‘बिद्री’त आजी-माजी आमदार आमने-सामने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील हे दोन दिग्गज आमने-सामने ठाकणार आहेत. कारखान्याची ही निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीमच असणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. 

कोल्हापूर - बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील हे दोन दिग्गज आमने-सामने ठाकणार आहेत. कारखान्याची ही निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीमच असणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. 

कागलसह करवीर, भुदरगड व राधानगरी या चार तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र असलेला हा कारखाना म्हणजे या परिसरातील प्रमुख सत्ताकेंद्र आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ कारखान्यावर के. पी. पाटील यांची सत्ता होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा नवख्या प्रकाश आबिटकर यांनी ४४ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. श्री. आबिटकर यांच्या विजयामागे जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांतील वादही कारणीभूत होता. त्यात श्री. आबिटकर हे तरुण व आश्‍वासक चेहरा म्हणून लोकांनीही त्यांना स्वीकारले. 

विधानसभेत ज्यांनी श्री. आबिटकर यांना मदत केली, त्यातील बहुतांश जणांचा ‘इंटरेस्ट’ साखर कारखान्याच्या सत्तेत आहे. यात माजी आमदार दिनकरराव जाधव, विजयसिंह मोरे, बाबासाहेब हिंदुराव पाटील, नंदकुमार सूर्यवंशी, मारुती जाधव-गुरुजी यांची नावे अग्रक्रमाने घेता येतील. या ज्येष्ठांसाठी तरी श्री. आबिटकर यांना ही निवडणूक ताकदीने लढवावी लागणार आहे. त्याची तयारी त्यांनी २०१२ पासूनच सुरू केली होती. काल (ता. ३) न्यायालयाच्या आदेशाने अपात्र ठरलेले ९८२० सभासद हा निकाल श्री. आबिटकर यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

दुसरीकडे के. पी. पाटील यांनी अपात्र ठरवलेल्या सभासदांची सहानुभूती मिळवून तयारीला सुरवात केली आहे. ज्यांनी तुमचा हक्क हिरावला, त्यांना निवडणुकीत जागा दाखवा, असाच प्रचार त्यांनी आतापासूनच सुरू केला आहे. या प्रक्रियेत ४७४३ सभासद पात्र ठरले, ते. श्री. पाटील यांनीच केले होते. कारखान्याचे एकूण ५८ हजार सभासद होते, त्यापैकी ९८२० सभासद अपात्र ठरल्याने उर्वरित ४७ हजार सभासद कारखान्यावर सत्ता कोणाची, याचा फैसला करणार आहेत. के. पी. यांच्या बाजूने राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार नामदेवराव भोईटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची ताकद असेल. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आजी-माजी आमदार एकमेकांसमोर ठाकणार असून, या निवडणुकीतच विधानसभेचा पाया रचला जाणार आहे. 

सोमवारपासून प्रक्रिया सुरू
या कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून (ता. ७) सुरू होण्याची शक्‍यता आहे. सभासद पात्र-अपात्रतेचा घोळ संपल्याने आता प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

पालकमंत्री उतरणार रिंगणात
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे खानापूर हे गाव कारखाना कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे तेही या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. ते कोणाच्या बाजूने उतरणार, एवढाच उत्सुकतेचा विषय आहे. यापूर्वी त्यांनी या निवडणुकीबाबत माजी आमदार के. पी. पाटील यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. भाजपचा फार मोठा गट कार्यक्षेत्रात नाही; पण कोणाला तरी पाठिंबा देऊन पक्ष सक्रिय ठेवण्याची तयारी श्री. पाटील यांच्याकडून सुरू आहे.

Web Title: kolhapur news bidri sugar factory election