कोल्हापूरात बांधकाम व्यावसायिकास ठार करण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - पक्षाच्या कार्यालयासाठी फ्लॅट न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवण्यासह त्याच्या मालमत्तेचे नुकसान आणि नऊ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद बांधकाम व्यावसायिक धीरज अनिल साखळकर (वय ३३) यांनी दिली. 

कोल्हापूर - पक्षाच्या कार्यालयासाठी फ्लॅट न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवण्यासह त्याच्या मालमत्तेचे नुकसान आणि नऊ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांवर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद बांधकाम व्यावसायिक धीरज अनिल साखळकर (वय ३३) यांनी दिली. 

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे, सूरज साखरे (रा. लक्षतीर्थ वसाहत), राजेंद्र कासेगावकर आणि त्यांचे पाच ते सहा साथीदार (नाव, पत्ता माहित नाही) अशी आहेत. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बांधकाम व्यावसायिक धीरज अनिल साखळकर सध्या शनिवार पेठेत राहतात. त्यांचे देवकर पाणंद येथे अपार्टमेंटचे काम सुरू होते. सूरज साखरे व राजेंद्र कासेगावकर हे दोघे तेथे फ्लॅट खरेदीसाठी त्यांच्याकडे गेले. अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटसंबंधी साखळकर यांनी आवश्‍यक दस्तऐवज भवानी मंडपातील दुय्यम निबंधक कार्यालयात केले.

त्याबदल्यात साखरे व कासेगावकर यांनी त्यांना पाच व चार लाख असे एकूण ९ लाख रुपयांचे दोन धनादेश दिले; पण ते धनादेश वटले नाहीत. त्यामुळे साखळकर यांनी दोघांकडे पैशांची मागणी केली; मात्र त्यांनी ते दिले नाहीत. उलट साखरेने पाच ते सहा साथीदारांसह शनिवार पेठेत आणि सासरवाडीतील देवकर पाणंद येथील घरात घुसून साखळकर यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्याचबरोबर फ्लॅट नावावर करून देण्याची धमकी दिली. 

सप्टेंबर २०१७ मध्ये साखरे हा अपार्टमेंटमधील एक फ्लॅट राजकीय पक्षाच्या कार्यालयाला देण्याची मागणी करत होता; पण त्यास साखळकर यांनी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या साखरेने शिवीगाळ करत त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ‘पुन्हा अपार्टमेंटमध्ये पाय ठेवलास तर ठार मारतो’ अशी धमकी दिली. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत अपार्टमेंटच्या कामासाठी आणलेले वाळू, सिमेंट, विटा, खडी, फरशी, प्लायवुड, इलेक्‍ट्रीक साहित्य चोरून नेले.

तसेच फरशी, फर्निचरची मोडतोड करून साडेचार लाख रुपयांचे नुकसान केले. हे सर्व प्रकार २०१६ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत घडल्याचे साखळकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयित सूरज साखरे, राजेंद्र कासेगावकर व त्याच्या साथीदारांवर कलम ४२०, १४३, १४७, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३७९, आर्म ॲक्‍ट कलम ३-२५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल गुजर करीत आहेत.

Web Title: Kolhapur News Builder threatens to kill