मंत्रिपदी मिणचेकर यांची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - मंत्रिमंडळ विस्तारात हातकणंगलेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. सलग दोनवेळा शिवसेनेच्या उमेदवारीवर आमदार, उपद्रव्य मूल्य नाही आणि मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व दिल्याचा संदेश जाईल, यातूनच डॉ. मिणचेकर यांचे नाव पुढे आले आहे. 

कोल्हापूर - मंत्रिमंडळ विस्तारात हातकणंगलेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. सलग दोनवेळा शिवसेनेच्या उमेदवारीवर आमदार, उपद्रव्य मूल्य नाही आणि मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व दिल्याचा संदेश जाईल, यातूनच डॉ. मिणचेकर यांचे नाव पुढे आले आहे. 

काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला ‘रामराम’ केल्यानंतर स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. श्री. राणे यांचे मंत्रिमंडळात पुनर्वसन करण्यात येणार असून, या संभाव्य विस्तारात काही मंत्र्यांची खांदेपालट, तर काहींना डच्चू दिला जाण्याची शक्‍यता आहे. दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे सूतोवाच दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ‘सकाळ’शी बोलताना केले. या पार्श्‍वभूमीवर संभाव्य मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्याला स्थान मिळेल का ? याची चाचपणी केली असता डॉ. मिणचेकर यांच्या नावाला नेत्यांचा ‘ग्रीन सिग्नल’ असल्याचे समजते. 

सरकारमध्ये शिवसेनेचा सहभाग असला तरी विरोधी पक्षाचीच भूमिका त्यांच्याकडून जास्त वठवली जात आहे. त्यामुळे शिवसेनेला मंत्रिमंडळ विस्तारात किती महत्त्व असेल, हे आताच सांगणे अवघड आहे. परंतु, कोल्हापूर जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळावे यासाठी सेना नेते प्रयत्नशील आहेत. कोल्हापुरात शिवसेनेचे तब्बल सहा आमदार आहेत. 

त्यात डॉ. मिणचेकर यांच्यासह चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर सलग दुसऱ्यांदा, तर शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील-सरूडकर हे एकवेळ पराभूत होऊन पुन्हा आमदार झाले. उल्हास पाटील ‘स्वाभिमानी’तून सेनेत, तर प्रकाश आबिटकर यांची मूळ काँग्रेसशी जुळली आहे. 

क्षीरसागरांकडूनही लॉबिंग
डॉ. मिणचेकर हे मागासवर्गीय समाजाचे आहेत. त्यांना मंत्री करून या समाजाची सहानभूती सरकारच्या बाजूने मिळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे श्री. मिणचेकर दोनवेळा आमदार असले तरी त्यांच्याकडून उपद्रव्य मूल्य शून्य आहे. श्री. क्षीरसागर यांचेही मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे. पक्षाचे जिल्हा संपर्क नेते गजानन किर्तीकर यांनी कालच (ता. २२) श्री. क्षीरसागर यांच्या मंत्रिपदासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. राज्यात शिवसेनेचे वरिष्ठ नेते भाजपवर टीका करत असताना श्री. क्षीरसागर यांनीही कोल्हापुरात दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर संधी मिळेल तिथे टीका सुरू केली. ही त्यांच्या मंत्रिपदाच्यादृष्टीने जमेची बाजू समजली जाते. येत्या दोन-तीन दिवसांत यासंदर्भातील स्पष्टता येईल.

Web Title: Kolhapur News Cabinet expansion Discussion