बाऊन्सरना सोबत घेऊन फिरण्याची कोल्हापुरात क्रेझ

सुधाकर काशीद
मंगळवार, 17 एप्रिल 2018

. कोल्हापुरात १०० हून अधिक बाऊन्सर आहेत, ते तब्येतीने एकाहून एक सरस आहेत. काही सफारी किंवा काळ्या टी शर्टमध्ये जाणवणारे त्यांचे अस्तित्व तर वेगळेच आहे; पण या तरुण बाऊन्सरना रोजगाराची एक संधी मिळाली आहे.

कोल्हापूर - आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोण पेहराव आकर्षक करतो, कोण हेअर स्टाईल बदलतो, कोण एखादे देखणे वाहन वापरतो. परंतु आता आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधले जावे म्हणून सभोवती काळ्या सफारीतल्या खासगी रक्षकांचा (बाऊन्सर) ताफा बाळगण्याची एक क्रेझ आली आहे. बाऊन्सर ही खासगी सुरक्षा व्यवस्था आहे. त्यात असणारे पिळदार शरीरयष्टीचे रक्षक व त्यांच्या हालचाली हा जरूर कुतूहलाचा विषय आहे. अनेक कलाकारांनी त्यांना आपल्या सेवेत ठेवले आहे. आता या काळ्या सफारीतल्या बाऊन्सरना सोबत घेऊन फिरण्याची क्रेझ कोल्हापुरातही आली आहे.

एवढेच काय, लग्न समारंभ, स्वागत समारंभातही त्यांचे अस्तित्व मुद्दाम दाखवले जात आहे. कोल्हापुरात १०० हून अधिक बाऊन्सर आहेत, ते तब्येतीने एकाहून एक सरस आहेत. काही सफारी किंवा काळ्या टी शर्टमध्ये जाणवणारे त्यांचे अस्तित्व तर वेगळेच आहे; पण या तरुण बाऊन्सरना रोजगाराची एक संधी मिळाली आहे. व्यायाम करून शरीर पिळदार बनवलेल्यांबरोबरच ग्रामीण भागातील ताडमाड उंचीच्या व शरीराच्या तरुणांना या निमित्ताने एक वेगळा लूकही आला आहे. विशेष हे की, वरवर उग्र, ताडमाड शरीराचे दिसणारे हे तरुण कोल्हापुरातील अतिशय मध्यम वर्गातील आहेत.

बाऊन्सरने उग्र भाषाच वापरली पाहिजे. समोर येणाऱ्याला ढकलूनच दिले पाहिजे. चेहऱ्यावर कायम रगच जपली पाहिजे, हे गैरसमज आहेत. काही बाऊन्सर उग्र वागले असतील; पण प्रत्यक्षात ही थंड डोक्‍याने देण्याची सेवा देतो. 
- देवेंद्र भोसले

मुंबईत काही कलाकारांच्या सभोवती दिसणारे हे बाऊन्सर म्हणजे त्या कलाकाराची खासगी सुरक्षा असते. हे बाऊन्सर सार्वजनिक ठिकाणी त्या कलाकाराभोवती कडे करतात, जेणेकरून उत्साही, आगाऊ चाहत्यांपासून ते कलाकारांना लांब ठेवतात. या निमित्ताने या बाऊन्सरची आक्रमकता अनेकवेळा दिसते. हे बाऊन्सर म्हणजे उग्र, गुडघ्यात मेंदू असणारे, कोणत्याही क्षणी आक्रमक होऊ शकणारे अशी प्रतिमा निर्माण होते. 

कोल्हापुरातही अलीकडच्या काळात या बाऊन्सरची सुरुवात झाली आहे. सुरुवातीला काही मोठ्या हॉटेलांत व्हीआयपी लोकांसाठी हॉटेल प्रशासनाने ही सेवा पुरवली. कोल्हापुरातील हे बाऊन्सर व्यायाम करून शरीर पिळदार बनवलेले आहेत. त्यांना व्यायामाची आवड आहे; पण नोकरीची संधी नसल्याने किंवा व्यायाम केल्यानंतर पूर्ण क्षमतेने पौष्टिक आहारही घेता येत नाही, अशी काहीशी परिस्थिती आहे. बदलत्या काळात त्यांना बाऊन्सर म्हणून संधी मिळाली असून, त्यांना मिळकतीचे एक माध्यम मिळाले. 

आता कोल्हापुरात शंभरहून अधिक बाऊन्सर आहेत. तीन वेगवेगळ्या एजन्सीज आहेत. पिळदार शरीरयष्टी व लक्षवेधी चेहरा हेच या बाऊन्सरचे मुख्य भांडवल आहे. त्यामुळे ते जपण्यासाठी त्यांची शर्थ असते. कोल्हापुरातील तरुणांनी या क्षेत्रात आपली दमदार एन्ट्री केली आहे. बदलत्या युगात रोजगाराच्या नवीन संधी कशा होतात, याचे हे उदाहरण आहे आणि या संधीचा लाभ जरूर तरुणांनी घेतला आहे. 

व्हीआयपीसह नेत्यांकडूनही वापर
कलाकार किंवा अन्य व्हीआयपी व्यक्‍तींभोवती बाऊन्सर ठीक आहे; पण केवळ आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रसंगानुरूप काही जण बाऊन्सर बाळगत आहेत. मध्यंतरी शिवाजी पुतळा ते महालक्ष्मी मंदिर व परत शिवाजी पुतळा असे चालत जाताना एका तरुण नेत्याने आपल्या भोवती दहा बाऊन्सर नेमले होते. अर्थात लक्ष वेधून घेण्याचाच तो प्रयत्न होता.

 

Web Title: Kolhapur News Bouncer craze in Kolhapur