टाळी, टीचकी आणि त्या 11 जणी... 

टाळी, टीचकी आणि त्या 11 जणी... 

कोल्हापूर - डोळ्याने दिसत असूनही झाडावर चढताना तोल सांभाळतेवेळी अनेकांची घाबरगुंडी उडते. पण दृष्टीच हरवलेल्या मुलींनी लोंबकळत्या दोरीवर सरसर पावले सरकवत, हाताच्या बळांवर दोरी खेचत दोरीच्या टोकावर शरिराला डोलवले आणि या चित्तथरारक कसरतीतील कमालीचा सफाईदारपणा व कौशल्य सिध्द केले. सरावातील सातत्य, गुरूजनांच्या आज्ञांचे पालन आणि इच्छाशक्तीच्या बळावर आत्मसात केलेली रोप मल्लविद्या नाशिकच्या या मुलींनी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सावली केअर संस्थेच्या वर्धापनदिनी सादर केली. 

प्रशिक्षक यशवंत जाधव यांनी टाळी वाजविली दोन मुली पुढे आल्या. दोन टाळ्या वाजविल्यानंतर एका मुलीने दोर पकडला. तीन टिचक्‍या वाजविल्यानंतर एकेक पाऊल दोरी भोवती गुंडाळत एक मुलगी वर सरकली. पून्हा तीन टचक्‍या आणि मुलीने थेट सहा फूट उंचीवर सरकून दोरीवर पद्मासन घालून नमस्कार केला... आणि ही चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून केशवराव भोसले नाट्यगृहातील असंख्य डोळस उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभा राहीला. 

त्याच क्षणी दुसरी मुलगी दोरीला आधार देत वर सरकली आणि तिनेही उलट दिशेने लोंबकळ दोरीवरच योगासन केले. अशा एक नव्हे तब्बल 11 मुली फक्त टाळी व टिचकीच्या तालावरील गुरूंच्या सुचना प्रमाण माणत त्यांनी दोरीवर हुकूमत गाजवली. केवळ सांकेतिक आवाजावर त्यांनी सिद्ध केलेले हे कौशल्य त्यांच्या जिद्दीची साक्ष देत होते. विशेष म्हणजे यातील काही मुली राज्य, राष्ट्रीय संघातही सादरीकरण करतात. 

या सर्व मुली मध्यमवर्गीय कुटूंबातल्या. काही लक्षणांमुळे त्यांना अंधत्व आले. मुलींच्या पालकांनी त्यांना नॅशनल इन्स्टिट्यूटच्या फॉर ब्लाईंड (नॅब) च्या अंधशाळेत दाखल केले. तेथे या मुलींनी ब्रेल लिपीतून बौद्धिक व किमान कौशल्याचे धडे घेतले. मुलींचा आत्मविश्‍वास वाढवा, आरोग्य तंदुरूस्त राहावे यासाठी रोप मल्लविद्येचे प्रशिक्षण संस्थेने दिले. यातून तयार झालेल्या मुली राज्य, राष्ट्रीयस्तरावर चमकदार कामगिरी करत आता लक्ष वेधून घेत आहेत. 

मुली अशा - 
गायत्री पगार, निकिता तिदमे, निकिता शेरेकर, वृक्षाली ककरपट, जरंजना बोंबले, जया पिंपळके, मीरा उगळे, कोयल सर्रास, रेवती पाथ्रे, पूजा भालेराव, त्रिवेगी सातव. शिक्षक असे ः सुगंधा शुक्‍ल, अशोक भांबरे, वर्षा जाधव. 

रोप मल्लखांबाच्या सततच्या सरावातून आरोग्य तंदुरूस्त होते. याची प्रचिती या मुली रोप मल्लखांब विद्येद्वारे देत आहेत. अंध म्हणून त्यांच्याकडे सहानुभतीने न पाहता त्यांच्या कौशल्याला मिळणारी दाद मुलींच्या जगण्याला बळकटी देण्यास पुरक ठरणार आहे. 
- यशवंत जाधव, रोप मल्लखांब प्रशिक्षक, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com