ही परंपरा अखंड सुरू आहे. ढोलकी, पखवाज, टाळ, दिमडीचा झंझाळ सुरू होतो. तो ताल पेठेतल्या घराघरापर्यंत अलगद पोचतो. रात्र वाढेल तसा भजनाचा ताल रंगत जातो. भजनाचे सूर झोपेतच कानावर पडत असतात; पण त्या तालातच बहुतेकजण झोपेच्या अधीन होतात. किंबहुना गेली १२१ वर्षे प्रत्येक उत्तरेश्‍वरकर सोमवारच्या रात्री डोळे मिटता मिटता भजनाचाच ताल अनुभवतात. 

उत्तरेश्‍वर पेठेतील भजनाच्या या परंपरेला उद्या १२१ वर्षे पूर्ण होत आहेत. उत्तरेश्‍वर पेठ कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय चळवळीचे एक धगधगते केंद्र. या पेठेने कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण केली. भजन हा कोल्हापूरचा एक सांस्कृतिक वारसा. त्याची वेगळी ओळख उत्तरेश्‍वर पेठेने जपली. उत्तरेश्‍वरातील वाघाच्या तालमीजवळ महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. दोन्ही हातांच्या कवेत मावणार नाही एवढे मोठे शिवलिंग मंदिरात आहे. या मंदिराला स्वातंत्र्य चळवळीचाही इतिहास आहे. 

Web Title: kolhapur news bhajani mandal 121 years rich tradition