जखमींसाठी प्रवीण बनला देवदूत...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

कोल्हापूर - एखादी गंभीर जखम, रक्त बघितले तरी काहींची दातखिळी बसते. काहींना भोवळ येते; पण शुक्रवारी रात्री पंचगंगा नदीत मिनीबस १६ प्रवाशांसह कोसळली आणि तेराजणांचे मृतदेह व तीन गंभीर जखमीच्या किंकाळ्या, आक्रोशाने थरकाप उडविला..

कोल्हापूर - एखादी गंभीर जखम, रक्त बघितले तरी काहींची दातखिळी बसते. काहींना भोवळ येते; पण शुक्रवारी रात्री पंचगंगा नदीत मिनीबस १६ प्रवाशांसह कोसळली आणि तेराजणांचे मृतदेह व तीन गंभीर जखमीच्या किंकाळ्या, आक्रोशाने थरकाप उडविला..

अपघाताची चाहूल लागताच जुना बुधवारातील तरुण मदतीसाठी धावले. यात प्रवीण ऊर्फ टॉम सदाशिव डांगे यांनी तीन जखमींना खांद्यावरून बाहेर आणले... नंतर सांघिक बळावर एकेक मृतदेह काढण्यात कार्यकर्ते झटू लागले, आणि संकटकालीन मदतीसाठी सगळ्याची जिगर एकवटली. जबरदस्त आत्मविश्‍वास, भक्कम मनगट, एकत्रित प्रयत्नांची शिकस्त करत तिघांना 
वाचविण्यात यश आले. 

‘सकाळ’शी संवाद साधताना प्रवीण म्हणाला, ‘‘मी महापालिका आरोग्य विभागात वॉर्डबॉय आहे. आम्ही कागलला जेवायला गेलो होतो. रात्री शहरात आलो. डांगे गल्लीत निघालो; पण रस्त्यात गर्दी होती, शिवाजी पुलावर अपघात झाल्याची माहिती मिळाली म्हणून बघायला गेलो. पुलाचा कठडा तुटलेला, नदीपात्रात मिनी बस कोसळलेली होती. नदी खाली गर्दी व पुलावर गर्दी, लोक ओरडत होते, क्षणार्धात विचार करून घाटाकडून खाली गेलो... किर्र... अंधार, दगडगोटे, खाचखळगे बाजूलाच नदी पाण्याचे पात्र, पाय घसरला तर सरळ नदीत. अशात दगडी खाचखळग्यातून बसजवळ पोचलो; पण अर्धी बस पाण्यात...अर्धी बाहेर, यात कोण जखमी?, कोण मृत? हे लक्षात येत नव्हते. अशात तीन महिला वरच्या भागात अडकलेल्या दिसल्या. ऐकीला बाहेर काढले. ती निपचिप होती. 

कृत्रिम श्‍वासोच्छ्‌वास दिला, तिच्या हृदयाची धडधड सुरू झाली, तिला खांद्यावर घेऊन पुन्हा धावत खाच खळगे पार करत तीन चार मिनिटात पाण्यातून काठावर आणले, तिथे रुग्णवाहिकेत घालून सीपीआरकडे पाठविले, अशात अन्य दोन महिलां भीतीने गारठल्या होत्या. त्यांचीही दातखिळी बसलेली, रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडलेल्या त्यांनाही सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयाकडे पाठवले. 

इथे पुन्हा कसोटीचा क्षण सुरू झाला. गर्दीतील अनेकजण मोबाईल चमकवत होते. अग्निशमन दलाची बॅटरी एवढेच साधन हाती होते.  क्रेनची वाट बघणे सुरू झाले, अर्ध्या तासात क्रेन आली. बस वर उचलताच मृतदेह स्पष्ट दिसू लागले. सगळ्यांच्या एकीचे बळ एकवटले. एकेक मृतदेह अलगदपणे एकमेकांच्या कवेतून पुढे पास झाले. अवघ्या तासाभरात मृतदेह निघाले.   

अग्निशमन दलाचा टाँर्च घेत, पुढे झाले सोबत अन्य कार्यकर्तेही मदतीसाठी धावले. कोणतेही आधुनिक तांत्रिक साधन नाही. मास्क नाही की, हॅण्डग्लोज नाहीत, पण प्रत्येक कार्यकर्ता झपाटल्यासारखा धावत होता. कोण कोणाला सूचना देत नव्हते. हाती येईल तो मृतदेह सुरक्षित बाहेर काढून गाडीत ठेवत होते. अशात एक मृतदेह पाण्यात वाहत जाण्याची शक्‍यता होती. त्यालाही सुरक्षितपणे सर्वांनी बाहेर काढले. सर्वांनी एकजुटीने केलेल्या कार्यात कोल्हापुरी माणूसकीची ऊर्जा ठळक झाली. प्रवीण यांच्या सोबत कुणाल भोसले, दिगंबर फराकटे, प्रकाश गंवडी, ऋषीकेश शिंदे, सुशांत महाडिक, अमित, विनायक आदी कार्यकर्ते होते.     

बाटल्यांच्या काचांचाही अडथळा
अपघातस्थळी कायकर्ते मदतीसाठी झटत होते. मार्गावर खाचखळग्यात काचाही होत्या. मदतीसाठी भारावलेल्या कार्यकर्त्यांना काचांमुळे दुखापती झाल्या. प्रवीण यांच्या पायाला काच लागली. बेफिकीरीने टाकलेल्या बाटल्या, काचा एखाद्या संकटावेळी अडथळा ठरतात, कोणाचा जीव वाचविताना गंभीर समस्या बनतात, याची प्रचिती कार्यकर्त्यांना आली.

Web Title: Kolhapur News Bus Accident Panchganga River