कोल्हा चावल्याचे लपवले अन्‌ जीवावर बेतले

राजू पाटील
गुरुवार, 11 जानेवारी 2018

शेतात गेला असता कोल्ह्याने चावा घेतल्यामुळे रॅबीज झालेल्या "दक्ष'ने बाबा मला जवळ घ्या, मी खोड्या करणार नाही, असे म्हणतच अखेरचा श्वास घेतला. येथील दक्ष संग्राम पाटील या चौथीत शिकणाऱ्या दहा वर्षाच्या चिमुकल्याची ही शोकांतिका.

राशिवडे बुद्रुक - "तो खोडकर तरीही निरागस. एकुलता. लाडात वाढलेला. केवळ दहा वर्षाचा असूनही शाळा आणि खेळात रमलेला. अक्षरश: गावभर हुंदडणारा. ते हुंदडणे आज कायमचे थांबले. शेतात गेला असता कोल्ह्याने चावा घेतल्यामुळे रॅबीज झालेल्या "दक्ष'ने बाबा मला जवळ घ्या, मी खोड्या करणार नाही, असे म्हणतच अखेरचा श्वास घेतला. येथील दक्ष संग्राम पाटील या चौथीत शिकणाऱ्या दहा वर्षाच्या चिमुकल्याची ही शोकांतिका.

महिन्याभरापूर्वी घरामागील शेतात कोल्ह्याने त्याचा चावा घेतला. तो चावा त्याचा जीव घेऊन गेला. तसेच कुत्र्यानेही त्याचा चावा घेतल्याचे आता बोलले जातेय. चार दिवसांपासून रॅबीजची लक्षणे जाणवू लागली. काल त्याला सीपीआरमध्ये दाखल केले असता त्याच्या वाट्याला अंधार खोली आली. ना अन्न ना पाणी, केवळ श्वास त्याचा सोबती होता. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला दक्ष बाबांकडे अन्न-पाण्याची याचना करीत होता आणि जाळीच्या पलीकडून तान्ह्या जीवाची होणारी तगमग बाबासह आजोबा हतबल होऊन पाहत होते. 

दक्ष खेळकर मुलगा. महिन्यापूर्वी गल्लीतील मित्रांसोबत घरांच्या मागे असलेल्या शेतात खेळत असताना कोल्ह्याने त्याच्या टाचेचा चावा घेतला. घाबरून त्याने "पायाला काच लागली', असे घरच्यांना सांगीतले, त्यामुळे फारसे गांभीर्य वाटले नव्हते. चार दिवसांपासून मात्र त्याला थंडी वाजणे, अंग दुखणे, उजेड व पाण्याची भीती वाटू लागली. यावर स्थानिक उपचार करण्यास गेले असता रॅंबीजची लक्षणे असल्याचे समजले. तातडीने त्याला सीपीआरमध्ये नेले. मात्र उपचारापलीकडे दक्षची स्थिती गेल्याने नियतीपुढे हरावे लागले. अंधारखोलीत कोंडलेल्या दक्षला मात्र काळाने घातलेल्या घाल्याची पुसटशीही कल्पना नव्हती. "बाबा मला घरी न्या, मी आता दंगा करणार नाही, मला पाणी द्या, मला जवळ घ्या... फार थंडी वाजततेय हो! असे म्हणतच त्याने अखेरचा श्वास घेतला. 

सवंगड्यांनाही दिली लस 
या घटनेची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत आज त्याच्या घरच्यासह शाळेतील सुमारे सतरा सवंगड्यांना व त्याला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्याचीही तपासणी करुन लसीकरण केले. त्याचा ज्याच्याशी संपर्क आला, त्या सर्वाना रॅंबीज प्रतिबंधक लस दिली.आज पहाटे दक्षवर अंत्यसंस्कार झाले. या वेळी त्याच्या आईबाबांवर आभाळ कोसळले. 
 

Web Title: Kolhapur News boy died due to Fox bite