ऊस दरासाठी आंदोलनाची वेळच येणार नाही - मंत्री चंद्रकांतदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

ऊस उत्पादक सभासदांना अधिक दर मिळणार असल्याने यापुढे ऊस दरासाठी आंदोलन करण्याची वेळ येणारच नाही. एफ. आर. पी. पेक्षाही जादा दर देण्यात बिद्री साखर कारखाना राज्यात अव्वल राहील, असे प्रतिपादन महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

बिद्री - उसाची असलेली उपलब्धता व राज्य शासनाकडुन मिळाणाऱ्या सहकार्यामुळे साखर कारखान्यांना चांगले दिवस येणार आहेत. सोबतच ऊस उत्पादक सभासदांना अधिक दर मिळणार असल्याने यापुढे ऊस दरासाठी आंदोलन करण्याची वेळ येणारच नाही. एफ. आर. पी. पेक्षाही जादा दर देण्यात बिद्री साखर कारखाना राज्यात अव्वल राहील, असे प्रतिपादन महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

बिद्री (ता. कागल) येथील दुधसाखर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महालक्ष्मी शेतकरी विकास पॅनेलच्या विजयोत्सव मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.

श्री पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत चांगली राजकीय संस्कृती रूजवण्याची गरज आहे. निवडणुकीमुळे घराघरात तयार होणारी कटूता संपविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. निवडणुकीमुळे गढुळ होणारे वातावरण, होणारा अनाठायी खर्च व्यर्थच आहे. तो कोठेतरी थांबला पाहीजे. यासाठी आपण पुढाकार घेण्यास तयार असुन सर्वांनी आपआपसातील मतभेद विसरून दरडोई उत्पन्नात देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापुर जिल्ह्याला वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.

आमदार मुश्रीफ म्हणाले, विरोधकांनी दिलेल्या 9 जागांची ऑफर धुडकावुन लावत भाजपने आमच्या सोबत आघाडी करून आमच्यावर विश्‍वास दाखविला. यापुढे नुतन अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ या विश्‍वासास पात्र राहुन काम करतील. कारखान्याच्या प्रगतीसाठी लागणारे सहकार्य जिल्हा बॅंकेच्या माध्यमातुन करण्यासाठी मी प्रयत्नशिल राहाणार आहे.

यावेळी कारखान्याचे नुतन अध्यक्ष के. पी. पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांनीही मनोगते व्यक्त केली. नुतन अध्यक्ष के.पी.पाटील ,उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे व सर्व  संचालकांचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमास राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार नामदेवराव भोईटे, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशिल पाटील, युवराजबापु पाटील, भाजपचे बाबा देसाई, नाथाजी पाटील, राहुल देसाई, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे, भैया माने, पंचायत समिती सदस्य जयदिप पोवार, डी. एम. चौगले उपस्थित होते. आभार विठ्ठलराव खोराटे यांनी मानले.

ध्वनीप्रदुषण करणाऱ्या मोटारसायकलीवर कारवाईचा आदेश

पुंगळी काढुन फिरणाऱ्या मोटरसायकलच्या आवाजाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील संतापले. बंदोबस्तसाठी असलेल्या पोलीसांना त्यांनी या कार्यकर्त्यांच्या मोटरसायकली जप्त करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना दिल्या त्यामुळे कार्यकर्त्यांची पळताभुई थोडी झाली. पालकमंत्र्यांच्या या पवित्र्याने डॉल्बीमुक्ती पाठोपाठ ध्वनी प्रदुषण करणाऱ्या इतर घटकावरही दादा कारवाई करणार का ? अशी चर्चा सभास्थळी सुरू होती.

के. पीं. च्या तोंडात नेहमीच साखर असते
मंत्री चंद्रकांतदादा म्हणाले अध्यक्ष के. पी. पाटील हे नेहमी साखरेसारखे गोड बोलतात. त्यांच्या तोंडात नेहमी साखरेचा विषय असतो. यापेक्षा अधिक के.पी.गोड बोलले असते तर कदाचित कारखान्या ऐवजी त्यांच्या तोंडातुनच साखर पडली असती, असे म्हणताच उपस्थितात एकच हशा पिकला.

कपटी मित्रापेक्षा दिलदार राष्ट्रवादी मित्र बरा
राज्यात सुरू असलेल्या भाजप शिवसेना शीतयुध्दाची झलक येथेही पहावयास मिळाली. नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीतील भाजप शिवसेना या दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांमधील आरोपप्रत्यारोप पाहता भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी सुचक प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या मनोगतात त्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख न करता कपटी मित्रापेक्षा दिलदार राष्ट्रवादी मित्र बरा अशी बोचरी टीका केली.

Web Title: Kolhapur News Bidri Factory Victory rally