इचलकरंजीत शनिवारी पक्षीगणना मोहिम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

इचलकरंजी पक्षीमित्र संघटना, सकाळ आणि संवाद सामाजिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (ता. १६) पावसाळ्यातील सामान्य पक्षीगणना करण्यात येणार आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या राज्यव्यापी मोहिमेंतर्गत या संस्थेच्या नेतृत्वाखाली ही पक्षी गणना होणार आहे.

इचलकरंजी - इचलकरंजी पक्षीमित्र संघटना, सकाळ आणि संवाद सामाजिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (ता. १६) पावसाळ्यातील सामान्य पक्षीगणना करण्यात येणार आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या राज्यव्यापी मोहिमेंतर्गत या संस्थेच्या नेतृत्वाखाली ही पक्षी गणना होणार आहे.

शहर आणि परिसरात ८० हून अधिक विविध प्रजातीचे पक्षी आहेत. ऋतुनुसार पक्षांची संख्या आणि प्रकार कमी जास्त होत जातात. त्यामुळे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तीन ऋतूत पक्षांची गणना केली जाते. वरील तीनही संघटनेतर्फे एप्रिल महिन्यात पावसाळ्यातील पक्षी गणना पूर्ण झाली होती. येत्या शनिवारी (ता. १६) सकाळी सात वाजल्यापासून शहरातील पक्षांची गणना करण्यात येणार आहे. यासाठी पाच विभाग निश्‍चित केले आहेत. हे विभाग सॅटेलाईटद्वारे निश्‍चित केले आहेत. पाचही विभागात विशिष्ठ कालावधीत पक्षांची गणना पूर्ण करण्यात येणार आहे.

इचलकरंजी पक्षीमित्र संघटनेचे चित्कला कुलकर्णी, बाळकृष्ण वरूटे, डॉ. सूरज चौगुले, शशांक मराठे व विनय बनकर यांच्या नेतृत्वाखाली पाच गट करण्यात येणार आहेत. यामध्ये पंचगंगा नदी परिसर, सांगली रोड, जुना चंदूर रोड, नारायण मळा अशा विभागांचा समावेश असणार आहे. शहर आणि परिसरातील पक्षांबाबत माहिती आणि त्याची संख्या निश्‍चित करण्याची संधी या मोहिमेमध्ये मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे केले आहे.

पक्षीगणनेला येताना...
* मोहीम शनिवारी सकाळी ७ वाजता सुरू 
* इच्छुकांनी सुंदर बागेजवळ एकत्र यावे.
* येताना वही व पेन बरोबर असावे.
* शक्‍यतो निसर्गाशी एकरूप होणारा गणवेश असावा
* गणवेश हिरवा अथवा खाकीसारखा असावा
* शहरातील पक्षांचे अभ्यास करण्याची याद्वारे संधी

 

Web Title: Kolhapur news birds counting in Ichalkarangi