तेरा हजार ४०० जागांवर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

शहरात पस्तीस महाविद्यालये - प्रक्रियेची तारीख लवकरच होणार जाहीर

शहरात पस्तीस महाविद्यालये - प्रक्रियेची तारीख लवकरच होणार जाहीर
कोल्हापूर - केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार अकरावीसाठी सुमारे १३ हजार ४०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होणार आहे. शहरातील पस्तीस महाविद्यालये प्रवेशासाठी सज्ज असून, विद्यार्थ्यांना कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल, याची उत्सुकता आहे. प्रवेश प्रक्रियेची तारीख येत्या काही दिवसांत जाहीर केली जाणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे प्रभारी अध्यक्ष एम. के. गोंधळी यांनी सांगितले. वेबसाईटवर निकाल पाहिल्यानंतर नक्की कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा, या विचारात विद्यार्थी आहेत. पालक वर्गही पाल्याने कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, याविषयी चिंतेत आहेत. विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील करिअरच्या संधींचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या शाखा ठरणार आहेत; मात्र हाती गुणपत्रक मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांत प्रवेशासाठी धांदल सुरू होणार आहे. 

कोल्हापूर विभागातर्फे अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होत असून, त्यासाठी मंडळाने तयारी केली आहे. अर्ज वितरण, संकलन, उद्‌बोधन व तक्रार निवारण केंद्रांचे नियोजन केले आहे. या प्रक्रियेचे मुख्य केंद्र शिवाजी पेठेतील न्यू कॉलेज असणार आहे. 

प्रवेशासाठीचे अर्ज असे
विज्ञान - पांढरा
कला - पिवळा (मराठी माध्यम), गुलाबी (इंग्रजी माध्यम)
वाणिज्य - हिरवा (मराठी माध्यम), निळा (इंग्रजी माध्यम)
प्रवेश अर्ज शुल्क प्रत्येकी ७० रुपये.

तक्रार निवारण केंद्रे 
कला - कमला महाविद्यालय
विज्ञान - विवेकानंद महाविद्यालय
वाणिज्य - कॉमर्स कॉलेज.

वितरण केंद्रे 
कोल्हापूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (खरी कॉर्नर)
स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (सिद्धाळा गार्डन परिसर)
कॉमर्स कॉलेज (आझाद चौक)
कमला महाविद्यालय (राजारामपुरी १ ली गल्ली)
विवेकानंद महाविद्यालय (ताराबाई पार्क)
महावीर महाविद्यालय (न्यू पॅलेस परिसर).

पालक व दहावी विद्यार्थ्यांसाठी उद्‌बोधन केंद्रे 
स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (गडकरी हॉल)
कॉमर्स कॉलेज  यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (केएमसी)
गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय
कमला महाविद्यालय  न्यू कॉलेज   विवेकानंद महाविद्यालय.

संकलन केंद्रे 

महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (शिवाजी पेठ)
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (सिद्धाळा गार्डन परिसर)
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (केएमसी, गंगावेस)
गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय (हुतात्मा पार्क परिसर)
राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय (कदमवाडी)
न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (ताराबाई पार्क)
शहाजी छत्रपती महाविद्यालय (दसरा चौक).

अकरावी विनाअनुदानित तुकड्यांसाठी शुल्कवाढ 
विनाअनुदानित तुकड्यांकरिता अकरावीच्या प्रवेश शुल्कात शाखानिहाय प्रत्येकी दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेली सात वर्षे शुल्कात वाढ न झाल्याने शुल्कवाढीचा निर्णय झाला आहे. शहरातील महाविद्यालयांमधील सत्तावन्न तुकड्यांसाठी ही वाढ आहे. प्राचार्यांच्या मागणीनुसार ही शुल्कवाढ करण्यात आली आहे. औपचारिकता म्हणून त्यावर येत्या दोन दिवसांत शिक्कामोर्तब होणार आहे. अकरावी प्रवेशाच्या वेळी विज्ञान शाखेसाठी पाच हजार, वाणिज्य तीन हजार व कला शाखेसाठी दोन हजार रुपये विद्यार्थ्यांना भरावे लागतात. यंदा केलेल्या वाढीने विज्ञान शाखेसाठी सात, वाणिज्य पाच, तर कला शाखेसाठी चार हजार रुपये विद्यार्थ्यांना भरावे लागतील. शहरातील तेहतीस महाविद्यालयांत असलेल्या विनाअनुदानित तुकड्यांसाठी ही वाढ होत आहे. 

या तुकड्यांचा भार सहन करण्यासाठी शुल्कवाढ होणे आवश्‍यक असल्याची मागणी सातत्याने प्राचार्यांकडून होत होती. त्याविषयी कोल्हापूर विभागाशी चर्चा सुरू होती. शाखानिहाय दोन हजार रुपयांची वाढ झाल्यास ते योग्य ठरेल, असा सूर व्यक्त होत होता. अखेर या चर्चेतून विनाअनुदानित तुकड्यांसाठी शाखानिहाय प्रत्येकी दोन हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे. त्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत प्राचार्यांची बैठक बोलावून शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे प्रभारी अध्यक्ष एम. के. गोंधळी यांनी सांगितले.

Web Title: kolhapur news central admission process for 13400 seats