अंध हेमंतचा ‘मसाज’ विक्रम!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

सांगली - ‘अंध हेमंत’ ही ओळख पुसून ‘विक्रमवीर हेमंत’ अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी शनिवारी सकाळी सात वाजता सुरू झालेला मसाज उपक्रम आज सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाला. गेल्या ३४ तासांत हेमंत कुंभोजकर यांनी तब्बल ५४ लोकांना बॉडी मसाज करत लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी दावा केला आहे.

सांगली - ‘अंध हेमंत’ ही ओळख पुसून ‘विक्रमवीर हेमंत’ अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी शनिवारी सकाळी सात वाजता सुरू झालेला मसाज उपक्रम आज सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाला. गेल्या ३४ तासांत हेमंत कुंभोजकर यांनी तब्बल ५४ लोकांना बॉडी मसाज करत लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी दावा केला आहे. या विक्रमाची नोंद यथावकाश होईल; मात्र सांगलीकरांच्या मनात हेमंत यांचे नाव विक्रमवीर म्हणून कायमचे कोरले गेले आहे. 

असा झाला विक्रम

  •     ३४ तासांत ५४ लोकांचा मसाज
  •     शनिवार सकाळी ७ पासून मसाज सुरू
  •     रविवार सायंकाळी ५ पर्यंत.

वखार भागात एका छोट्या हॉलमध्ये हेमंत यांनी विक्रम उपक्रमाला सुरवात केली. थोडा वेळ जेवण व शारीरिक विधीसाठी वगळता त्यांनी सलग ३४ तास मसाज केला. त्यासाठी त्यांचे नियमित ग्राहक आणि अन्य काही लोक मसाज घ्यायला निश्‍चित झाले होते. त्यांनी रात्रभर जागून हेमंत यांच्या धडपडीला प्रोत्साहन दिले. विक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांचा गौरव करत वखार भागातून उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी हेमंत यांना उचलून घेत जल्लोष करण्यात आला. 

हेमंत यांना वयाच्या नवव्या वर्षी अचानक अंधत्व आले. त्यानंतर त्यांनी जिद्दीने अंधाऱ्या वाटेवर चालणे सुरू केले. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नॅबच्या माध्यमातून मसाजचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. गेली बारा वर्षे ते हा व्यवसाय करत आहेत. त्याचाच आता विक्रम करण्याचे त्यांनी ठरवले आणि तो यशस्वीही केला. माजी आमदार नितीन शिंदे, व्यापारी मनोहर सारडा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. 

Web Title: Kolhapur News Blind Hemant Masaj Record