तीन हजारांची ‘चीप’, अडीच कोटींचा काळा पैसा

तीन हजारांची ‘चीप’, अडीच कोटींचा काळा पैसा

पंपमालक मालामाल, ग्राहक कंगाल - देशभरात मापात माप

कोल्हापूर - तीन हजार रुपयांची एक पल्सर चीप पंपमालकाला वर्षाला अडीच कोटींहून अधिक रुपयांचे काळे धन मिळवून देते. देशभरातील पेट्रोल-डिझेल पंपावरील छाप्यातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एक व्यक्ती (ग्राहक) महिन्याला शंभर लिटर पेट्रोल वाहनात भरत असेल, तर त्याला वर्षाला सुमारे साडेआठ हजार रुपयांचा फटका बसत असल्याचे दिसून येते. 

पल्सर चीप म्हणजे डिजिटल इलेक्‍ट्रॉनिकचा एक भाग आहे. पेट्रोल पंपामध्ये ती केवळ दोन ठिकाणच्या वायरिंगमध्ये बदल करून बसविली जाते. दिल्ली आणि लखनौमध्ये ही चीप तयार झाली आहे. राजेंद्र नावाच्या व्यक्तीकडून ही चीप उत्तर प्रदेशातील सुमारे हजार पेट्रोल पंपावर बसविली आहे. ही चीप तयार करण्यासाठी एक ते तीन हजार रुपये खर्च येतो. प्रत्यक्षात पेट्रोल पंपच्या मालकांना ती ४० ते ५० हजार रुपयांना विकली जाते. यामध्ये ती पंपावर बसवून देण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची असते. 

काही पंपचालकांकडे एका पंपावर ३-४-५ नोडल मशीन (पेट्रोल सोडण्याचे यंत्र) असतात. काहीजण ही चीप केवळ दोन-तीन नोडल मशीनलाच बसवितात इतर दोन मशीनला लावत नाहीत. ग्राहक प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पंपावर (नोडल मशीनवर) थांबतो. त्यामुळे त्याची झालेली फसवणूक त्याच्या लक्षात येत नसल्याचे दिसून आले आहे.

 उत्तर प्रदेशातील हे फसवणुकीचे हे लोण पुढे महाराष्ट्र, पंजाबमध्येही आले. राज्यात मुंबई, रायगडसह किमान वीस जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची चीप पेट्रोल पंपावर लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्याच साखळीतून कोल्हापुरातील काही पंपांवर ही चीप लावल्याची माहिती पुढे आली आहे.

काही महिन्यांपूर्वी मुंबईत परळमध्ये १८ पंप सील करून वीस जणांना अटक करण्याचे काम ठाणे पोलिसांनी केले होते. तेथे चीप आणि रिमोटद्वारे नियंत्रण करून कमी पेट्रोल-डिझेल ग्राहकांच्या माथी मारले जात होते. तीन राज्यांत चीप विक्री झाली आहे. उत्तर प्रदेशात राजेंद्र नावाच्या व्यक्तीने हे लोण पसरविल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रात याप्रकरणी ठाणे पोलिसांनी विकास आणि अविनाश या दोघांना अटक केले आहे. त्यांच्या मागे कोणते रॅकेट आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. रायगड, भिवंडी आणि ठाणे येथील पेट्रोल पंप सील केलेत. आता हीच मोहीम कोल्हापुरात जोरदारपणे सुरू आहे. ठाणे पोलिसांकडूनच याचा पर्दाफाश होत आहे.

पंपमालकाला वर्षाला अडीच कोटी
सर्वसाधारण एक लिटर पेट्रोलचा दर ७० रुपये असे समजा. 
रोज दहा हजार लिटर पेट्रोलची विक्री होते, असे समजा.
यानुसार प्रत्येक दिवशी ७० हजार रुपयांचे काळे धन पंपमालक मिळवितात.
वर्षाला ही रक्कम सुमारे २ कोटी ५५ लाख ५०हजार होते.

फसवणुकीची पद्धत
मशीनला पासवर्ड देऊन रिमोटद्वारे आणि चीपद्वारे
पल्सर चीप’ ही पेन ड्राईव्ह आणि मोबाईल सर्किट आकारात असते.
पंपचालकांकडून सुमारे ३ ते ४ टक्के पेट्रोल-डिझेल कमी केले जाते.
पंपावर एक मशीनचे एक नोडल, एक पल्सर चीप या पद्धतीने त्याची विक्री होते.
मशीनमध्ये दोनच बदल करून ‘पल्सर चीप’ बसविली जाते.
सर्वसाधारणपणे चीप किंवा रिमोटमद्वारे फेरफार करून एक लिटरला १००-१५० मिलिची तफावत केली जाते.
रिमोटने पेट्रोल पंप कंट्रोल केल्यास पाईपमधून पेट्रोल मिळणार नाही. तरीही बिल दाखविणारे मीटर फिरत राहते.

ग्राहकाला वर्षाला आठ हजारांचा फटका
समजा, तुमच्याकडे पेट्रोलवर चालणारी मोटार आहे.
ॲव्हरेज प्रति लिटर १५ किलोमीटर आहे.
समजा, ७० रुपये प्रतिलिटर पेट्रोल दर आहे.
महिन्यात १०० लिटर पेट्रोल मोटारीत भरले जाते.
चीप बसविलेल्या पेट्रोल पंपातून महिन्याला दहा लिटर पेट्रोल कमी मिळणार.
म्हणजे महिन्याला ७०० रुपयांचे नुकसान होते.
वर्षात ८ हजार ४०० रुपयांचे नुकसान होणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com