रोकड लूट प्रकरणी मास्टर माईंडसह चौघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - जमीन खरेदी-विक्री एजंटावर कोयत्याने हल्ला करून १७ लाखांची लूट प्रकरणातील मास्टर माईंडसह चौघांना शहर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांच्याकडून लुटीतील रोकड जप्त करण्याची प्रक्रिया पोलिस करीत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्यांचे आणखी कोणी साथीदार असल्याची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. 

चारुदत्त कोगे, दिनकर जाधव जमीन खरेदी-विक्री एजंटचे काम करतात. शुक्रवारी (ता. २) व्यवहारातील २० लाखांची रोकड त्यांनी रुईकर कॉलनीतून घेतली. त्यानंतर ती रोकड घेऊन ते मोटारसायकलवरून उद्यमनगरच्या दिशेने जात होते. राजेश मोटर्सजवळ दबा धरून बसलेल्या मोटारसायकलवरील दोघा लुटारूंनी त्यांच्या डोळ्यात चटणी फेकली. त्यानंतर त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांच्याकडील पिशवीतील १७ लाखांची रोकड त्यांनी लुटून नेली. अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे शहर हादरून गेले. लुटारूंच्या शोधासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेतली.

सीसीटीव्ही फुटेजवरून मोटारसायकलवरील लुटारू उचगावमार्गे पुढे गेल्याचे दिसून आले. त्यामुळे मास्टर माईंड त्याच भागातील असावा, असा पोलिसांचा संशय बळावला. जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार कोणाकोणाला माहीत आहे, याची माहिती घेताना त्यातील एक जण गायब असून त्याचा मोबाईलही बंद असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली. 

दरम्यान, आज शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या पथकाने एकास; तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यातील एक राजारामपुरी परिसरातील तर इतर तिघे करवीर तालुक्‍यातील आहेत. यापैकी एका संशयितास पोलिसांनी घटनास्थळी फिरवले. तोच या प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचे तपासत पुढे आले.

संशयितांनी लूट केलेल्या रकमेची विल्हेवाट लावल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे ती रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. त्याचबरोबर आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. त्याचबरोबर मोबाईल लोकेशन तपासण्याचेही काम पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावू, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News cash loot incidence