कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तिसऱ्या डोळ्याचा ‘वॉच’

मोहन मेस्त्री
रविवार, 14 जानेवारी 2018

कोल्हापूर - अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या तिसऱ्या डोळ्यामुळे १०७ जणांना हरवलेल्या वस्तू परत देण्यात यश आले. मंदिर परिसरात ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हा ‘वॉच’ ठेवला जात आहे. 

कोल्हापूर - अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या तिसऱ्या डोळ्यामुळे १०७ जणांना हरवलेल्या वस्तू परत देण्यात यश आले. मंदिर परिसरात ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हा ‘वॉच’ ठेवला जात आहे. 

मंदिरात लाखो भाविक रोज दर्शनासाठी येतात. गर्दीत अनेकांच्या वस्तू हरवतात. गर्दीचा फायदा घेत सराईत चोरटे पाकीट, दागिने, मोबाईल लंपास करतात. या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कार्यरत आहेत. मार्च २०१७ पासून आजअखेर सुमारे १३६ भाविकांनी मंदिर परिसरात विविध वस्तू हरवल्याची तक्रार केली; पण सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे झालेल्या पाहणीमुळे सुमारे १०७ जणांना त्यांच्या वस्तू परत देण्यात यश आले. मंदिरात चार दरवाजांवर लावलेल्या चार ॲनालॉग कॅमेऱ्यांनी सुरक्षिततेचा प्रारंभ झाला. या ‘कॅमेऱ्यामागचा डोळा’ म्हणून राहुल जगताप हा युवक ही सर्व यंत्रणा हाताळत असतो. सध्या या सीसीटीव्हीमुळे अनेक गुन्हे उलगडण्यास सहाय्य होते. २००५ मध्ये चार ॲनालॉग कॅमेरे दरवाजांवर लावण्यात आले

 पण, आता त्याचे ४४ एचडी कॅमेरे झाले. याचे नियंत्रण देवस्थान व्यवस्थापन कार्यालयाजळच्या कंट्रोल केबीनमधून होते. येथूनच गर्दीत असणारे संशयित हेरून त्यांच्या कारवाईवर राहुलची ‘नजर’ रोखलेली असते. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची पर्स मारताना महिलेस ताब्यात घेण्यात आले. पण, यासाठीही राहुलची दक्षता कामी आली. चार-पाच गुन्हे केलेली महिला मंदिरात गर्दीत संशयितरीत्या फिरताना दिसल्याने राहुलने रक्षकांना तिच्यावर पाळत ठेवण्यास सांगितले. त्यामुुळे प्रत्यक्ष पर्स मारतानाच तिला ताब्यात घेणे शक्‍य झाले. सदर महिला गरोदरपणाचा फायदा घेत असे. अशाच प्रकारे अनेक गुन्हेगारांना हेरून त्यांच्यावर कारवाईसाठी सहाय्य केल्याने आता मंदिरातील चोऱ्यांना काहीसा आळा बसला आहे. राहुल केवळ कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवत नाही, तर यासाठी सुरक्षारक्षकांकडील वायरलेस यंत्रणा, मोबाईल, त्याचप्रमाणे दुकानदार आणि फुलविक्रेते यांचेही सहाय्य घेतो. अगदी हरवलेल्या व्यक्तींना पार्किगपर्यंत पोचविण्यासाठी कुशलपणे तो सीसीटीव्हीच्या यंत्रणेचा वापर करीत असतो.

राहुलची सेवा आणि कर्तव्य...
इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या राहुलने कळंबा कारागृहात वायरलेस आणि मोबाईलने ३६० अंशात फिरणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचाही यशस्वी प्रयोग केला. स्कूल बसवर कर्नाटकात प्रथमच जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम केले. नवरात्रोत्सवात भवानी मंडप, राजारामपुरी, शिवाजी चौक येथील एलईडीवर वायरलेस यंत्रणेद्वारे पालखी आणि देवीचे लाईव्ह दर्शन असो अथवा वेबसाईटवरील दर्शन असो या सर्व कामांत राहुल अग्रेसर असतो. मंदिर सुरक्षेचा एक अविभाज्य घटक असलेला राहुल नोकरी म्हणून हे काम करीत नाही, तर सेवा आणि कर्तव्य म्हणून पहाटेपासून रात्री बारापर्यंत कंट्रोल रूममधील तीन एलसीडी टीव्हीवरील ४४ कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणावर लक्ष ठेवून असतो.

मंदिराच्या गाभाऱ्यात चार आयपी कॅमेरे (इंटरनेट प्रोटोकॉल) सिंगल ऑप्टीकल फायबरद्वारे जोडले. वायरीचे जाळे कमी करण्यासाठी मंदिर परिसरात ७० ते ७५ कॅमेरे बसविले जाणार आहेत. यासाठी वेगळा कन्सल्टंट नेमण्यासाठी दोनदा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नव्हता.  दरवाजांवर अत्याधुनिक मेटल डिटेक्‍टर आणि बॅग स्कॅनिंग यंत्रणाही सुरू करून संपूर्ण मंदिर सुरक्षेस प्राधान्य 
देण्यात येईल. 
- महेश जाधव,
अध्यक्ष, 
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

Web Title: Kolhapur News CCTV in Ambabai Temple