...आता खंडणीबहाद्दरांच्या वर्तनाला बसणार चाप

...आता खंडणीबहाद्दरांच्या वर्तनाला बसणार चाप

कोल्हापूर -  ‘‘आपली ‘मागणी’ पूर्ण करा, नाहीतर माहिती अधिकारात माहिती मागवतो,’’ ‘‘मिटवून घे, नाहीतर दारात येऊन दंगा करतो,’’ ‘‘आपले बेकायदेशीर काम कर, नाहीतर ऑफिसमधल्या बाकीच्या भानगडी बाहेर काढतो’’... अशा पद्धतीने धमकी देऊन कामे करून घेणाऱ्यांचा समावेशही आता खंडणीबहाद्दरांच्या यादीत होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात काही ठराविक जणांकडून व्यक्तिगत किंवा संघटित पातळीवर गेली काही वर्षे हा प्रकार सुरू आहे. कोल्हापूरच्या धगधगत्या आंदोलनाच्या परंपरेला या काही व्यक्तींमुळे संशयाची किनार लागली आहे. आंदोलन किंवा माहितीचा अधिकार हा लोकशाहीतला हक्कच आहे; पण काहींनी त्याचा गैरवापर सुरू केला आहे. या प्रवृत्तीच्या आंदोलनाच्या हालचाली, त्यांचे वर्तन पुरावा म्हणून टिपले जावे यासाठी आता बहुतेक कार्यालयांत मोक्‍याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाऊ लागली आहे.

कोल्हापुरात काही ‘कार्यकर्ते’ आहेत. ते रोजच्या रोज शहरात घडलेल्या घटनांचा आढावा घेतात. दहा-बारा जण एकत्र येतात व आंदोलनाचे ठिकाण निवडतात. काही गैरप्रवृत्तींना लोकशाहीच्या माध्यमातून चाप बसविण्यासाठी आंदोलन हे नक्कीच प्रभावी हत्यार आहे. पण हे ठराविक कार्यकर्ते आंदोलनाची सुरुवात जोरदार करतात. सर्वांचे लक्ष वेधून घेतात व एक दिवस हळूच आंदोलनातून अंग काढून घेतात.

आंदोलनातून अंग काढून घेण्यासाठी तडजोडी करतात. रोज कार्यालयाच्या दारात गोंधळ नको म्हणून अधिकारीही तडजोड करतात. आंदोलन आक्रमक भासविण्यासाठी अधिकाऱ्यांना शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत एकेरी उल्लेख हे प्रकार ठरवून केले जातात. या आंदोलनामागे काय दडलेले असते, हे पाहिले तर आंदोलनाची धमकी देऊन आपली कामे करून घेतली जातात किंवा ‘तडजोड’ करून आंदोलन थांबवितात.

सर्वच आंदोलनांच्या बाबतीत हे घडते, असे नाही. पण काही ठराविक व्यक्ती आंदोलनात पुढे असल्या की संशय आल्याशिवाय राहत नाही, अशी स्थिती आहे. कोल्हापुरात ‘सुपारी’ घेण्याची पद्धत म्हणजे खंडणीचाच प्रकार आहे. भाडेकरू-जागामालक वाद, खासगी सावकारी, वादग्रस्त खरेदी-विक्रीचे व्यवहार, खासगी मालमत्तेची वाटणी यात ठराविक काही जण भाग घेतात. किंवा संबंधित लोक यांच्याकडे मध्यस्थीसाठी जातात. सुपारी घेणारे हे खंडणीबहाद्दर त्यांनी पोसलेल्या टोळक्‍याकडून दहशत निर्माण करतात. स्वतः चित्रात न येता इतरांकडून अशी कामे करून घेतात आणि दोन्हीकडून कमाई करतात. मोठ्या नेत्यांबरोबर छायाचित्रे असलेले आपले डिजिटल फलक लावतात. या फलकांच्या निमित्ताने ते आपले ‘संबंध’ कोणाकोणाशी आहेत, हेच दाखवून देतात.

यादीच तयार 
पोलिसांनी या खंडणीबहाद्दरांची, सुपारीदादांची यादीच तयार केली आहे. मात्र तक्रार करायला कोणी धजावत नसल्याने खंडणीबहाद्दरांची चलती सुरू आहे. आता मात्र खंडणीबहाद्दरांविरुद्ध तक्रार करणाऱ्याला पाठबळ देण्याची भूमिका पोलिसांची आहे. एवढेच नव्हे, तर एखाद्या खंडणीबहाद्दराचे वस्तुस्थितीदर्शक प्रकरण निनावी पत्राद्वारे जरी कोणी कळविले तरी त्याची दखल घेतली जाणार आहे.

टोळक्‍याकडून ‘गवगवा’
कोल्हापुरातले खंडणीबहाद्दर, सुपारीदादा फार धाडसी आहेत, असे अजिबात नाही. त्यांनी आपल्याभोवती जी टोळकी पोसली आहे, त्या टोळकीकडूनच त्यांचा ‘गवगवा’ केला जातो. या गवगव्याच्या जोरावरच त्यांमची कृत्ये सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com