कोल्हापूरात हल्ला करून सराफाला लुटले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - मुंबईतील सराफाला चार लुटारूंनी काठ्यांनी मारहाण करून त्यांच्या हातातील एक किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग जबरदस्तीने लुटून नेली. गुजरी कॉर्नर येथील जैन मंदिराजवळ बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. कांतिलाल जसवंतराज मेहता (वय ५३, रा. एम. जी. रोड, बोरिवली पूर्व, मुंबई) असे त्यांचे नाव आहे.​

कोल्हापूर - मुंबईतील सराफाला चार लुटारूंनी काठ्यांनी मारहाण करून त्यांच्या हातातील एक किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग जबरदस्तीने लुटून नेली. गुजरी कॉर्नर येथील जैन मंदिराजवळ बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. कांतिलाल जसवंतराज मेहता (वय ५३, रा. एम. जी. रोड, बोरिवली पूर्व, मुंबई) असे त्यांचे नाव आहे.

आठवड्यात शहरात घडलेल्या या दुसरा थरारक प्रकारामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. या बाबतची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. त्या नोंदीनुसार तो ऐवज ३३ लाख ५८ हजार २०६ रुपये किमतीचा आहे.

याबाबत घटनास्थळ, पोलिसांनी दिलेली माहिती आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झालेली घटना अशी - मेहता कोल्हापुरातील सराफांकडून दागिन्यांची ऑर्डर घेतात. त्यानुसार तयार दागिने थेट दुकानात आणून देतात. त्यासाठी ते काल रात्री बोरिवलीहून बाहेर पडले. नाकोडा ट्रॅव्हल्समधून सकाळी पावणेसहाच्या सुमारास येथे मध्यवर्ती बसस्थानकावर आले. तेथून रिक्षाने गुजरीत आले. त्यांच्या हातात बॅग होती. त्यात एक किलोहून अधिक सोन्याचे दागिने होते. ते साडेसहाच्या सुमारास गुजरी कॉर्नर येथील जैन मंदिरात गेले. त्यानंतर ते रंकाळा बसस्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील ‘मरुधर भवन’ मध्ये जात होते. पाळतीवर असणारे दोघे लुटारू गुजरी कॉर्नरच्या दिशेने त्यांच्या पाठीमागून येत होते.

मरुधर भवनसमोर एकजण थांबला होता. पाठीमागून येणाऱ्या दोघांनी त्यांच्यावर लाकडी दांडक्‍यांनी हल्ला केला. तसे ते घाबरून भवनच्या दिशेने पळत सुटले. दोघांनी त्यांना भवनच्या दारातच गाठले. भवनजवळ थांबलेला आणि भवन समोरील रस्त्यावरून दुसरा लुटारूही तेथे आला. चौघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचा शर्ट फाटला. त्यांनी आरडाओरडा करत भवनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गेट बंद असल्याने ते शक्‍य झाले नाही. लुटारूंनी हिसडा मारून त्यांच्या हातातील सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून घेतली व सर्व कपिलतीर्थ मार्केटच्या दिशेला पळत सुटले. काही अंतरावर महापालिकेच्या वाहनतळाचे काम सुरू आहे. त्या रस्त्यावर त्यांचा साथीदार मोटारीत बसला होता. त्या मोटारीत बसून चौघे कपिलतीर्थ मार्केटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने पसार झाले. 

आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक, भवनमधील कर्मचारी तेथे जमा झाले. जखमी मेहता यांना धीर देत त्यांनी याची माहिती सराफ संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. तसे पदाधिकाऱ्यांसह सराफ दाखल झाले. त्यांनी जुना राजवाडा पोलिसांना कळविले. पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी भवनमधील सीसी फुटेजची तपासणी केली.

पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर अधीक्षक तिरुपती काकडे, शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकरही दाखल झाले. त्यांनी उपलब्ध फुटेजद्वारे लुटारूंचा शोध सुरू केला. आठ पथकेही रवाना केली. 

याच आठवड्यात राजेश मोटर्सजवळील १७ लाखांचा लुटीचा प्रकार घडला होता. त्याचा छडा लावतो न लावतो तोच दुसऱ्या थरारक प्रकारामुळे पोलिसही चक्रावून गेले. मेहता यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ३३ लाख ५८ हजार २०६ रुपयांचा ऐवजाच्या लुटीचा गुन्हा दाखल झाला. शहर उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाड्याचे निरीक्षक अनिल गुजर, सहायक फौजदार व्ही. एस. दराडे तपास करत आहेत. 

मेहतांवर तिसरा हल्ला
मेहता यांच्यावर १९ वर्षांपूर्वी व्हिनस पुलावर राजस्थान येथील कल्याणसिंगच्या टोळीने हल्ला करून लुटले होते. त्यानंतर मुंबईतही त्यांच्यावरही हल्ला झाला होता. त्यानंतर आज चौघा लुटारूंनी त्यांच्यावर तिसरा हल्ला केल्याची चर्चा गुजरी परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरू होती. 

ऐवज ४५ लाखांचा...
लुटारूंनी लुटून नेलेल्या बॅगेत ४० ते ४५ लाखांचे सोन्याचे दागिने होते. त्यातील अनेकाच्या पावत्या अद्याप हाती लागलेल्या नसल्याने सध्या एक किलो १० तोळ्याचेच दागिन्यांची लूट झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली, अशी असल्याचीही चर्चा गुजरी परिसरात सुरू होती. याबाबत पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला. 

मोटारीचा गुन्ह्यात वापर
लुटारूंनी गुन्ह्यात पांढऱ्या मोटारीचा वापर केला. लुटीच्या अगोदर काही मिनिटे गुजरी कॉर्नर रस्त्यावरून मोटार मरुधर भवनच्या समोरील महापालिकेच्या वाहनतळाच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावर थांबून होती. लुटारू बॅग घेऊन त्याच मोटारीतून पसार झाले. ही मोटार त्यांनी जोतिबा रोडच्या दिशेने किंवा कपिलतीर्थ मार्केट ताराबाई रोडच्या दिशेने पुढे कोठे गेली असावी, मोटारीतील चालक हा लुटारूंचा पाचवा साथीदार असावा, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला. 

रिव्हॉल्व्हर खेळण्यातील?
लुटारूंनी मेहता यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवण्याच्या उद्देशाने रिव्हॉल्व्हरही जवळ बाळगले होते. मात्र ते रिव्हॉल्व्हर खेळण्यातील होते. पळून जाताना त्याची स्प्रिंग तुटून ती रस्त्यावर पडली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यातून ते रिव्हॉल्व्हर खेळण्यातील होते, हे स्पष्ट झाले. पोलिसांनी याबाबत गोपनीयता ठेवली आहे. 

भटके कुत्रे गेले अंगावर
लुटारूंनी मेहता यांच्यावर लाकडी दांडक्‍यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रस्त्यावरील एक भटके कुत्रे त्यांच्या अंगावर धावून गेले. लुटारूंनी त्याला हटकून लुटीचे कृत्य केल्याचेही परिसरातील सराफ व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. 

लुटारू २५ ते ३० वयोगटातील 
सीसीटीव्ही फुटेजआधारे संबंधित लुटारू हे २५ ते ३० वयोगटातील असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातील एक अंगाने सडपातळ, मध्यम उंचीचा, शर्ट पॅंट घातलेला होता. दुसऱ्याने जॅकेट, फुल बाह्याचा शर्ट व डोक्‍यावर कानटोपी घातली होती. तिसऱ्याने काळे जॅकेट, कानटोपी आणि घातली होती. चौथ्याने आडव्या पट्ट्याचा फूल शर्ट आणि पॅन्ट घातल्याचे पोलिसांनी सांगितले. 

व्यापाऱ्यांनी दिला मेहतांना धीर
लुटीचा प्रकार घडल्यानंतर मेहता यांच्या मदतीला नगरसेवक किरण नकाते यांच्यासह सराफ संघाचे राजेश राठोड, विजय हावळ, रणजित पारख, किरण गांधी धावून आले. त्यांना धीर देत या प्रकाराची माहिती त्यांनी जुना राजवाडा पोलिसांना दिली. 

३० ठिकाणचे फुटेज ताब्यात 
लुटारूंचा शोध घेण्यासाठी घटनास्थळासह शहरातील ३० ठिकाणच्या सीसीटीव्हीतील फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात मोटार बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटीमार्गे ताराराणी चौकातून पुढे गेल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याआधारे शोध मोहीम सुरू आहे. 

लुटीचा तपास युद्ध पातळीवर सुरू आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याआधारे विविध पथकांद्वारे तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावू.
संजय मोहिते , 
पोलिस अधीक्षक

टीप मुंबईतून की?
दर बुधवारी मेहता बोरिवलीहून कोल्हापुरात ऑर्डरचे दागिने देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून येतात. याची माहिती व्यवहाराशी संबंधित अनेकांना होती. त्याची टीप कोणीतरी लुटारूंना दिली असावी. त्याआधारे लुटमार झाली, असा संशय पोलिसांना आहे. टीप मुंबईतून की कोल्हापुरातून मिळाली, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 

Web Title: Kolhapur News businessmen Loot in Gujari