बेलवळे खुर्दमधील दुहेरी खून प्रकरणी पिता-पुत्रांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

कोल्हापूर - बेलवळे खुर्द (ता. कागल) येथे राजकीय वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणी पिता-पुत्रांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला. आनंदा माणकू पाटील (वय ६३) आणि त्याचा मुलगा मारुती (३२) अशी त्या दोघांची नावे आहेत.

कोल्हापूर - बेलवळे खुर्द (ता. कागल) येथे राजकीय वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणी पिता-पुत्रांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला. आनंदा माणकू पाटील (वय ६३) आणि त्याचा मुलगा मारुती (३२) अशी त्या दोघांची नावे आहेत. प्रकाश विश्‍वास पाटील यालाही या प्रकरणात दोषी ठरविले. मात्र चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर त्याची सुटका करण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. ए. एम. पिरजादे यांनी 
काम पाहिले. 

बेलवळे खुर्द येथे २०१२ मध्ये राजकीय वाद उफाळून आला होता. त्यातूनच गावातील प्रमोद शिवाजी पाटील व संदीप केरबा पाटील यांना ३० जून २०१२ ला सायंकाळी गावातील रणजित चंद्रकांत पाटील, विजय आनंदा पाटील व त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करून दमदाटी केली होती. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटांच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण, दुसऱ्याच दिवशी (१ जुलै २०१२) सकाळी हा वाद पुन्हा चिघळला.

निवृत्त मुख्याध्यापक आनंदा पाटील, त्याचा मुलगा मारुती पाटील यांनी बंदुका, रिव्हॉल्व्हर घेऊन, तर त्याच्या साथीदारांनी लोखंडी पाईप, हॉकी स्टीक, तलवारी घेऊन विरोधी गटावर हल्ला केला. त्यात रवींद्र आनंदा डोंगळे (वय २७) आणि प्रकाश विलास कोतेकर या दोघांचा खून, तर ११ जण जखमी झाले. त्यानंतर गावासह संपूर्ण कागल तालुक्‍यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी कागल पोलिस ठाण्यात दिनकर श्रीपती कोतेकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आनंदा माणकू पाटील, मारुती आनंदा पाटील, राजाराम माणकू पाटील, सागर राजाराम पाटील, संतोष राजाराम पाटील, विजय आनंदा पाटील, प्रकाश विश्‍वास पाटील आणि प्रदीप शिवाजी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक रमेश बनकर यांनी केला. 

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग १) एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयात सुरू झाली. सरकारतर्फे ॲड. ए. एम. पिरजादे यांनी २६ साक्षीदार तापसले. यात फिर्यादी दिनकर कोतेकर, जखमी कृष्णात पाटील, अभिजित कोतेकर, राजेंद्र पाटील, प्रकाश डोंगळे, संदीप पाटील, काडतुसे विक्री करणारा दुकानदार जैनुद्दीन शिकलगार, अशोक पाटील, डॉ. वीरेंद्रसिंह पोवार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश जगमलानी यांनी आनंदा माणकू पाटील व त्याचा मुलगा मारुती या दोघांना कलम ३०२ खाली दोषी ठरविले. त्या दोघांना जन्मठेप व मृत कुटुंबीयाला नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी ५० हजारांचा दंड सुनावला.

तसेच, प्रकाश विश्‍वास पाटील यालाही कलम ३२४ अन्वये दोषी ठरविले. परंतु, तो शिक्षण घेत असल्याने तीन वर्षांच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर त्याला सोडण्यात आल्याचे सरकारी वकील पिरजादे यांनी सांगितले. सरकार पक्षाच्या कामात अर्चना कांबळे, मीनाक्षी शिंदे, ॲड. सतीश कुंभार, ॲड. कादंबरी मोरे, ॲड. सुविधा माने, पोलिस कर्मचारी दत्तात्रय मिसाळ, तुकाराम पाटील यांनी सहकार्य केले. 

दरम्यान, या खटल्यातील फिर्यादी दिनकर श्रीपती कोतेकर यांच्यासह ११ जणांवर गावठी कट्टा व तलवारी घेऊन हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात संशयित कोतेकरसह ११ जणांची बाजू ॲड. शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात मांडली. त्या सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याचे ॲड. राणे यांनी सांगितले. 

न्यायालयात रवींद्र डोंगळे व प्रकाश पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते. डोंगळे यांच्या मागे आई, पत्नी व लहान मुलगी; तर पाटील यांच्या मागे फक्त आई-वडीलच असल्याचे ते सांगत होते.

Web Title: Kolhapur News In the case of murder, life imprisonment to father and son